Eknath Shinde : बाप बापच असतो; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाना पटोलेंवर टीका

मुंबई : नाना हे स्वत: विधानसभेचे अध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांना विधानसभेच्या कामकाजाची माहिती आहे. सभागृहाची प्रतिष्ठा राखली पाहिजे, हे त्यांनाही माहिती आहे. पण ते आज का इतके आक्रमक झाले ? ते कळाले नाही. ते थेट अध्यक्षांच्या दिशेला गेले आणि त्यांनी राजदंड उचलण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याकडून अशा कृतीची अपेक्षा नव्हती. त्यांची दिल्लीत देखील काही दिवसांपासून चर्चा दिसत नव्हती.
नावाची चर्चा झाली पाहिजे, पुन्हा चर्चेत आणि प्रकाशझोतात यायला पाहिजे, म्हणून त्यांचे हे प्रयत्न आहेत का? यासाठी पंतप्रधान मोदींचेच नाव घेतले पाहिजे का? कारण बाप बापच असतो. विधानसभेत जनतेने त्यांना झटका दिल्यानेच ते १६ वर अडकले आहेत्, त्यांनी त्यातून बोध घेतला पाहिले, असे म्हणताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नाना पटोलेंवर टीका केली.
विधीमंडळाच्या अधिवेशनाचा दुसरा दिवस वादळी ठरला. भाजपचे बबनराव लोणीकर, कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचे वक्तव्य व शेतकऱ्यांसंबंधित भूमिका मांडताना माजी विधानसभा अध्यक्ष व आमदार नाना पटोले जास्त आक्रमक झाले. ते थेट विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या दिशेला धावून गेले. यावेळी त्यांनी राजदंडाला देखील हात लावण्याचा प्रयत्न केला, असा आरोप सत्ताधारी पक्षाच्या वतीने करण्यात आला. त्यामुळे विरोधक देखील आक्रमक झाले. त्यामुळे सभागृहात गदारोळ झाला. मुख्यमंत्र्यांनी नाना पटोलेंच्या कृतीचा निषेध करताना, कारवाईची मागणी केली. यानंतर अध्यक्ष नार्वेकरांनी नाना पटोलेंना दिवसभरासाठी निलंबीत केले.
विधानसभा अध्यक्षांच्या या कारवाईवरुन विरोधकांनी सभात्याग केला. या घटनेनंतर नाना पटोले यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली होती. त्यांनी केलेल्या एका वक्तव्याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी हो, बाप बापच असतो, नरेंद्र मोदी हे देशाचे पंतप्रधान आहे, असे म्हटले. तसेच नाना पटोलेंनी हा स्टंट प्रसिद्धीसाठी केला. कारण दिल्लीत काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींना आता त्यांचे नाव कुठेच दिसत नाही, असा टोला एकनात शिंदे यांनी लगावला.





