लवकरच येणार इलेक्ट्रिक ट्रक आणि ट्रॅक्टर – नितीन गडकरी

पुणे – पर्यायी इंधन हेच भविष्य आहे. इलेक्ट्रिक स्कूटर, कार आणि बसेसनंतर आता लवकरच इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आणि ट्रकही येणार आहेत. मी त्यांना लवकरच लॉन्च करणार आहे, अशी माहिती पुण्यातील राज्यस्तरीय साखर परिषद 2022 ला संबोधित करताना केंद्रीय भूपृष्ठ आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी दिली. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट पुणे यांच्या वतीने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत इथेनॉलसारख्या पर्यायी इंधनाच्या वापरावर गडकरी यांनी भर दिला.
गडकरी म्हणाले की, देश आपल्या इंधन आणि उर्जेच्या गरजा भागवण्यासाठी दरवर्षी 10 लाख कोटी रुपयांचे पेट्रोलियम आयात करतो. येत्या पाच वर्षांत ही मागणी 25 लाख कोटींपर्यंत वाढू शकते. याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होईल. डिझेलवर चालणारी कृषी उपकरणे पेट्रोलवर आधारित आणि फ्लेक्स इंजिन इथेनॉलवर आधारित बनवता येतील. बांधकाम उद्योगात वापरल्या जाणाऱ्या उपकरणांमध्ये इथेनॉल वापरण्याची तयारी सुरू असल्याचेही गडकरी यांनी यावेळी सांगितले.
साखर उत्पादनातून इथेनॉल उत्पादन –
गडकरी म्हणाले, आता साखर उत्पादनाकडून इथेनॉल उत्पादनाकडे जाण्याची गरज आहे. जगभरात साखरेच्या मागणीत झालेली वाढ ही तात्पुरती आहे. जेव्हा कच्च्या तेलाच्या किमती प्रति बॅरल 140 डाॅलर पर्यंत पोहोचतात तेव्हा ब्राझील उसापासून इथेनॉल बनवायला सुरुवात करतो. त्यामुळे भारतातून साखरेची मागणी वाढते. जेव्हा कच्च्या तेलाच्या किमती 70 ते 80 डाॅलर प्रति बॅरलपर्यंत खाली येतात, तेव्हा ब्राझील साखरेचे उत्पादन सुरू करतो. ते म्हणाले की, कच्चे तेल स्वस्त असताना साखरेचे दरही झपाट्याने खाली येतात.
पुण्यात इथेनॉल पंप बसवण्याची अजित पवारांना विनंती –
कार्यक्रमात गडकरींनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुण्यात इथेनॉल पंप उभारण्याची विनंती केली जेणेकरून ते शेतकऱ्याला देता येईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कार्यक्रमाला व्हिडीओद्वारे संबोधित केले. ते म्हणाले की, राज्यातील साखर उत्पादक शेतकरी गंभीर संकटात सापडला आहे. मार्केट रिसर्चसाठी आपल्याला ब्राझीलचे अनुसरण करावे लागेल. ब्राझील सर्वेक्षण करतो आणि त्यानुसार वर्षातून एक पीक निवडतो. काळ बदलत आहे, आपण तंत्रज्ञानाचा अवलंब केला पाहिजे. इथेनॉल हे भविष्य असेल.





