Eknath Shinde : दुष्काळाचे सावट दूर होऊन दे! उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पांडुरंगाला साकडे
राज्यातील दुष्काळी परिस्थिती दूर होऊन बळीराजा आणि सर्वसामान्य जनतेच्या जीवनात सुख, समृद्धी व समाधान नांदू दे, असे साकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले.

Eknath Shinde : राज्यातील दुष्काळी परिस्थिती दूर होऊन बळीराजा आणि सर्वसामान्य जनतेच्या जीवनात सुख, समृद्धी व समाधान नांदू दे, असे साकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी श्री विठ्ठलाच्या चरणी घातले. कार्तिकी यात्रा २०२६ निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आयोजित शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मानाचे वारकरी सुधाकर दशरथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक संपन्न झाली. यानंतर मंदिर समितीच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात एकनाथ शिंदे बोलत होते.
यावेळी फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार संजय जाधव, आमदार अभिजित पाटील, बापूसाहेब पठारे, राजू खरे, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन व अन्य मान्यवर उपस्थित होते.
एकनाथ शिंदे (Eknath Shinde) म्हणाले, राज्यातील ३१० तालुक्यांमध्ये दुष्काळी परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. खरीप व रब्बी हंगामातील पाऊस अत्यंत कमी झाल्यामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवले असून, शेतीपिकांचे नुकसान झाले आहे. अशा संकटाच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे. दुष्काळी परिस्थिती दूर होऊन चांगला पाऊस पडावा, बळीराजावरील संकट दूर व्हावे आणि त्याच्या जीवनात सुख-समाधानाचे दिवस यावेत, असे साकडे पांडुरंगाला घातल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व त्यांच्या पत्नी लता एकनाथ शिंदे तसेच मानाचे वारकरी सुधाकर दशरथ शिंदे व त्यांच्या पत्नी प्रणिता सुधाकर शिंदे यांच्या हस्ते श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते मानाचे वारकरी शिंदे दाम्पत्याचा श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती व वस्त्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच एसटी महामंडळातर्फे देण्यात येणारा एक वर्षाचा मोफत प्रवास पास त्यांना प्रदान करण्यात आला.
दर्शन मंडपासाठी अतिरिक्त २५ कोटी
आषाढी व कार्तिकी यात्रेदरम्यान वारकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सुविधांमध्ये दरवर्षी सुधारणा करण्यात येत आहेत. वारकऱ्यांसाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याकरिता शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जात आहे. दर्शन मंडपासाठी आवश्यक असलेला अतिरिक्त २५ कोटी रुपयांचा निधी पर्यटन विभागामार्फत तत्काळ उपलब्ध करून देण्यात आला आहे. पंढरपूर कॉरिडॉरचे काम सर्व संबंधितांना विश्वासात घेऊनच करण्यात येणार असल्याचेही शिंदे (Eknath Shinde) यांनी स्पष्ट केले.






