अंबरनाथ : राज्यात सध्या महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून प्रचाराला चांगलाच वेग आला आहे. महाराष्ट्रातील २९ महापालिकांसाठी निवडणुका होत असताना, अनेक ठिकाणी वेगवेगळ्या राजकीय युती पाहायला मिळत आहेत. काही ठिकाणी भाजप आणि शिवसेना शिंदे गटाची युती, तर काही महापालिकांमध्ये भाजप-शिंदे गट-राष्ट्रवादी अजित पवार गट अशी त्रिसूत्री युती तयार झाली आहे. मात्र जिथे भाजपसोबत युती शक्य झाली नाही, तिथे अजित पवार गटाने राष्ट्रवादी शरद पवार गटासोबत हातमिळवणी केल्याचं चित्र आहे. दरम्यान, अंबरनाथ नगरपालिकेत मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला असून, यात भाजपला जोरदार धक्का बसला आहे. कालपर्यंत भाजपासोबत असलेले राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 4 नगरसेवक आज अचानक शिवसेना शिंदे गटाच्या बाजूने उभे राहिले आहेत. त्यामुळे अंबरनाथ पालिकेतील शिवसेनेची सत्ता कायम राहणार असून भाजपला सत्तेपासून दूर रहावं लागणार आहे. अंबरनाथ नगरपालिकेत शिवसेना शिंदे गटाचे सर्वाधिक 27 नगरसेवक निवडून आले होते. एका अपक्षाच्या पाठिंब्याने हे संख्याबळ 28 वर पोहोचले होते. सत्ता स्थापन करण्यासाठी शिवसेनेला आणखी दोन नगरसेवकांची गरज असताना, किंगमेकरच्या भूमिकेत असलेल्या अजित पवार गटाच्या नगरसेवकांनी सुरुवातीला भाजपला पाठिंबा दिला होता. याचदरम्यान काँग्रेसमधून निलंबित 12 नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाल्याने भाजपाचं संख्याबळ 15 वरून थेट 31 वर पोहोचलं होतं. सोमवारी 12 जानेवारी रोजी होणाऱ्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत भाजपचा उपनगराध्यक्ष बसेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र गट नोंदणीच्या शेवटच्या दिवशी अचानक अजित पवार गटाचे चार नगरसेवक शिवसेनेच्या गटात दाखल झाल्याने राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली. या घडामोडीनंतर शिवसेना शिंदे गटाचं संख्याबळ 32 वर पोहोचलं असून, उपनगराध्यक्ष पदासह विषय समित्यांवर शिवसेनेचंच वर्चस्व राहणार आहे. त्यामुळे “सिंह गेला असला, तरी अंबरनाथचा गड शिवसेनेनं राखला,” अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. सदाशिव पाटील, मीरा शेलार, सचिन पाटील, सुनिता पाटील या अजित पवार गटाच्या नगरसेवकांनी शिवसेनेला समर्थन दिल आहे.