Eknath Shinde | Cow | Rajya Mata : महाराष्ट्रात या वर्षअखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील एकनाथ शिंदे सरकारने मोठी खेळी केली आहे. शिंदे सरकारने सोमवारी मंत्रिमंडळाची बैठक घेऊन गायीला ‘राजमातेचा’ दर्जा दिला. या हालचालीतून शिंदे सरकार हिंदुत्वाच्या खेळपट्टीवर निवडणूक लढवणार असल्याचे मानले जात आहे. आता शिंदे सरकारची ही खेळी कितपत चालेल हे येणारा काळच सांगेल. महाराष्ट्र सरकारने जारी केलेल्या निवेदनानुसार वैदिक काळापासून भारतीय संस्कृतीत देशी गायीचे स्थान आणि मानवी आहारात तिच्या दुधाची उपयुक्तता अत्यंत महत्त्वाची आहे. आयुर्वेद चिकित्सा, पंचगव्य उपचार पद्धती आणि सेंद्रिय शेती पद्धतीमध्ये शेण व मूत्र यांना महत्त्वाचे स्थान आहे. हे लक्षात घेऊन आतापासून देशी गायींना राज्यमाता गोमाता म्हणून घोषित करण्यास मान्यता देण्यात आली आहे. गायीला राजमाता घोषित करणारे उत्तराखंड हे पहिले राज्य : गायीला “राजमाता” किंवा “राष्ट्रमाता” म्हणून घोषित करणारे उत्तराखंड हे भारतातील पहिले राज्य आहे. उत्तराखंड विधानसभेने 19 सप्टेंबर 2018 रोजी या संदर्भात एक ठराव मंजूर केला, ज्यामध्ये गायीला राष्ट्रमातेचा दर्जा देण्याची मागणी करण्यात आली होती. हा ठराव एकमताने मंजूर करून केंद्र सरकारकडे पाठविण्यात आला. आता महाराष्ट्राच्या शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळाने असा निर्णय घेतला आहे. कोणी-कोणी केलं निर्णयाचं स्वागत : शिंदे सरकारच्या या निर्णयाचं विश्व हिंदू परिषदेने स्वागत केलं आहे. राज्य सरकारने गाईंना राज्यमाता दर्जा दिल्याने विश्व हिंदू परिषदेकडून सरकारचे अभिनंदन करण्यात येत आहे. सरकारच्या या निर्णयामुळे गायींना आता संरक्षण प्राप्त होईल. गेली अनेक वर्षे या निर्णयासाठी विश्व हिंदू परिषद संघर्ष करत होती, मागणीला यश आलं आहे. विश्व हिंदू परिषदेचे नेते लवकरच मुख्यमंत्र्यांना भेटून अभिनंदन करणार आहेत, असं विश्व हिंदू परिषदेचे क्षेत्र मंत्री विंद शेंडे यांनी म्हटलं आहे.