“ठाकरे बंधुंसोबत एकनाथ शिंदेंनी सुद्धा एकत्र यावे…”; ‘या’ बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ

Gajanan Kirtikar – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेना ही भाजपप्रणित असल्याचे धक्कादायक विधान माजी खासदार गजानन कीर्तिकर यांनी केले आहे. कीर्तिकरांनी पक्षावर उघडपणे नाराजी व्यक्त करत पक्षाला घरचा आहेर दिला आहे. त्यांच्या या विधानामुळे शिंदेसेनेतील अस्वस्थता समोर आली आहे.
गजानन कीर्तिकर यांनी आज एका मराठी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी म्हटले की, शिवसेनेच्या मतात विभाजन होते आणि शिवसेनेचे नुकसान होते. हे कोणीही सांगेल. सध्या जे आहे हे त्रिभाजन आहे. दोन बंधू एकत्र आल्यावर त्यांचा तरी जनाधार त्यांना मिळेल. एकनाथ शिंदे यांना भाजपसोबत लढायचे आहे, कारण शिंदेंची शिवसेना भाजपप्रणित आहे.
उद्धव ठाकरेंची शिवसेना काँग्रेसप्रणित आहे. आम्हाला भाजपप्रणित किंवा काँग्रेसप्रणित शिवसेनाच्याऐवजी आम्हाला बाळासाहेबांची शिवसेना प्रमाण आहे. हे करण्याचा प्रयत्न करावा. मतदारही त्याच पद्धतीने विचार करतील. दोन बंधू एकत्र आल्यावर शिवसेनेचे गढूळ झालेले वातावरण शुद्ध होईल, असे आम्हाला वाटत असल्याचे मत कीर्तिकर यांनी व्यक्त केले.
तर, आता मला अडीच वर्ष झाली एकनाथ शिंदे यांच्याकडे येऊन. मी एवढे भक्कम संघटनात्मक काम केले. लोकाधिकार समितीच्या चळवळीत राहून काम केले. 20 वर्ष आमदार, 10 वर्ष खासदार, मंत्री पाच वर्ष एवढा अनुभव असूनही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने माझा कोणताही उपयोग करून घेतला नाही. याची खंत माझ्या मनात आहे, असे यावेळी गजानन कीर्तिकर यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.
शिवसेना ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत हे नेहमीच शिंदेंची सेना ही अमित शहा चालवत असल्याचा दावा करतात. पण आता मात्र, शिंदेंच्या पक्षातील एका बड्या नेत्याने हे विधान केल्याने शिंदेंनी आपला पक्ष खरंच भाजपच्या हाती तर दिला नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र यावे ही काळाची गरज आहे. दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने पुढे जाणारी शिवसेना एकनाथ शिंदे यांची वाटत होती. मात्र, तसं होताना दिसत नाही. त्यामुळे ठाकरे बंधुंसोबत एकनाथ शिंदे यांनी सुद्धा एकत्र येऊन अखंड शिवसेना तयार करावी. कारण सध्या एकनाथ शिंदे यांची शिवसेना भाजप प्रणित आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही काँग्रेस प्रणित आहे.
– गजानन कीर्तिकर





