अग्रलेख : सात्विक आवाजाची जादू
ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर (Suman Kalyanpur) या आपल्या सुरेल आणि सात्विक गायकीचा मोठा खजिना मागे ठेवून अनंताच्या प्रवासाला निघून गेल्या. ही गायिका खरोखरच अविट गोडीच्या सुरांची गायिका म्हणून ओळखली गेली आहे.

Suman Kalyanpur : ज्येष्ठ पार्श्वगायिका सुमन कल्याणपूर (Suman Kalyanpur) या आपल्या सुरेल आणि सात्विक गायकीचा मोठा खजिना मागे ठेवून अनंताच्या प्रवासाला निघून गेल्या. ही गायिका खरोखरच अविट गोडीच्या सुरांची गायिका म्हणून ओळखली गेली आहे.
त्यांनी 700 हून अधिक चित्रपटांमध्ये पार्श्वगायन केलं असलं आणि हिंदीसह अनेक भारतीय प्रादेशिक भाषांमध्येही गायन केलं असलं, तरी सुमनताईंचे (Suman Kalyanpur) मराठी भक्ती संगीत आणि भावगीत क्षेत्रातील योगदान मराठी रसिकांना कधीच विसरता येणार नाही.
1956 पासून त्या गात होत्या. त्या सुमाराला आणि त्यानंतरच्या काळातही पार्श्वगायन किंवा एकूणच संगीतक्षेत्रात दिग्गज महिला गायिकांची फौज आपापल्या परीने गाजत होती. पार्श्वगायन क्षेत्रात अत्यंत दृढ आणि लोकप्रिय झालेल्या सगळ्या गायिकांच्या तुलनेत सुमनताईंचा वेगळा सात्विक आवाज रसिकांच्या मनात कायमस्वरूपी घर करून राहिला आहे.
त्यांना मधल्या काळात हिंदी चित्रपटसृष्टीतही मोठा वाव मिळाला. मोहम्मद रफी या ज्येष्ठ गायकाबरोबरची त्यांची असंख्य गाणी कमालीची लोकप्रिय झाली. त्यामुळे त्या पार्श्वगायन क्षेत्रात त्यांच्या समकालीन गायिकांना मागे टाकून क्रमांक एकच्या गायिका होतील असे वाटत असतानाच त्यांच्या गायनाला अचानक ब्रेक लागला. किंबहुना त्यांनी स्वतःहूनच मधल्या काही काळात पार्श्वगायन क्षेत्रापासून स्वतःला दूर ठेवले होते.
आपल्याकडे सगळ्याच क्षेत्रात राजकारण असते तसेच राजकारण कलेच्याही क्षेत्रात आहे. त्याच राजकारणाचा फटका बहुधा या गुणी गायिकेला बसला असावा; परंतु सुमनताईंनी (Suman Kalyanpur) त्याचा कधीच गवगवा केला नाही. कोठे त्याविषयी त्यांनी आगपाखड केल्याचेही ऐकिवात आले नाही. सुमनताईंनी हिंदी चित्रपटसृष्टीत स्वतःचे मोठे नाव होत असतानाही मराठी भक्ती संगीत आणि भावसंगीत क्षेत्रातील आपले योगदान नेमस्तपणे चालू ठेवल्याने मराठी रसिकांना त्यांच्या सुरेल गाण्याचा आनंदाचा ठेवा कायमस्वरूपी उपलब्ध झाला आहे.
मराठीतही अनेक संगीतकारांकडे त्यांनी आपली गायनसेवा बजावली पण त्यातही दशरथ पुजारी आणि सुमनताई या जोडीने दिलेली गाणी लोकांच्या दीर्घकाळ स्मरणात राहिली आहेत. एखादा गायक कलाकार केवळ आपल्या गाण्यातून रसिकांच्या मनात किती सात्विक आनंद निर्माण करू शकतो याचे प्रात्यक्षिकच सुमनताईंनी घडवले आहे.
चित्रपट संगीत किंवा एकूणच संगीत, गायन या क्षेत्रात एखादे नाव चलनी नाणे झाले की मग त्या कलाकाराला वेगवेगळ्या पद्धतीने वापरून घेण्याचा प्रयत्न सगळ्याच संगीतकारांकडून होत असतो. त्यामुळे काही वेळेला अत्यंत सुमार दर्जाची गाणीसुद्धा त्यांच्याकडून गाऊन घेतली जातात, पण सुमनताईंचे वैशिष्ट्य असे की त्यांनी मोजकेच काम केले पण गाण्याचा दर्जा उत्कृष्टच राहील याची दक्षता कायम घेतली.
पूर्वीच्या काळात म्हणजे दूरदर्शन येण्याच्याही आधी सगळ्यांच्या मनोरंजनाचे साधन केवळ रेडिओ होते. त्यातही आकाशवाणीच्या महाराष्ट्रातील विविध केंद्रांनी मराठी साहित्य संस्कृती क्षेत्राचा अमोल खजिना रसिकांपुढे सातत्याने खुला केला आणि मराठी रसिकांना या क्षेत्रातील नवनवीन प्रवाहाशी जोडलेले ठेवले. त्यामुळे आकाशवाणीच्या सकाळच्या सत्रातील भक्तिगीते आणि अन्य वेळेतील भावगीते जेव्हा मराठी रसिक आवर्जून ऐकत असत, त्यावेळी गायिका सुमन कल्याणपूर अशी घोषणा झाल्यानंतर मराठी रसिकांचे कान आवर्जून टवकारले जात.
सुमनताईंना रेडिओवरून ज्यांनी ऐकले तेवढ्यापुरतेच रसिक आणि सुमनताईंचे नाते मर्यादित राहिले. सुमनताईंना जवळून पाहण्याची, ऐकण्याची अनेक रसिकांना ओढ होती, पण त्यांनी संगीताचे असे फारसे जाहीर कार्यक्रम केले नाहीत. त्यांनी टीव्हीवरही नंतरच्या काळात फारशा प्रकट मुलाखती दिलेल्या नाहीत.
अगदी अलीकडच्या काळात त्यांच्या काही तुरळक ठिकाणी प्रकट मुलाखतींचा कार्यक्रम होत असे. त्यातूनच त्यांचे रसिकांना प्रत्यक्ष दर्शन घडत असे. वास्तविक आपला आवाज आणि आपली गाणी लोकप्रिय झाल्यानंतर ती लोकप्रियता कॅश करण्यासाठी सगळेच कलावंत देश-विदेशात गाण्याच्या कार्यक्रमांचे शो करत असत, पण सुमनताईंनी हा उठवळपणा टाळला.
मुलाखती मागून मुलाखती देऊन स्वतःला प्रसिद्धीच्या झोतात ठेवण्याचा सोसही त्यांनी कधी दाखवला नाही. त्यांना सध्याच्या विविध वाहिन्यांवरील संगीत रियालिटी शोमध्ये सेलिब्रिटी परीक्षक म्हणूनही स्वतःला मिरवण्याची संधी होती पण त्यांनी त्यातही फारसे स्वारस्य दाखवले नाही. नेमस्तपणे आपले काम करत राहणे, रसिकांना उत्तम तेच देणे हा एक कलमी कार्यक्रम त्यांनी जपला होता.
सुमनताई प्रसिद्धीपासून कायम अशा फटकून का राहिल्या याचा उलगडा कधी झाला नाही. दिवाळी अंक आणि अन्य संगीतविषयक अंकांमध्ये त्यांच्यावर अधूनमधून लेख येत असत, एवढीच काय ती त्यांना मिळणारी प्रसिद्धी असे. पुरस्कारांच्या झगमगटापासूनही त्या काहीशा अलिप्तच राहिल्या. पार्श्वगायन क्षेत्रात अत्यंत देदीप्यमान योगदान देऊनही त्यांचा सरकारी पातळीवरून सन्मान व्हायला 2023 हे साल उजाडावे लागले.
त्यावेळी त्यांचा केंद्र सरकारकडून पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरव झाला आहे. त्यांना बाकीचेही बरेच पुरस्कार मिळाले आहेत पण त्यांच्या एकूण कामगिरीच्या पार्श्वभूमीवर आणि त्यांच्या एकूण उंचीच्या मानाने त्यांची फारशी कदर झाली नाही हे मात्र येथे नमूद करावे लागेल. माध्यम क्षेत्रात संगीतावर लिहिणारे अनेक नामवंत पत्रकार, लेखक आहेत, पण त्यांच्याकडूनही सुमनताईंच्या (Suman Kalyanpur) पदरात योग्य माप पडले नाही ही गोष्टही तितकीच खरी आहे. या गुणी कलावंताला भावपूर्ण श्रद्धांजली.






