Eknath Shinde : जय गुजरात…! एकनाथ शिंदेंनी ओढवलं नवं संकट; पुण्यात नेमकं काय घडलं?

पुणे : महाराष्ट्रात मराठी अस्मितेचा मुद्दा तापलेला असताना, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात ‘जय गुजरात’चा नारा देत राजकीय वादाला तोंड फोडले आहे. कोंढवा येथील जयराज स्पोर्ट्स अँड कन्व्हेन्शन सेंटरच्या उद्घाटन समारंभात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत शिंदे बोलत होते.
नेहमीप्रमाणे अमित शाह यांचे कौतुक करताना शिंदे यांनी ‘जय हिंद, जय महाराष्ट्र’ असे म्हणत भाषण संपवले. मात्र, अचानक त्यांना काही आठवले आणि पुन्हा माइकवर येत त्यांनी ‘जय गुजरात’चा नारा दिला. या घोषणेने उपस्थितांच्या भुवया उंचावल्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या चर्चेला तोंड फुटले.
अमित शाह यांचे नेतृत्व यांचे तोंडभरून कौतुक
या कार्यक्रमाला अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अनेक मंत्री, स्थानिक लोकप्रतिनिधी आणि भाजप-शिंदे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिंदे यांनी आपल्या भाषणात बाजीराव पेशव्यांचा पराक्रम आणि अमित शाह यांचे नेतृत्व यांचे तोंडभरून कौतुक केले. पण भाषणाच्या शेवटी ‘जय गुजरात’चा नारा दिल्याने सर्वांचे लक्ष शिंदे यांच्याकडे वळले. मराठी अस्मितेच्या मुद्द्यावरून आधीच वातावरण तापलेले असताना, शिंदे यांच्या या वक्तव्याने विरोधकांना आयते कोलित मिळाले आहे.
सुषमा अंधारेंचा हल्लाबोल
एकनाथ शिंदे यांच्या ‘जय गुजरात’ घोषणेवर शिवसेना (ठाकरे गट) नेत्या सुषमा अंधारे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. “महाराष्ट्र द्रोही निर्णय घेऊन अस्मिता दिल्लीच्या पायथ्याशी वाहिल्याने शिंदे यांना मुख्यमंत्रीपदाचे बक्षीस मिळाले. आता ते लाचारीची स्पर्धा जिंकण्यासाठी असे बोलत आहेत,” अशी टीका त्यांनी केली.
त्या पुढे म्हणाल्या, “जिथे मुख्यमंत्री ‘जय गुजरात’ म्हणतात, तिथे सुशील केडिया यांच्यासारखे लोक ‘मी मराठी बोलणार नाही’ म्हणतात. मराठी माणसाने आता ‘नो मराठी, नो बिझनेस, नो मराठी, नो वोटिंग’चा ट्रेंड सुरू करायला हवा.” अंधारे यांनी शिंदे यांच्या वक्तव्याला भाजपच्या गैर-मराठी मतांच्या एकत्रीकरणाचा डाव असल्याचा आरोपही केला.
‘केम छो, शिंदे साहेब!’ जितेंद्र आव्हाडांचा टोला
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही शिंदे यांना खोचकपणे टोमणा मारला. “आता शिंदे साहेबांशी कसे बोलायचे? केम छो, एकनाथ शिंदे साहेब!” असे ट्वीट करत त्यांनी शिंदे यांच्या वक्तव्यावर उपहासात्मक टीका केली. “शिवसेना मराठी माणसासाठी उभी राहिली होती, पण आता विनाशकाले विपरीत बुद्धी,” असेही ते म्हणाले.
अमित शाह, फडणवीस यांची भाषणे
या कार्यक्रमात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनीही भाषणे केली. दोघांनीही थोरल्या बाजीराव पेशव्यांच्या पराक्रमाचे कौतुक केले. अमित शाह यांनी पुण्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वावर प्रकाश टाकला. मात्र, कार्यक्रमानंतर चर्चा रंगली ती फक्त शिंदे यांच्या ‘जय गुजरात’ वक्तव्याची.
महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद ?
शिंदे यांच्या या वक्तव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर आधीच संवेदनशील असलेल्या वातावरणात हे वक्तव्य काय परिणाम घडवेल, हे येत्या काळात स्पष्ट होईल. सध्या तरी शिंदे यांचे ‘जय गुजरात’ हे राजकीय वर्तुळात आणि सामान्य जनतेतही चर्चेचा विषय ठरले आहे.





