मुलींना मोफत शिक्षण योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करा – कृष्णकुमार गोयल

पुणे – मुलींना मोफत शिक्षण मिळणार याबद्दल अतिशय आनंद आहे. महाविद्यालयाने मुलींना मोफत शिक्षण योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे केली पाहिजे, असे मत खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांनी व्यक्त केले आहे.
खडकी येथील टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयात मुलींना मोफत शिक्षण या योजनेच्या अंमलबजावणीच्या शुभारंभ प्रसंगी कृष्णकुमार गोयल बोलत होते. यावेळी संचालक रमेश अवस्थे, सुधीर फेंगसे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे, शिष्यवृत्ती नोडल अधिकारी डॉ. सुचेता दळवी, शिष्यवृत्ती कक्षाचे सदस्य प्रा.जे.डी.नाईक, प्रा. अमृता खेंदाड, प्रा. आरती चोळेकर, प्रा.योगिता झोपे आदी उपस्थित होते.
शासन आदेशानुसार शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून महाराष्ट्रामध्ये बिगर व्यावसायिक आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील आणि इतर मागास प्रवर्गातील, सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्गातील नवीन प्रवेशित तसेच पूर्वीपासून प्रवेश घेतलेला मुलींना शैक्षणिक शुल्क व परीक्षा शुल्क माफ करण्यात आले आहे.
या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी टिकाराम जगन्नाथ महाविद्यालयात महाविद्यालय स्तरावर शिष्यवृत्ती कक्ष स्थापन करून डॉ.सुचेता दळवी यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली. त्याचबरोबर महाविद्यालयाच्या दर्शनी भागात शिष्यवृत्तीची माहिती देणारा फलक ठळक अक्षरात लावण्यात आला. यापुढे महाविद्यालयातील सर्व मुलींना या योजनेचा फायदा घेता येणार आहे.





