अग्रलेख : उत्सवातील व्हीआयपी
मानाचे पाच गणपती असोत वा प्रसिद्ध श्रीमंत गणेश मंडळे, बाप्पाच्या दर्शनासाठी उसळणार्या जनसागरामुळे उत्सवाच्या काळात मध्यवर्ती भागात पुरता बोजवारा उडतो आणि त्यालाच हातभार लागतो तो व्हीआयपी (VIP at the Festival) संस्कृतीचा.

VIP at the Festival : महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी, विद्येचे माहेरघर आणि छत्रपती शिवरायांच्या उपस्थितीची अनुभूती देणारे पुणे शहर म्हटले की, डोळ्यांसमोर उभी राहते ती एक शिस्तप्रिय, विद्वानांची आणि संतांची परंपरा. समाजसुधारकांचा संपन्न वारसा. परंतु, अलीकडच्या काही वर्षांत या पुण्याचे रूप गणेशोत्सवाच्या (VIP at the Festival) काळात पूर्णपणे बदलून जाते आहे.
मानाचे पाच गणपती असोत वा प्रसिद्ध श्रीमंत गणेश मंडळे, बाप्पाच्या दर्शनासाठी उसळणार्या जनसागरामुळे उत्सवाच्या काळात मध्यवर्ती भागात पुरता बोजवारा उडतो आणि त्यालाच हातभार लागतो तो व्हीआयपी (VIP at the Festival) संस्कृतीचा. यामुळे आज पुण्याच्या सांस्कृतिक वैभवालाच वाहतूक कोंडीचे ग्रहण लागले आहे. कोंडी वा बजबजपुरी माजणे हा केवळ एका सणाचा प्रश्न नाही, तर तो नागरिकांच्या जगण्याच्या अधिकाराचा आणि नागरी शिस्तीचा गंभीर विषय उपस्थित करतो.
वास्तविक गणेशोत्सवाचे दिवस म्हणजे पुण्यासाठी एक आध्यात्मिक पर्वणी असते. कसबा गणपती, तांबडी जोगेश्वरी, गुरुजी तालीम, तुळशीबाग आणि केसरीवाडा या मानाच्या गणपतींच्या दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपर्यातून नव्हे, तर देशातून भाविक येतात. यासोबतच इतर काही प्रमुख मंडळे जगप्रसिद्ध झाली आहेत. लोकांची ही श्रद्धा आणि बाप्पाप्रती असलेली भक्ती पूर्णपणे आदरणीय आहे. प्रश्न श्रद्धेचा नसून, उत्सवाच्या काळात निर्माण होणार्या व्यवस्थापनाच्या ढिसाळपणाचा आणि महत्त्वाच्या व्यक्तींच्या म्हणजे माननीयांच्या लवाजम्याचा आहे.
जेव्हा एखादा व्हीआयपी किंवा राजकारणी गणपती दर्शनासाठी निघतो, तेव्हा संपूर्ण पुण्याच्या मध्यवर्ती भागातील वाहतूक व्यवस्था केवळ कागदावर उरते आणि प्रत्यक्षात बोजवारा उडतो. अचानक रस्ते बंद करणे, वाहतूक अन्यत्र वळवणे, ताफ्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांचा फौजफाटा तैनात करणे आणि सर्वसामान्य जनता तासन्तास रांगेत ताटकळत असताना व्हीआयपींसाठी रेड कार्पेट अंथरून त्यांना तत्काळ दर्शनाचा लाभ देणे, हे कोणत्या भक्ती संस्कृतीचे लक्षण आहे? बाप्पाच्या दरबारात राजा आणि सामान्य सगळेच समान असतात, असे आपण मानतो; त्याच्या दर्शनासाठी कोणालाही प्राधान्य नसते आणि मज्जावही नसतो. तसेच जे त्याच्या दर्शनासाठी आलेले नाहीत.
तथापि, आपली रोजची जगण्याची लढाई लढत कर्मवादाला प्राधान्य देत आपल्या व्यापात गुंतले आहेत त्यांच्या घरी जाण्याच्या अथवा कामाच्या ठिकाणी जाण्याच्या मार्गात व्यवधान निर्माण व्हावे अशी तर बाप्पाची बिलकुलच इच्छा नसते; परंतु व्यवहारात जे चित्र दिसते ते त्याच्या अगदीच उलट असते. महत्त्वाची मंडळी येतात. त्यांनी येऊ नये अशातला भाग नाही. मात्र, हल्ली आपली ताकद दाखवण्यासाठी त्यांनाही गळ घालून आणले जाते. तेही आपला माणूस दुखावू नये म्हणून मुंबईहून तर काही मंडळी चक्क दिल्लीहून वारी करतात. काही माननीयांच्या एक-दोन नव्हे तर तीन-तीन वार्या पुण्यात होतात.
वारी करणार्या व्हीआयपींनाही पुण्याच्या कोंडीचा झटका बसला आहे. तरीही केवळ त्यांच्या भक्तांच्या श्रद्धेसाठी ते पुण्याचा दौरा ऐन गणेशोत्सवाच्या काळात करतात. या व्हीआयपी दर्शनामुळे व अनियोजित बंदीमुळे लक्ष्मी रोड, बाजीराव रोड, शिवाजी रोड आणि केळकर रोड यांसारख्या शहराच्या मुख्य वाहिन्या पूर्णपणे ठप्प होतात.
सकाळी कामानिमित्त कार्यालयात जाणारे कर्मचारी, परीक्षा किंवा वर्गासाठी निघालेली शाळकरी मुले या कोंडीत अडकून पडतात. पीएमपीएमएलच्या बसेसचे मार्ग बदलल्यामुळे किंवा फेर्या रद्द झाल्यामुळे सर्वसामान्य पादचारी आणि बस प्रवाशांचे अतोनात हाल होतात. या सर्व प्रकारात सर्वात भयानक बाब म्हणजे रुग्णवाहिका. साध्या उपचारासाठी किंवा गंभीर अवस्थेत रुग्णालयात जाणार्या रुग्णांच्या जीवाला या वाहतूककोंडीमुळे (VIP at the Festival) धोका निर्माण होतो.
व्हीआयपींच्या सायरन वाजवणार्या गाड्या पुढे निघून जातात आणि मागे अॅम्ब्युलन्स व अन्य वाहने तासन्तास रखडतात, हे दृश्य कोणत्याही संवेदनशील मनाला पटणारे नाही. मध्यवर्ती पेठांमध्ये राहणार्या स्थानिक नागरिकांचे दु:ख तेच बिचारे जाणोत. घराबाहेर पडणे, वाहने पार्क करणे किंवा साधी दैनंदिन कामे करणेही अशक्य होऊन बसते. लहान व्यापार्यांचा सणासुदीचा व्यवसाय या कोंडीमुळे बुडतो, कारण ग्राहक मध्यवर्ती भागात येण्याचे टाळतात. हा प्रश्न आता केवळ वाहतूक पोलिसांच्या नियमनापुरता उरलेला नाही, तर तो नागरिकांच्या मूलभूत हक्कांचा आणि प्रशासकीय इच्छाशक्तीचा आहे.
जर पुण्याच्या या ऐतिहासिक गणेशोत्सवाला गालबोट लागायचे नसेल, तर काही कठोर पावले तातडीने उचलणे गरजेचे आहे. मानाच्या गणपतींमध्ये किंवा अन्य मंडळांमध्ये व्हीआयपींसाठी ऐन गर्दीच्या वेळी होणारी विशेष दाराची वा सवलतीची व्यवस्था पूर्णपणे बंद करावी. जमलेच तर त्यांनी नंतर किंवा त्यांच्या व मंडळांच्या सोयीने दूरस्थ दर्शनाचा लाभ घ्यावा. नेत्यांचे किंवा अधिकार्यांचे ताफे नियमांचे उल्लंघन करून चुकीच्या दिशेने जाताना आढळले, तर त्यांच्यावरही सामान्य नागरिकांप्रमाणेच कठोर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे.
कोणत्याही परिस्थितीत रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलाच्या गाड्यांसाठी ग्रीन कॉरिडॉरची अंमलबजावणी काटेकोरपणे व्हावी, जेणेकरून कोणाचा जीव कोंडीमुळे जाणार नाही. व्हीआयपी किंवा पाहुण्यांसाठी डिजिटल दर्शन किंवा ऑनलाइन प्रणाली उत्तम पर्याय आहे, जेणेकरून रस्त्यावर कोणताही लवाजमा उभा करण्याची वेळ येणार नाही. गणेशोत्सव हा आपल्या अस्मितेचा आणि आनंदाचा सोहळा आहे.
हा उत्सव उत्सवच असावा, त्रासाचा अनुभव नव्हे. श्रद्धेचा मान राखत असतानाच सर्वसामान्य नागरिकांचे दैनंदिन आयुष्य सुरळीत ठेवण्याची नैतिक जबाबदारी प्रशासन, गणेश मंडळे आणि लोकप्रतिनिधी या तिघांचीही आहे. जर व्हीआयपी संस्कृतीचा (VIP at the Festival) अट्टहास व त्यासाठी ताकद दाखवण्याचा उत्साह असाच सुरू राहिला, तर उद्याची पिढी या उत्सवाकडे आनंदापेक्षा एक त्रास म्हणून पाहू लागेल. बाप्पाच्या चरणी नतमस्तक होत असताना पुण्याच्या या वैभवाला शिस्तीची आणि समानतेची जोड देण्याची हीच ती खरी वेळ आहे!






