विमान प्रवास सर्वसामान्यांच्या आवाक्यात आणण्याचे प्रयत्न; मुरलीधर मोहोळ यांची माहिती

पुणे/ दिल्ली – देशभरातील विमानतळांची संख्या वाढवणे, सर्वसामान्यांच्या आवाक्यात विमान प्रवास आणणे आणि प्रवाशांच्या मुलभूत सुविधांवर लक्ष केंद्रित करणे, यावर आपला अधिक भर असेल, अशी माहिती नवनियुक्त नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
मोहोळ यांनी या विभागाचा पदभार नुकता स्वीकारला. यावेळी या विभागाचे सचिव आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तत्पूर्वी त्यांनी नागरी हवाई वाहतूक मंत्री राम मोहन नायडू यांची भेट घेतली. पदभार स्वीकारल्यानंतर नायडू आणि मोहोळ यांनी या मंत्रालयाशी संबंधित सर्व अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
त्यानंतर “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नागरी हवाई मंत्रालयातील प्रशासन आणि निर्णय अधिक गतिमान करू तसेच प्रवाशांसाठी, हवाई वाहतुकीतील अडथळे दूर करण्यासाठी आवश्यक पावले तातडीने उचलू,’ असे आश्वासन दोन्ही मंत्र्यांनी यावेळी दिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आणि १०० दिवसांचा कृती कार्यक्रम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत. राज्य सरकारांशी समन्वय साधून या क्षेत्रांतील कंपन्या, तसेच उद्योजकांच्या सहकार्याने हवाई वाहतुकीला बळ देण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही मोहोळ म्हणाले.
मुरलीधर मोहोळ म्हणाले…
“पुढच्या १० वर्षात बदल निश्चित दिसेल. जनतेचे स्वप्न पूर्ण होताना दिसत असून महाराष्ट्रातील पुरंदर विमानतळ, पुण्याच्या विमानतळाचे विस्तारीकरण, टर्मिनल सुरू करणे, नवी मुंबई विमानतळ हे महत्त्वाचे विषय मार्गी लावणार आहोत. शिवाय महाराष्ट्रातील विमानतळांचे सक्षमीकरण करुन गती देण्याचा प्रयत्न आहे. देशाचे काम करताना महाराष्ट्राच्या कोणत्याही कामाकडे दुर्लक्ष होणार नाही,’ असा विश्वास मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला.





