एका दिवसात आठ जनावरांचा मृत्यू

सातारा – लंपी स्किनमुळे जिल्ह्यात मंगळवारी एका दिवसात आठ जनावरांचा मृत्यू झाला. मंगळवारअखेर जिल्ह्यात 83 जनावरांचा मृत्यू झाला आहे. 95 गावांमधील 1288 जनावरे बाधित असून 207 जनावरे नियमित औषधोपचाराने बरी झाली आहेत. जिल्ह्यात दोन लाख 82 हजार 131 जनावरांचे लसीकरण झाल्याची माहिती जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. अंकुश परिहार व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय शिंदे यांनी दिली.
महाबळेश्वर वगळता इतर सर्व तालुक्यांत लंपी स्किनचा प्रादुर्भाव आहे. मंगळवारअखेर 1147 गाई व 141 बैल अशा 1288 जनावरांस लंम्पी स्किनचा प्रादुर्भाव झाला आहे. मंगळवारअखेर 65 गायी, 18 बैल अशा 83 जनावरांचा मृत्यू झाला. आजअखेर 187 गाई व 20 बैल अशी 207 जनावरे नियमित औषध उपचाराने बरी झाली आहेत. लंपी स्किनच्या उपचारासाठी आवश्यक असलेली सर्व आवश्यक औषधे शासकीय पशुवैद्यकीय दवाखाने आणि तालुका लघु पशुचिकित्सालायांमध्ये उपलब्ध आहेत.
जिल्ह्यात 3 लाख 11 हजार 900 एवढ्या लसमात्रा उपलब्ध असून आजअखेर केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बाधित गाव व बाधित गावाचे 5 किलोमीटर परिघातील एकूण 602 गावांमधील 1 लाख 68 हजार 824 व इतर अबाधित क्षेत्रातील गावांमधील 1 लाख 13 हजार 307 असे 2 लाख 82 हजार 131 पशुधनाचे लसीकरण पूर्ण झाल्याचे डॉ. संजय शिंदे यांनी सांगितले. दरम्यान, जिल्ह्यात खासगी पशुवैद्यकीय सेवादात्यांमार्फतही लंपी स्किन रोगाचे लसीकरण करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश पारित केले असून सर्व निरोगी पशुधनास लसीकरणाचे कामकाज वेगाने करण्यात येत आहे.
54 पदांची कंत्राटी पद्धतीने नेमणूक
जिल्ह्यात पशुसंवर्धन विभागंतर्गत रिक्त पदांवर तातडीने नियुक्ती करण्यात आली असून यामध्ये 50 पशुधन पर्यवेक्षक व 4 पशुधन विकास अधिकारी यांची कंत्राटी पध्दतीने बाह्यस्त्रोत एजन्सीमार्फत नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे लंपी स्किन आजाराचे लसीकरण व उपचारासाठी मदत होणार आहे, अशी माहिती डॉ. अंकुश परिहार यांनी दिली.





