Eknath Shinde : ज्योती वाघमारेंना खासदार कसं केलं? एकनाथ शिंदेंनी उलगडलं खास गुपित
Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यसभेसाठी डॉ. ज्योती वाघमारे यांची निवड करून सर्वांना आश्चर्यचकित केले.

Eknath Shinde : महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागा रिक्त झाल्या होत्या. यासाठी भाजपकडून ४, शिवसेना (शिंदे गट) कडून १, अजित पवार गटाकडून १ आणि शरद पवार गटाकडून १ अशा सात जागा बिनविरोध झाल्या आहे. शिवसेना (शिंदे गट) कडून डॉ. ज्योती वाघमारे यांना राज्यसभेवर जाण्याची संधी मिळली आहे.
गेल्या काही काळापासून पक्षाची आक्रमकपणे बाजू मांडणाऱ्या ज्योती वाघमारे या आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्या, इंग्रजी साहित्यात पीएचडीधारक आणि धारदार वक्त्या म्हणून ओळखल्या जातात. सोलापूरच्या सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या त्यांना ही संधी मिळाल्याने पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांमध्ये नाराजी व्यक्त झाली आहे.
उमेदवारीबाबत बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले की, “कमिटी स्थापन करण्यासाठी कागदपत्रे हवी म्हणून आम्ही त्यांची डाक्युमेंट घेतली होती. नंतर त्यांना सांगितले की, राज्यसभेसाठी आपला अर्ज भरणार आहोत.” त्यांनी हे निर्णय ‘सर्वसामान्य महिलांना स्थान देण्याचा’ आणि ‘प्रत्येक कार्यकर्त्यावर लक्ष ठेवण्याचा’ भाग असल्याचे सांगितले.
ज्योती वाघमारे यांना ‘लाडकी बहिण’ म्हणून संबोधत शिंदे म्हणाले, “आईची तगमग आणि बायकोची काटकसर बघितली म्हणून लाडकी बहिण योजना सुरू केली. ज्योती वाघमारे या लाडक्या बहिणीला खासदार केले.”
शिंदे यांनी पुढे म्हटले, “सगळ्या पदांपेक्षा ‘लाडका भाऊ’ ही माझी मोठी ओळख आहे. बचत गट, फुड ट्रक यांसारख्या माध्यमातून स्त्री सक्षमीकरण केले.” त्यांनी आपल्या वैयक्तिक आयुष्यातील घटनांचाही उल्लेख करत ‘लाडका भाऊ’ ही ओळख अधोरेखित केली.
ज्योती वाघमारे या ठाकरे गटाकडून होणाऱ्या टीकेला धारदारपणे उत्तर देत असतानाही, त्यांच्या उमेदवारीची शक्यता कुणालाही वाटली नव्हती. शिंदे यांनी शेवटच्या क्षणी हा ‘धक्कातंत्र’ वापरत ज्येष्ठ नेत्यांना डावलले, ज्यामुळे पक्षात आणि राजकीय वर्तुळात मोठे आश्चर्य निर्माण झाले आहे.





