Pimpri : आमदार लांडगेंनी अधिवेशनात वेधले लक्ष : मुख्यमंत्र्यांनी दिली कारवाईची ग्वाही

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमध्ये चिखली-कुदळवाडी भागातील बेकायदेशीर भंगार दुकानचालक आणि बांगलादेशी घुसखोरांवर कठोर कारवाई करण्यात यावी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रश्न गांभीर्याने घेऊन महापालिका आयुक्त तसेच पोलीस आयुक्तांना त्याबाबत आदेश द्यावेत, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी विधानसभेत केली. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासनाला आवश्यक ते निर्देश देऊन कार्यवाही करण्याची ग्वाही दिली.
महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन नागपूर येथे सुरू आहे. यावेळी बोलताना आमदार लांडगे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून आतापर्यंत बेकायदेशीरपणे शहरात वास्तव्य 70 हून अधिक बांगलादेशी नागरिकांना त्यांच्या देशात परत पाठवले आहे. पश्चिम बंगालच्या सीमा भागातून बांगलादेशी भारतात प्रवेश करतात. बनावट आधार कार्ड, पॅनकार्ड आणि पासपोर्ट तयार करतात. रोजगाराच्या निमित्ताने आलेले हे बांगलादेशी देशविघातक कृत्यांमध्ये सहभागी असल्याचे समोर आले आहे.
पिंपरी-चिंचवड आणि चाकण, रांजणगाव, तळेगाव आदी एमआयडीसी पट्टयात कमी पगारामध्ये काम करण्यासाठी बांगलादेशी घुसखोर सहज उपलब्ध होतात. त्यामुळे स्थानिक तरुणांना रोजगार मिळत नाही. दुसरीकडे, घुसखोरांचे ‘कनेक्शन’ देशविघातक कृत्यांमध्ये असल्याचे काही घटनांमध्ये समोर आले आहे. त्यामुळे हा प्रश्न गंभीर बनला आहे.
कारवाईनंतर उद्रेक होण्याची भीती
पिंपरी-चिंचवड पोलीस आणि संबंधित यंत्रणांनी शहरातील विविध भागांमध्ये काही दिवसांपूर्वी २३ बांगलादेशी घुसखोरांना अटक केली आहे. बनावट ओळखीच्या आधारे पासपोर्ट काढून देणारे मोठे रॅकेट काही एजंट चालवतात. चिखली कुदळवाडी या परिसरामध्ये तातडीने कोंबिंग ऑपरेशन होऊन येथील समाजविघातक कृत्य घडवून आणू शकणाऱ्या व्यक्ती, प्रवृत्तींना वेळीच गजाआड करणे गरजेचे आहे. अशी कारवाई झाल्यानंतर मोठा उद्रेक होण्याची देखील भीती आहे. या दृष्टीने सतर्कतेने पावले उचलून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही आमदार लांडगे यांनी केली आहे.
कुदळवाडी-चिखली भागातील भंगार गोदामे शहरातील नदी, हवा आणि येथील रहिवासी यांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरत आहेत. वारंवार येथे आग लागण्याच्या घटना घडतात. मोठ्या प्रमाणात मालमत्तांचे नुकसान होते. पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. या घटनांच्या आडून देशविघात प्रवृत्ती समोर येण्याची भीती आहे. भंगार दुकानांमध्ये बांगलादेशी आणि रोहिंग्या कामगार आहेत. मात्र, त्याची कुठेही नोंद नाही. त्यामुळे वेळीच बांगलादेशी आणि रोहिंग्यांवर लगाम घालण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे. त्यावर उचित कार्यवाही करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री महोदय यांनी दिले आहे.
– महेश लांडगे, आमदार भोसरी विधानसभा, भाजपा, पिंपरी-चिंचवड.





