Eknath Shinde : घुसके मारेंगे, पाकला इट का जवाब पत्थर से ! एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Eknath Shinde – पाकिस्तानचा आता कायमचा बंदोबस्त होणारच आहे, त्याची प्रक्रिया सुरू झाली असून पहलगाम या ठिकाणी निरपराध लोकांना गोळ्या घालण्याचं पाप पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी केलं. तेव्हापासून या देशातील नागरिक संताप व्यक्त करत आहेत. हा भारत पूर्वीचा भारत नाही, हा घुसके मारेंगेवाला भारत आहे, असे म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाकिस्तानवरील कारवाई संदर्भात मोठे वक्तव्य केले आहे.
कोल्हापुरातील जयसिंगपूर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे आणि संग्रहालयाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पार पडले. यानंतर बोलताना एकनाथ शिंदे यांनी पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याचा संताप व्यक्त करत कारवाई होणार असल्याचे म्हटले आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशाच्या भावना कळतात. त्यामुळेच पंतप्रधान मोदींनी गृहमंत्री अमित शहा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांना तात्काळ काश्मीरमध्ये पाठवले, स्वतः परदेशातील दौरा रद्द केला. पाकिस्तान दहशतवाद्यांच्या मागून जे कारवाई करतोय त्याला जशास तसे उत्तर भारत देशाकडून मिळाल्याशिवाय राहणार नाही. पाकिस्तानला इट का जवाब पत्थर से आणि खून का जवाब खून से देणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
तसेच भारत-पाकिस्तान सीमेवर काश्मीरमध्ये कुपवाड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा जवानांनी उभा केला आणि त्याला मला उद्घाटनाला बोलावले होते. तेथील महाराजांच्या हातातील तलवारीचे टोक पाकिस्तानकडे आहे. पाकिस्तानने हिंदुस्तानच्या भूमीकडे डोळे वटारून बघण्याची हिंमत करू नये, अशी संकल्पना जवानांची अश्वारूढ पुतळाच्या माध्यमातून आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले युनेस्कोमध्ये गेले आहेत, हा महाराष्ट्राचा स्वाभिमान असून या गडकोट किल्ल्यांचे जतन झाले पाहिजे, ही शासनाची भूमिका आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी या राज्यात गडकोट किल्ले उभे केले. आपण गडकोट किल्ल्यांचे संवर्धन करतोय मात्र छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती लालकिल्यावर देखील आता साजरी करत आहे. शिवछत्रपतींना अभिप्रेत असलेली समाजव्यवस्था आपण निर्माण करत असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.





