आमदार लांडगे यांना उमेदवारी म्हणजे युवा नेतृत्वाचा सन्मान : एकनाथ पवार

भोसरी – भोसरी विधानसभा मतदारसंघातून मी भाजपतर्फे इच्छुक होतो, मात्र पक्षाने घेतलेला निर्णय मला मान्य आहे. आमदार महेश लांडगे यांना उमेदवारी म्हणजे युवा नेतृत्वाचा सन्मान आहे. त्यामुळे कोणताही नकारात्मक व बंडाचा विचार मनातही न आणता आमदार लांडगे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्यासाठी तयारीला लागलो आहे, असे प्रतिपादन महापालिकेतील सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी येथे केले.
भोसरी मतदारसंघातील शिवसेना, भाजप महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या प्रचारार्थ पिंपरी चिंचवड शहर भाजप कार्यालयात आयोजित बैठकीत पवार बोलत होते. यावेळी शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप, आमदार महेश लांडगे उपस्थित होते. यावेळी बोलताना एकनाथ पवार म्हणाले, मी गेल्या अनेक वर्षांपासून भाजपचे काम करत आहे. सन 2014 च्या विधानसभेला मी भोसरी मतदारसंघातून निवडणूक लढवून लक्षणीय मते घेतली होती. पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्तारूढ पक्षनेते पदाची जबाबदारी मी व्यवस्थित पेलली आहे. त्यामुळे मी यावेळी भोसरी मतदारसंघातून इच्छुक होतो. मात्र पक्षाने आमदार महेश लांडगे यांना उमेदवारी जाहीर केली.
हा निर्णय मला मान्य आहे. त्यामुळे कोणतीही कुरकुर न करता, बंडाचा विचार न करता मी पक्षनिष्ठा बाळगत कामाला लागलो आहे. कारण निर्णय आल्यावर कामाला लागणे हे मी माझे कर्तव्य समजतो, असे पक्षनेते पवार म्हणाले वर्षानुवर्षे पक्षाचे काम केलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याने पक्षाचा निर्णय आल्यावर कामाला लागणे अपेक्षित आहे. मी स्वतः प्रभागा-प्रभागांमध्ये कामाला लागलो आहे. आमदार महेश लांडगे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी केल्याशिवाय भाजपचे कार्यकर्ते स्वस्थ बसणार नाहीत, असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.
आमदार महेश लांडगे यांनी भोसरी मतदारसंघातील अनेक प्रलंबित प्रश्न मार्गी लावले आहेत. विकासाचे अनेक प्रकल्प मार्गी लावण्यासाठी त्यांनी विधीमंडळात तळमळीने भूमिका मांडली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार लांडगे यांना भारतीय जनता पक्षाची उमेदवारी देऊन त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे व युवा नेतृवाचा सन्मान केला आहे. मतदारही निश्चितपणे त्यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करतील, असा विश्वास सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांनी व्यक्त केला.




