मोठी घडामोड…! ठाकरेंचा बडा नेता शिंदेंच्या गळाला? एकनाथ शिंदेंच्या विधानानं भुवया उंचावल्या!

नाशिक : नाशिकमध्ये एकाच दिवशी ठाकरे गटातील दोन नेत्यांच्या वेगळ्या राजकीय हालचालींमुळे चर्चांना उधाण आलं आहे. शिवसेना (ठाकरे गट) चे उपनेते सुधाकर बडगुजर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली असतानाच, दुसरीकडे ठाकरे गटाचे नाशिक महानगर प्रमुख विलास शिंदे यांच्या कन्येच्या विवाहसोहळ्यास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली आहे. विशेष म्हणजे, यावेळी एकनाथ शिंदेंनी एक सूचक विधान केलं आहे. ते सध्या संपूर्ण नाशिकच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
“विलास शिंदे हा आमचा जुना कार्यकर्ता!” : शिंदेंच्या विधानाने खळबळ
विलास शिंदे यांच्या कन्येच्या विवाहासाठी एकनाथ शिंदे आणि मंत्री दादा भुसे नाशिकमध्ये दाखल झाले. यापूर्वी संजय राऊत देखील त्या विवाह सोहळ्यास उपस्थित होते. मात्र, एकनाथ शिंदे यांनी यावेळी केलेल विधान खूप काही सांगून गेलं.
“शिंदे शेवटी शिंदेंकडेच येणार. विलास शिंदे हा आमचा जुना कार्यकर्ता आहे. बाळासाहेबांचे विचार घेऊन चालणारा कार्यकर्ता आहे. इथे मी राजकीय गणित मांडणार नाही,” असं म्हणत विलास शिंदेंशी जवळीक राजकीय पातळीवरही वाढू शकते, असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
राऊत नाशिकमध्ये, बडगुजर थेट फडणवीसांच्या भेटीला
त्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये होते. सकाळी त्यांच्या पुतण्याच्या विवाहाला हजेरी लावल्यानंतर त्यांनी साईबाबा हॉस्पिटलचे उद्घाटन केले. याच कार्यक्रमात ठाकरे गटाचे उपनेते सुधाकर बडगुजर मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेण्यासाठी पोहोचले. संजय राऊत हे नाशिकमध्ये असतानाच सुधाकर बडगुजर यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
दरम्यान, सुधाकर बडगुजर यांच्या माध्यमांनी संवाद साधला असता ते म्हणाले की, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने रिक्त पदे भरावी, कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवणे ही महत्त्वाची बाब आहे. काही क्लास वन आणि क्लास टू, क्लास थ्री आणि क्लास फोरचे प्रमोशन बाकी आहे.
ते प्रमोशन लवकर व्हावे, याबाबत निवेदन देण्यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.मी फडणवीस यांच्या भेटीला जाणार आहे, हे संजय राऊत यांना माहिती होतं, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.
पडद्यामागे काही तरी शिजतंय?
संजय राऊत यांची उपस्थिती असतानाच ठाकरे गटाचे दोन प्रमुख नेते, दोन वेगळ्या सत्ताधाऱ्यांच्या जवळ गेल्याने “गटबाजी?”, “तुटतंय का विश्वास?” अशा चर्चांना उधाण आलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या सूचक वक्तव्यामुळे विलास शिंदेंच्या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. दरम्यान, नाशिकमध्ये एकाच दिवशी घडलेल्या या दोन घटनांनी ठाकरे गटाच्या अंतर्गत घडामोडींवर आणि भविष्यातील राजकीय समीकरणांवर नवे प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.





