पिंपरी : मुंबई नंतर पुणे हे सर्वात मोठे पोलीस आयुक्तालय होते. कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने याचे विभाजन करण्याची गरज होती. त्यासाठी पिंपरी-चिंचवड हे स्वतंत्र पोलीस आयुक्तालय निर्माण केले. देशातील सर्वाधिक आधुनिक पोलीस आयुक्तालय पिंपरी-चिंचवडला मिळाले. राज्याच्या पोलीस गृहनिर्माण विभागाने खासगी व्यावसायिकांना मागे टाकतील अशा इमारती बांधल्या आहेत. आयुक्तालयाच्या इमारतीचे काम लवकर पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या. पुढील ५० वर्षांचा विचार करून प्रत्येक इमारत उभारली जात असून याचा नागरिकांना मिळणाऱ्या सेवेवर चांगला परिणाम होत असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या इमारतीचे भूमिपूजन आणि महापालिकेच्या विविध विकासकामांच्या भूमिपूजन आणि लोकापर्ण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंचावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गृह राज्यमंत्री योगेश कदम, आमदार महेश लांडगे, सुनील शेळके, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी,महापालिका आयुक्त शेखर सिंह, पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, पीएमआरडीएचे आयुक्त योगेश म्हसे, पीएमपीएमएलच्या व्यवस्थापकीय संचालक दीपा मुधोळ-मुंडे उपस्थित होते. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाची अत्याधुनिक इमारत जाधववाडी चिखली येथे ३.३९ हेक्टर जागेत उभारली जाणार आहे. तसेच देहूरोड पोलीस ठाण्याच्या परिसरात पोलिसांकरिता गेस्ट हाऊस उभारले जाणार आहे. महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या प्रशस्त इमारतीचे भूमिपूजन देखील मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते झाले. हे पोलीस ठाणे चाकण इंडस्ट्रियल असोसिएशन मार्फत सीएसआर फंडातून १८.६६ कोटी रुपये खर्चून उभारले जाणार आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणारे मध्यवर्ती अग्निशमन केंद्रासह विविध विकासकामांचे भूमिपूजन तसेच काही विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन अबोली सुपेकर यांनी केले. आभार अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी यांनी मानले. माझे नाव घ्यायला काय वाईट वाटत? माझे नाव घ्यायला काय वाईट वाटत? अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्याबद्दल आपल्या जाहीर भाषणात उघड नाराजी व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांच्या उपस्िथतीतच अजित पवार यांनी महेश लांडगे यांना सुनावले. या सोहळ्यात आमदार महेश लांडगे यांनी आपल्या भाषणात अजित पवार यांना वगळून व्यासपीठावरील सर्व उपस्िथतांची नावे घेतली. तसेच २०१४ नंतरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामुळेच शहराचा विकास झाल्याचे म्हटले. यावर अजित पवार म्हणाले, शेवटी आपण युतीमध्ये आहोत, ज्याने चांगलं काम केले आहे, त्याला चांगल म्हणायला शिका, एवढा कंजूषपणा दाखवू नका, मी दिलदार आहे. ज्याने काम केले त्याला मी त्याचे के्रडिट देत असतो . तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी 15 ऑगस्ट2018 ला मान्यता दिली. हे पिंपरी चिंचवड आपल्या सर्वांचे आहे याठिकाणी सगळ्या सुविधा नीट मिळाल्या पाहिजेत. इथं कुठल्याही गोष्टी चुकीच्या होता कामा नये, असेही लांडगे यांना सुनावले. अख्ख्या पिंपरी चिंचवडला माहीत आहे की शहराचा विकास कुणी केला ? 1992 ला मी तुमचा खासदार झालो. 1992 ते 2017 या कालावधीत कुणी पिंपरी चिंचवड सुधरवलं. 25 वर्षे झाली आहे. प्रत्येक गोष्ट मी याठिकाणी लक्ष देऊन करत असतो. अधिकार्यांना विचारा, कितीदा बसत असतो, चर्चा करत असतो आणि मार्ग काढत असतो, असेही अजित पवार म्हणाले.