भारताच्या परकीय चलन साठ्यावर परिणाम; रुपया झपाट्याने घसरतोय

मुंबई – जागतिक बाजारात क्रुडचे दर वाढले आहेत. त्याचबरोबर रुपयाचे मूल्य वेगाने कमी होत आहे. या कारणामुळे भारताचा परकीय चलनाचा साठा कमी होऊ लागला आहे. 11 मार्च रोजी संपलेल्या आठवड्यात भारताकडील परकीय चलन साठा नऊ अब्ज डॉलरने कमी होऊन 622 अब्ज डॉलर इतका झाला आहे.
काही आठवड्यापुर्वी भारताकडे 642 अब्ज डॉलर इतका परकीय चलनाचा साठा होता. मात्र अमेरिका व्याजदरात वाढ करणार असल्यामुळे परदेशी संस्थागत गुंतवणूकदार भारतातून विक्री करून परत जात आहेत.
एकीकडे परकीय चलनाचा साठा कमी होत असतानाच भारताला आयातीसाठी मोठ्या प्रमाणात परकीय चलन वापरावे लागत आहे. या कारणामुळे भारताच्या चालू खात्यावरील तूट वाढत आहे. ही तूट जर जास्त वाढली तर भारताच्या रुपयाचे मूल्य कमी होण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसापासून रिझर्व बॅंक रुपयाचे मूल्य स्थिर ठेवण्यासाठी डॉलरची विक्री करीत असल्याचे दिसून येत आहे.





