अग्रलेख : हिमकड्यांची आर्त किंकाळी

काही दिवसांपूर्वी निसर्गरम्य स्वित्झर्लंडमध्ये हिमस्खलनाची घटना घडली. आल्प्सचा महाकाय ग्लेशियर पर्वतरांगेत असलेल्या ब्लॅटन गावावर कोसळला आणि अख्खे गाव त्यात गाडले गेले. सुदैवाने तेथील तीनशे जणांना अगोदरच सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. प्रशासनाने वेळीच खबरदारी घेतल्याने लोकांचे जीव वाचले. ग्लेशियरला तडे आणि तुटण्याची शयता पाहून प्रशासनाने वेगाने हालचाली केल्या. गेल्या काही वर्षांमध्ये जागतिक तापमानवाढीमुळे हिमकडे तुटण्याच्या किंवा कोसळण्याच्या घटना वाढत आहेत. संयुक्त राष्ट्राने ग्लेशियर संरक्षणासाठी 2025 हे आंतरराष्ट्रीय वर्ष म्हणून घोषित केले आहे.
याच वर्षात पॅरिस कराराला दहा वर्षे पूर्ण होत आहेत. त्यात अनेक देशांनी औद्योगिक क्रांतीच्या अगोदरपासून वाढलेले दीड अंशाचे तापमान मर्यादित ठेवण्याबाबत बांधिलकी व्यक्त केली आहे. या स्तरावर तापमान रोखणे हे ग्लेशियरची हानी थांबविण्याचा एकमेव पर्याय आहे. साहजिकच यावर्षी आपल्याला कमी उत्सर्जन करावे लागेल. आज जागतिक पर्यावरणाचे अभ्यासक कालांतराने ग्लेशियर्स लुप्तही होऊ शकतात, असा इशारा देत आहेत. आपण आताच सावध झालो नाही तर जगभरातील समुद्राची पातळी वाढून आपल्या विकासाच्या इमल्यांना जलसमाधी मिळेल.
वाढती उष्णता आणि हिवाळ्यात कमी होणारी हिमवृष्टी पाहता हिमनदी पुढे (आकार आणि द्रव्यमान) जाण्यासाठी पुरेशा प्रमाणात बर्फ तयार करण्याचे काम थांबवू शकते. परिणामी हिमनदीचे अस्तित्व हळूहळू संपुष्टात येऊ शकते. गेल्या महिन्यात शास्त्रज्ञांनी विविध समुदाय आणि स्थानिक सरकारच्या प्रतिनिधींशी ग्लेशियरचे कमी होणार्या प्रमाणाबाबत व्यापक बैठक घेतली. जागतिक हवामान विज्ञान संस्थेच्या 2024चा जागतिक हवामान बदलाचा अहवाल पाहिला तर मागचे वर्ष हे गेल्या 175 वर्षातील सर्वात उष्ण वर्ष असल्याचे म्हटले आहे.
याप्रमाणे मार्च महिन्यात प्रकाशित संयुक्त राष्ट्राच्या एका अहवालात जागतिक तापमान आणि उत्सर्जन यातील वाढ पाहता पर्वतरांगावर होणार्या परिणामाची माहिती दिली आहे. यात 21व्या शतकात अनेक पर्वतीय हिमनद्या नामशेष होऊ शकतात, असे म्हटले आहे. दुर्दैवाने अन्य नैसर्गिक घटनांप्रमाणे पर्वतावरील ग्लेशियर, बर्फ आणि पर्माफ्रॉस्ट (साचलेल्या बर्फाची जमीन)मध्ये होणारा बदल हा प्रसारमाध्यमातून ठळकपणे दिसत नाही. जंगलातील वणवा, उष्णतेची लाट या गोष्टी जगासमोर सातत्याने कोणत्या ना कोणत्या माध्यमातून येत असताना ग्लेशियर वितळण्याचा मुद्दा हा गौण मानला जातो.
विशेष म्हणजे पृथ्वीवरील 60 ते 70 टक्के गोड्या पाण्याचे स्रोत म्हणून याकडे पाहिले जाते. त्यामुळे संयुक्त राष्ट्राचे ताजे निष्कर्ष आपल्यासाठी चिंतेचा विषय असायला हवेत. धु्रवीय बर्फ वेगाने वितळत असल्याने समुद्राची पातळी वाढत असून सखल भागात पुराचा धोका वाढत आहे. परंतु पर्वतीय ग्लेशियर आणि बर्फ वितळल्याचा फटका तुलनेने लवकर बसू शकतो आणि तो काहीवेळा विनाशकारीदेखील असू शकतो. अनेकदा तर अर्थकारण आणि मानवी वस्तीवरही त्याचा थेट परिणाम होऊ शकतो. अर्थात, ग्लेशियर वितळण्याचे एवढे विदारक चित्र आशिया खंडाव्यतिरिक्त अन्य कोणत्याही खंडात दिसत नाही.
आशिया खंडात तर निम्मी लोकसंख्या नदीकाठावरच राहते. या नद्यांचा उगम हिंदकुश हिमालयातून होतो. हिंदकुश ही 3500 किलोमीटर लांबीची पर्वतरांग आहे. दोन धुव्र वगळता या ठिकाणी अन्य कोणत्याही क्षेत्रापैकी सर्वाधिक बर्फ जमा होतो. बर्फ वितळण्याची प्रक्रिया ही आजची नाही. वर्ल्ड ग्लेशियर मॉनिटरिंग सर्व्हिसच्या एका अभ्यासानुसार, 2000 ते 2023 या काळात पर्वतीय हिमनदीने सहा ट्रिलियनपेक्षा अधिक बर्फ कमी झाला आहे. अर्थात हा ग्लेशियर एकूण वस्तुमानाच्या केवळ 5.4 टक्के आहे. बर्फ सध्या वेगाने वितळत आहे. कारण संशोधन होण्यापूर्वीच्या दशकांपासून ते पुढच्या दशकांपर्यंत वितळण्याच्या प्रमाणात 36 टक्के वाढ नोंदली गेली. यात युरोपातील आल्प्सला सर्वाधिक फटका बसला.
या ठिकाणी शतकाच्या प्रारंभापासूनच आतापर्यंत ग्लेशियरचा 39 टक्के भाग वितळला आहे. ‘रॉकीज’ने देखील आपल्या वस्तुमानाचा स्वत:चा वाटा जवळपास गमावला आहे. आशियातील (चीन, अफगाणिस्तान, नेपाळ, भारत, पाकिस्तान, भूतान, कझकिस्तान, उझबेकिस्तान, किर्गिजस्तान आणि ताजिकिस्तानचा पर्वतीय भाग) हिमकडे आणि ग्लेशियर वितळण्याची प्रक्रिया सर्वात शेवटी होऊ शकते. मात्र या ठिकाणी ग्लेशियरच्या एकूण वस्तुमानाचा पाचवा भाग वितळला आहे. ग्लेशियरच्या आकारात संथ घसरण ही भारत आणि संपूर्ण पर्वतीय भागातील धोरणकर्ते, अर्थतज्ज्ञ आणि सर्वसामान्यांसाठी दिलासादायक ठरणार नाही. या पर्वतातून वाहणार्या दहा प्रमुख नद्यांच्या खोर्यातूनच आशिया खंडातील अर्थकारण अवलंबून आहे.
ग्लेशियरचे तज्ज्ञ हैदी सेवेत्रे यांच्या मते, गंगा, ब्रह्मपुत्र आणि सिंधू पाण्याने निर्माण होणारे संकट हे या ठिकाणच्या नद्यांना (यात चार मोठ्या नद्यांचा समावेश आहे) ‘क्रायोस्फियर’ बदलाच्या दृष्टीने संवेदनशील करणारे आहे. ग्लेशियर वितळल्याने या भागातील दहा प्रमुख नद्यांच्या काठावर राहणार्या लोकांसमोर पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. ‘इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माउंटेन डेव्हलपमेंट’च्या मते, या भागातील अंदाजित लोकसंख्या ही दोन अब्जपेक्षा अधिक असून त्यापैकी 31 टक्के लोक अन्नसुरक्षेपासून दूर आहेत आणि 50 टक्के लोक कुपोषणाचा सामना करत आहेत.
आगामी काळात पावसाच्या पाण्याच्या उपलब्धतेत चढउतार आणि दुष्काळाची चिन्हे आहेत. 2050 नंतर या नद्यांतील पाण्याचा प्रवाह कमी होण्याची शक्यता आहे. पाण्याचा प्रवाह कमी झाल्यास, दुष्काळ पडल्यास हिंदकुश हिमालय क्षेत्रात खाद्यान्न, पाणी, वीज आणि उपजीविका सुरक्षा संकटात सापडू शकते आणि त्याचबरोबर वातावरणाची हानी होऊ शकते. शिवाय संघर्ष आणि स्थलांतराचे प्रमाण वाढू शकते.





