एकनाथ शिंदे गृह खात्यासाठी आग्रही; यापूर्वीही केला होता प्रयत्न…

Eknath Shinde | विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन आठवडा उलटून गेला असाला तरी अद्याप महायुतीचे सरकार कधी स्थापन होणार, याबाबत स्पष्टता येत नव्हती. अखेर राज्यातील महायुती सरकारचा शपथविधी सोहळा ठरला आहे. मुंबईतील आझाद मैदानमध्ये 5 डिसेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता नव्या सरकारचा शपथविधी होणार आहे. शपथविधी कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली आहे. मात्र मुख्यमंत्री पदाबाबत अद्यापही सस्पेन्स कायम आहे.
गृहखात्यावरून तिढा कायम
परंतु भाजपचाच मुख्यमंत्री होणार हे आता जवळपास निश्चीत असल्याचे म्हंटले जात आहे. दुसरीकडे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपद सोडण्याच्या बदल्यात भाजपशी डील करण्याचा प्रयत्न करत आहेत. मुख्यमंत्री पदावरील दावा सोडल्यानंतर शिंदे यांना गृहखाते मिळावे, या मागणीवर ते ठाम आहे, परंतु भाजप यासाठी तयार नसल्याचे म्हंटले जात आहे. त्यामुळे आता गृहखात्यावरून तिढा असून हे खाते कोणाकडे जाणार? याबाबत चर्चांना उधाण आले आहे.
शिंदे हे माघार घेण्याच्या मन:स्थितीत नाही हे त्यांच्या देहबोलीवरून स्पष्ट झाले. तसे पाहायला गेले तर, २०१९ मध्ये उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिंदे गृहमंत्री होण्यासाठी उत्सुक होते. परंतु सत्तावाटपाच्या करारात गृह खाते राष्ट्रवादीकडे गेले आणि नगरविकास खाते शिवसेनेकडे आले.
जून २०२२ मध्ये देखील एकनाथ शिंदे पुन्हा त्याच खात्यासाठी इच्छुक होते, परंतु देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपद स्वीकारल्यानंतर मानल्यानंतर शिंदेंना गृह विभाग भाजपकडे द्यावे लागले. यावेळी शिंदेंनी पुन्हा गृह खात्यावर दावा केला आहे. शिंदेंच्या मागण्यांच्या यादीत सार्वजनिक बांधकाम विभाग, महसूल, उद्योग आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांचाही समावेश असल्याचे म्हंटले जात आहे. दरम्यान, गृहमंत्री हे मुख्यमंत्र्यांनंतर मंत्रिमंडळातील दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे खाते असल्याने यासाठी आता रस्सीखेच सुरू असल्याचे दिसत आहे.





