Uttar Pradesh : बलिया जिल्ह्यातील गोशाळेत गेल्या 15 दिवसांत 8 गायी दगावल्या

बलिया – उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यातील रसरा गावाच्या परिसरात असलेल्या एका गोशाळेत गेल्या पंधरा दिवसांत आठ गायी दगावल्याची घटना घडली आहे. या प्रकरणाची प्रशासनाने दखल घेत याचा अहवाल मागवला आहे.
जिल्हा दंडाधिकारी रवींद्र कुमार यांनी शनिवारी बछाईपूर गावात मोठ्या गायींच्या निवाऱ्याच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली त्यावेळी त्यांना ही माहिती मिळाली. कुमार यांनी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून या प्रकरणी उत्तर मागितले असून, जबाबदार लोकांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनीही पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांना येत्या पंधरा दिवसांत या प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत, असे एका निवेदनात म्हटले आहे.
उत्तर प्रदेशात अनेक ठिकाणी गोशाळा असून तेथे गायींचे संवर्धन केले जाते. परंतु या गोशाळांच्या व्यवस्थापनाकडून गायींची हेळसांड होत असल्याचे अनेक प्रकार घडले आहेत.





