टेबल टेनिस स्पर्धेत आठशे खेळाडू सहभागी
Updated On:
पुणे – अनेक राष्ट्रीय खेळाडूंसह आठशे खेळाडू परभणी येथे होणाऱ्या महापौर चषक राज्य स्तरावरील टेबल टेनिस स्पर्धेत सहभागी होणार आहेत. ही स्पर्धा 27 ते 31 जुलै या कालावधीत होणार आहे. महाराष्ट्र राज्य टेबल टेनिस असोसिएशनच्या मान्यतेने ही स्पर्धा होत आहे.
ही स्पर्धा बहुउद्देशीय क्रीडागृह बचत भवन स्टेडियम परभणी येथे होईल. मिडजेट, कॅंडेट, सब-ज्युनिअर, ज्युनिअर, युवा मुले व मुली, तसेच पुरुष व महिला हे गट त्यासाठी ठेवण्यात आले आहेत. या स्पर्धेत पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, सातारा, रायगड, ठाणे, धुळे, अमरावती, कोल्हापूर, परभणी आदी ठिकाणचे नामवंत खेळाडू सहभागी होणार आहेत. राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या महाराष्ट्र संघाची निवड होण्यासाठी या स्पर्धेचे गुण ग्राह्य धरले जाणार आहेत.





