पुणे जिल्हा | महिलांना घरबसल्या रोजगार देण्याचा प्रयत्न

भवानीनगर, (वार्ताहर) – महिलांना घरबसल्या रोजगार उपलब्ध करण्यासाठी शारदा महिला संघाचा प्रयत्न आहे, असे मत अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट बारामतीच्या विश्वस्त सुनंदा पवार यांनी व्यक्त केले.
शारदा नगर येथे महिला बचत गट अर्थसहाय्य वितरण व मार्गदर्शन मेळावा आयोजित करण्यात आला. यावेळी सुनंदा पवार यांनी महिलांच्या गाव भेट दौर्यानिमित्ताने पुणे जिल्ह्यातील काही तालुक्यांमध्ये भेटीगाठी झाल्या.
त्यावेळेस अनेक महिलांनी आम्हाला घरबसल्या काहीतरी काम मिळावे अशी मागणी केली. त्यानुसार अनेक ठिकाणी बेरोजगाराची परिस्थिती, आर्थिक संकटात अडकलेले कुटुंब, समाजामधील असणारी परिस्थिती, महागाई या सर्व गोष्टीचा विचार करता महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे ही एक काळाची गरज व जबाबदारी वाटत आहे.
त्या दृष्टीने मी स्वतः रोहित पवार यांच्याशी या विषयावर चर्चा केली आणि त्या गोष्टीचा विचार करून रोहित पवार यांनी सोलापूर मधील काही कंपन्यांशी संपर्क साधून महिलांना महिन्याला 25 टन पापड पुरवण्याचे काम आणले आहे.
येणार्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात सांडगे, मिरची अशा विविध गोष्टींचा पुरवठा काही संस्था कंपन्या यांना शारदा महिला संघाच्या माध्यमातून बचत गटांना संधी देऊन करावयाचा आहे. याचा पाठपुरावा आम्ही काही संस्थांसी भेटून करीत आहोत, अनेक गोष्टींचे प्रशिक्षण महिलांच्या मागणीनुसार गाव पातळीवरती देण्याचे नियोजन ही करीत आहोत.
या वेळी शारदा महिला संघ माध्यमातून 27 बचत गटांना 60 लाख 75 हजारचे विविध व्यवसायसाठी कर्ज वितरण मान्यता देण्यात आले. यावेळी फार्म दीदी कंपनीचे अस्मिता घोडेस्वार यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे नियोजन बाळासाहेब नगरे, प्रकाश साळुंखे, तात्यासो शेलार, निकिता महामुनी, मंदाकिनी घोडके, सीमा पानसरे, शीतल शिर्के, अभिषेक जगताप, गजानन मोकाशी, स्नेहल मसुगडे यांनी केले. सूत्रसंचालन अरुण पुरी यांनी केले.
दुसर्या टप्प्यात प्रशिक्षण
पापड उद्योग व्यवसायाची ट्रेनिंग एक तारखेपासून कर्जत, जामखेड येथे पाच दिवस सुरू करत आहोत. त्यानंतर वालचंदनगर येथे पाच दिवस होईल. तिथून प्रत्यक्ष पापडचे निवड करून क्वालिटी व क्वांटिटी याचा विचार करता कंपनी पुढील पात्र अपात्र बाबत निर्णय घेणार आहे. कंपनीच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यामध्ये हे नियोजन असेल. दुसर्या टप्प्यांमध्ये बारामती, पुरंदर व इंदापूरचा काही भाग व दौंड असे प्रशिक्षण देऊन त्या ठिकाणीही त्यांना ते काम देण्याचा प्रयत्न करणार आहोत.





