अग्रलेख : शिक्षणाचा विचका

राजस्थानातील एका अत्यंत महत्त्वाच्या आणि सगळ्यांत गंभीर आणि धक्कादायक घटनेकडे दुर्लक्ष झाले. राजस्थानच्या झालावाड जिल्ह्यात शाळेच्या एका जीर्ण झालेल्या इमारतीचे छप्पर कोसळले आणि त्यात सात लहान मुलांचा मृत्यू झाला. ज्यांनी आपली मुले या घटनेत गमावली त्यांचा आक्रोश ही अन्य लोकांसाठी अथवा सरकारी व्यवस्थेसाठी केवळ काही क्षण अथवा तास पाहावी आणि ऐकावी लागेल अशी घटना आहे, असे मानण्याइतपत कोडगेपणा आता सगळ्यांच्याच अंगात भिनला आहे.
आपल्याला सोपवलेले काम पूर्ण मन लावून करावे, निष्ठेने आणि प्रामाणिकपणे करावे असे ज्या शाळेत शिकवले जाते त्या शाळेत जर निरागस मुले मृत्यू पावत असतील तर हे शिकवणारे आणि शिकवण्यासाठी त्यांना आणणारे यांना सगळ्यांनाच आपापल्या जबाबदार्यांचा विसर पडला आहे हे स्पष्ट आहे. आम्ही धोकादायक शाळांची जी यादी मागितली होती त्यात कथित शाळेचे नावच नव्हते असे अधिकार्यांनी म्हटले. एवढे रूक्ष उत्तर त्यांना सात मुलांच्या अकाली मृत्यूतून सुटका करून देण्यासाठी पुरेसे ठरणार असल्याचे सध्यातरी दिसते.
ते एकवेळ हात झटकून मोकळे होतील किंवा तसे करू शकतील, मात्र ज्या शाळेत ती मुले शिकत होती तेथील शिक्षकांना हा धोका जाणवला नाही? या शिक्षकांना स्वत:च्या जीवाचीही भीती वाटली नाही? ते शाळेत नक्की जात होते ना ज्ञानदानाच्या कामाला की त्यांचा बहुमूल्य वेळ त्यांनी अन्य महत्त्वाच्या कामांसाठी राखून ठेवला होता? घटना एका ठिकाणी घडली असली तरी पहिली नाही आणि आपली जाड कातडी जोपर्यंत संबंधितांकडून बाजूला सारली जात नाही तोवर शेवटचीही नसणार आहे. देशातील प्रत्येक राज्यात हीच अवस्था थोड्याफार फरकाने आहे.
देशाला महाशक्ती करण्याच्या चर्चा होतात, त्या व्हाव्यात त्याला विरोध नाही मात्र आज आपण नेमके कुठे उभे आहोत याकडेही लक्ष देण्याची तसदी वरपासून खालपर्यंत सगळ्यांनी घ्यायला हवी. भारतातील अनेक ग्रामीण शाळांना पायाभूत सुविधांच्या आव्हानांना तोंड द्यावे लागते. इमारतींची खराब स्थिती, मूलभूत सुविधांचा अभाव याचा शैक्षणिक वातावरणावर नकारात्मक परिणाम होतो इतपत ठीक होते, मात्र आता सुरक्षिततेवरही त्याचा परिणाम होतो आहे. शहरी भागांच्या तुलनेत ग्रामीण भागातील स्थिती अधिक खराब आहे. अनेक शाळांमध्ये स्वच्छ पाणी, शौचालये, वीज आणि पुरेशा वर्गखोल्या यासारख्या मूलभूत गोष्टी नाहीत. त्यातून गळती वाढते किंवा अपार संघर्ष करत मुलींना शिक्षण घ्यावे लागते.
गळकी छप्परे, पडण्याच्या बेतात आलेल्या भिंती आणि अपुरी जागा अशा अवस्थेत शिक्षण सुरू आहे. विद्यार्थ्यांना त्यातच आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करून स्वत:चा विकास करवून घ्यायचा असतो. जोपर्यंत येथील विद्यार्थी मोठ्या शहरांत आणि व्यापक जगात दाखल होत नाहीत तोपर्यंत चालून जाते, पण ज्यावेळी ते स्पर्धेमध्ये उतरतात त्यावेळी त्यांना आपण किती मागे आहोत याची जाणीव होते आणि यात त्यांचा दोष नसतो. अर्थात ज्या विद्यार्थ्याला याचे म्हणजे शिक्षणाचे महत्त्व समजले असते त्यालाच याची जाणीव होते. परिस्थितीमुळे आणि त्याच्या भागात सुविधा उपलब्ध करून देण्याच्या प्रशासकीय यंत्रणेच्या उदासीनतेचा त्याला फटका सहन करावा लागतो; मात्र त्याला थांबता येत नाही.
सगळ्या अडथळ्यांवर मात करत त्याला दुप्पट वेगाने आणि प्रसंगी जीवाच्या आकांताने धावावे लागते. पात्र आणि लायक शिक्षक मिळत नाहीत. शिक्षकांना आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर पडत अन्यत्र फरफटत जाण्याची तयारी नसते. विद्यार्थी हा त्यांचा केंद्रबिंदूच नसल्याचे बहुतांश शिक्षकांच्या वर्तणुकीत आढळून येते. सगळेच शिक्षक या वर्गात मोडतात असे नाही, मात्र चांगल्या शिक्षकांची आणि व्रत म्हणून शिक्षकी पेशा स्वीकारल्याची संख्या आता खरेच किती राहिली असेल याचे संशोधन प्रत्येकाला सहज करता येऊ शकते. अशा एकूणच निराशाजनक वातावरणात शिक्षणाबद्दल आपण अनुकूलता निर्माण करत आहोत की प्रतिकूलता याचाही गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे.
माझ्या शहरात अथवा माझ्या तालुक्यात मी असले काही पाहिले नाही म्हणून सगळीकडे सर्वकाही सुरळीत सुरू आहे आणि अत्यंत उच्च दर्जाच्या वातावरणात सगळे शिकत आहेत आणि येथे तयार होणारे विद्यार्थी उद्या राष्ट्राचे भविष्य घडवणार आहेत या स्वप्नरंजनात आताच्या काळात कोणीही न राहिलेलेच बरे. झालावाडसारखी एखादी घटना घडली की राज्य प्रशासन फतवा काढून तपासणीचे आदेश जारी करते. काही राज्ये जागरूक असतात. अन्य राज्यात एखादी घटना घडली की ते तातडीने आपल्या राज्यात पुढाकार घेत स्वत:हून तपासणीची मोहीम सुरू करतात. मात्र त्यात प्रामाणिकपणाने काम करण्यापेक्षा दिखावाच अधिक असतो. बरे सरकार प्रामाणिक असेलही तरी खाली काम करणारी मंडळी पाट्या टाकणार नाहीत याची शाश्वती कोणी देऊ शकत नाही.
याकरताच या आव्हानांना तोंड देण्यासाठी बहुआयामी दृष्टिकोन आवश्यक आहे, ज्यामध्ये पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करणे, पुरेशी शिक्षण संसाधने उपलब्ध करणे आणि पुरेशा संख्येने पात्र शिक्षक मिळणे अथवा मिळवणे महत्त्वाचे आहे. दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शिक्षकांना आवश्यक कौशल्ये आणि ज्ञानाने सुसज्ज करण्यासाठी शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये गुंतवणूक करणे जेवढे महत्त्वाचे आहे तेवढेच व्यावहारिक कौशल्ये शिकवण्यासाठी अभ्यासक्रमाचे आधुनिकीकरण करणे गरजेचे आहे. सर्व मुलांना, त्यांची पार्श्वभूमी काहीही असो, दर्जेदार शिक्षण सुरक्षित वातावरणात उपलब्ध व्हावे. अन्यथा विकसित भारताचा संकल्प आणि त्यासंदर्भात केलेल्या घोषणा या केवळ आणि केवळ सोपस्काराचा भाग ठरेल.





