अग्रलेख : सत्य समोर यावेच!
दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अपघाती निधनाच्या संबंधातील संभ्रम आज त्यांच्या मृत्यूनंतर सुमारे दहा महिन्यांनंतरही कायम आहे. हा विषय रोहित पवार यांनी अत्यंत आक्रमकपणे लावून धरला आहे.

Ajit Pawar : दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अपघाती निधनाच्या संबंधातील संभ्रम आज त्यांच्या मृत्यूनंतर सुमारे दहा महिन्यांनंतरही कायम आहे. हा विषय रोहित पवार यांनी अत्यंत आक्रमकपणे लावून धरला आहे.
या अपघाताच्या संदर्भातील काही महत्त्वाचे मुद्दे त्यांनी यापूर्वीच मांडले असून, हा अपघात नसून घातपातच आहे असा निष्कर्ष त्यांनी त्या सुमारालाच काढला होता. पण मग जर तो घातपात असेल तर तो घडवला कोणी हा यातला मुख्य मुद्दा आहे.
त्यामुळे त्या अनुषंगाने रोहित पवार नव्याने काय माहिती सांगतात याविषयी सगळीकडे उत्सुकता होती. त्यानुसार रोहित पवार यांनी काल मुंबईत पत्रकार परिषद घेऊन थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिशेनेच अंगुली निर्देश केला आहे. हा घातपात देवेंद्र फडणवीस यांनीच घडवला आहे असे आपले म्हणणे नाही, पण हा घातपात घडवणार्या आरोपींना देवेंद्र फडणवीस वाचवत आहेत, असा त्यांचा थेट आरोप आहे.
रोहित पवार यांची पत्रकार परिषद होण्याच्या आधी मुंबईत आणि पुण्यात काही ठिकाणी एका मफलर मॅन विषयी संशय व्यक्त करणारी पोस्टर्स जारी करण्यात आली होती. हा मफलर मॅन कोण, याविषयीचा सस्पेन्स दोन दिवस जागवला गेला आणि सनसनाटी पद्धतीने रोहित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचा संशयित आरोपी असलेल्या व्यक्तींबरोबरचा मफलर मधला फोटो काल पत्रकारांपुढे सादर केला.
अजित पवार (Ajit Pawar) यांच्या ज्या विमानाला अपघात झाला ते विमान ज्या कंपनीच्या मालकीचे आहे त्या कंपनीच्या मालकावर रोहित पवार यांचा संशय आहे आणि त्या मालकाशी देवेंद्र फडणवीस यांचे व्यक्तिगत संबंध आहेत वगैरे आरोप त्यांनी कालच्या पत्रकार परिषदेत केले. निवडणुकीचा निकाल ज्या दिवशी जाहीर होणार होता नेमक्या त्याच दिवशी देवेंद्र फडणवीस या आरोपीशी संबंधित एका लग्न समारंभासाठी जयपूरला गेले होते तिथे त्यांच्याबरोबर घेतला गेलेला हा फोटो आहे.
त्यांचे म्हणणे असे की, राज्याच्या निवडणुकांची धुरा ज्या व्यक्तीच्या खांद्यावर होती ती व्यक्ती निवडणूक निकालाच्या दिवशीच असे बाहेरगावी कुठल्या एखाद्या लग्न समारंभाला जाण्याची शक्यता नाही, तरीही फडणवीस तिकडे गेले याचा अर्थ त्यांचा या संशयीतांशी खूप निकटचा संबंध आहे आणि तेच त्यांना वाचवत आहेत. त्यांच्या या आरोपामुळे पुरेशी सनसनाटी निर्माण झाल्यानंतर नेमक्या त्याच सुमाराला केंद्रीय गृहमंत्री अमित शहासुद्धा महाराष्ट्राच्या दौर्यावरच होते, नव्हे ते पुण्यातच होते. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याकडे अजित पवार यांच्या अपघात चौकशीचे काम त्वरित पूर्ण व्हावे अशी मागणी केली आहे.
यातील दोषींना फासावर लटकवण्याचे मनोगतसुद्धा त्यांनी व्यक्त केले आहे. याद्वारे फडणवीस यांनी आपल्यावरील संशयाचे मळभ दूर लोटण्याचा प्रयत्न केला आहे. हे जरी खरे असले तरी मूळ विषयावरून निर्माण झालेले संशयाचे धुके पूर्णपणे दूर झालेले नाही. एक तर या अपघाताच्या चौकशीला होत असलेला कमालीचा विलंब हे यातील एक मुख्य कारण असून दुसरे मुख्य कारण असे की या प्रकरणात अद्याप महाराष्ट्र पोलिसांनी एफआयआरसुद्धा दाखल केलेली नाही.
एखाद्या राज्याचा उपमुख्यमंत्री ज्या अपघातात दगावला आहे त्या अपघाताविषयी एफआयआर नोंदवण्यासाठी केली जाणारी ही टाळाटाळ संशयाचे धुके बळकट करणारीच ठरते, याचे भान राज्यातल्या आणि केंद्रातल्या विद्यमान सरकारांना यायला हवे होते, पण ते अजून काही आलेले दिसले नाही.
या प्रकरणात एफआयआर दाखल व्हावा यासाठी रोहित पवार यांनी खूप आटापिटा केला, पण त्यांना शेवटपर्यंत यश आले नाही. अखेर त्यांनी कर्नाटकात जाऊन तेथील काँग्रेस सरकारच्या मार्फत या प्रकरणी एफआयआर नोंदणी केली आहे, आता तो एफआयआर पुढील तपासासाठी महाराष्ट्र पोलिसांकडे वर्ग केला गेला असावा. एफआयआर नोंदवण्यासाठीची रोहित पवार यांची अनोखी शक्कल खूप काही सांगून जाणारी आहे आणि ती राज्यातील विद्यमान सरकारच्या विरोधातील संशयाचे वातावरण आणखीन गडद करणारी ठरली आहे.
हा सगळा तपशील ऐकल्यानंतर आणि वाचल्यानंतर लोकांच्या मनातही अनेक प्रकारच्या शंका उपस्थित होताना दिसत आहेत. काल रोहित पवार यांनी फडणवीस यांचे नाव घेऊन आरोप केल्यानंतर फडणवीस यांच्या समर्थकांनी रोहित पवार यांच्यावर जोरदार तोंडसुख घेतलेले दिसले, पण ही केवळ राजकीय स्वरूपाची चिखलफेक आहे त्यातून सत्य समोर येणार नाही किंवा लोकांच्या मनातील संभ्रमही दूर होणार नाही. त्यामुळे या सगळ्या प्रकाराची तंत्रशुद्ध पद्धतीने तातडीने शहानिशा होणे गरजेचे आहे.
एखाद्या गंभीर अपघातात एखाद्या राज्याचा उपमुख्यमंत्री दगावणे आणि त्या प्रकरणाची चौकशी महिनोन् महिने लांबवत ठेवणे हे कोणत्याच अर्थाने योग्य मानले जाऊ शकत नाही. त्यामुळे हा विषय आता ऐरणीवर आला असल्याने, तसेच संशयाची सुई थेट मुख्यमंत्री फडणवीस यांच्याच दिशेने गेली असल्याने तरी या प्रकरणाच्या चौकशीला वेग येईल अशी अपेक्षा आहे.
नुसत्या चौकशीला वेग येऊनही उपयोग नाही तर यातील नेमके सत्यही सगळ्यांच्या पुढे तातडीने येणे गरजेचे आहे. यासाठी केंद्र सरकारकडूनही तातडीने उपाय योजना (Ajit Pawar) केली जाईल अशी अपेक्षा आहे.






