अग्रलेख : दहशतीचे ग्लॅमर
रविवारी संध्याकाळी अभिनेता टायगर श्रॉफवर (Tiger Shroff) गोळीबार झाला. तो त्याच्या कारमध्ये असताना गोळ्या झाडल्या गेल्या. सुदैवाने टायगर थोडक्यात बचावला, पण त्याचा ड्रायव्हर आणि एक रिक्षाचालक जखमी झाले.

Tiger Shroff : रविवारी संध्याकाळी अभिनेता टायगर श्रॉफवर (Tiger Shroff) गोळीबार झाला. तो त्याच्या कारमध्ये असताना गोळ्या झाडल्या गेल्या. सुदैवाने टायगर थोडक्यात बचावला, पण त्याचा ड्रायव्हर आणि एक रिक्षाचालक जखमी झाले. मुंबई पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या काही तासांतच राजस्थानच्या कोटा स्थानकावरून तीन संशयितांना जेरबंद केले.
घटना ताजी असतानाच महाराष्ट्राचे राजकारण तापले असून विरोधक आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच राज्याचे गृहखाते असल्यामुळे त्यांच्यावर टीका केली जाते आहे. फडणवीस यांच्या काळात महाराष्ट्रात जंगल राज आले आहे, गुन्हेगारांना पोलिसांची भीती उरलेली नाही, असा शाब्दीक हल्ला काँग्रेसचे हर्षवर्धन सकपाळ, सचिन सावंत, वर्षा गायकवाड यांच्यासह राष्ट्रवादीचे रोहित पवार आणि शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सुषमा अंधारे यांनी केला आहे व सरकारला धारेवर धरले. विरोधी पक्षांचे हे आरोप अगदीच चुकीचे नाहीत.
ज्या राज्यात अभिनेते, राजकारणी आणि सामान्य नागरिक सुरक्षित नाहीत, तिथे कायदा आणि सुव्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. महाराष्ट्राचा लौकिक असा नव्हता. हे एक प्रगत आणि संपन्न राज्य होते आणि आहे. त्यामुळेच देशाच्या विविध भागांतून आपले पोट भरण्यासाठी येथे लोकांची ये-जा असते. राज्याच्या त्या प्रतिमेला अशा घटना नक्कीच तडा देतात. अर्थात या संपूर्ण प्रकरणाची दुसरी बाजू त्याहूनही अधिक भयानक आहे व त्यावरही फार उशीर होण्याच्या आत विचार करण्याची गरज आहे.
देशातील अथवा अन्य कुठल्याही पारंपरिक गुन्हेगारीचा इतिहास पाहिला तर गुन्हेगार गुन्हा केल्यानंतर लपून राहतात, जेणेकरून पोलिसांच्या हाती पुरावे लागणार नाहीत. पण आजच्या आधुनिक संघटित गुन्हेगारीचा पॅटर्न पूर्णपणे बदलला आहे. आता गुन्हा लपवण्यात नाही, तर त्याची ढोलकी वाजवण्यात भूषण वाटते. गँगस्टर म्हणवणार्या लोकांनी हा नवा पायंडा पाडला आहे. टायगर श्रॉफवरील हल्ल्यानंतर काही वेळातच सोशल मीडियावर एक स्क्रीनशॉट झळकला. हा गोळीबार लॉरेन्स बिश्नोई गँगने केला असल्याचा दावा त्यात करण्यात आला.
यापाठोपाठ अमेरिकेतून अनिल पंडित नावाचा गँगस्टर ऑडिओ क्लिप जारी करून बॉलीवूडला म्हणजे हिंदी चित्रपटसृष्टीला धमकावतो. ऑक्टोबर 2024 मधील राजकीय नेते बाबा सिद्दीकी यांची हत्या असो, फेब्रुवारी 2026 मधील निर्माता, दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या घराबाहेरील गोळीबार असो किंवा आता टायगर श्रॉफ प्रकरणातील हल्ले असोत; प्रत्येक घटनेनंतर हाच खेळ पाहायला मिळतो. तो आता एक ट्रेंड झाला आहे. याचा मुख्य उद्देश एखाद्या व्यक्तीची हत्या करणे हा तर असतोच, पण त्यासोबतच सिनेसृष्टीत आणि व्यावसायिक वर्तुळात दहशतीचा एक मोठा ब्रँड तयार करणे हाही असतो.
सेलिब्रिटींवर (Tiger Shroff) हल्ले झाले की प्रसारमाध्यमांमध्ये त्याला मोठी जागा मिळते, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून त्यावर मोठ्या आवाजात चर्चा झडतात. अनेक तज्ज्ञांना बोलावले जाते आणि ते आपली मते जोरकसपणे मांडतात आणि हीच फुकटची प्रसिद्धी या टोळ्यांचे बळ म्हणजे दहशत वाढवते, जी पुढे खंडणीच्या वसुलीसाठी त्यांना फायदेशीर ठरते.
हिंदी चित्रपटांतही हे सगळे दाखवले गेले आहे. पोलिसांचा सायबर सेल कितीही अत्याधुनिक झाला असला, तरी या गुन्हेगारांनी तपासाला चकवा देण्यासाठी नवी पद्धती शोधून काढली असल्याचे दिसते. तसे नसते तर प्रत्येक हल्ल्यानंतर इतक्या राजरोसपणे त्यांनी त्याची जबाबदारी स्वीकारली नसती. यात साधारणत: असे होत असावे की एक बनावट अकाउंट तयार केले जात असेल, त्यावर गुन्ह्याची जबाबदारी स्वीकारणारी पोस्ट टाकायची, त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आणि मूळ पोस्ट डिलीट करून टाकायची.
आता पोलिसांच्या हाती मूळ पोस्टचा कोणताही डिजिटल पुरावा किंवा लिंक उरत नाही. सोशल मीडियावर केवळ एक स्क्रीनशॉट फिरत राहतो. थोडक्यात, दहशत निर्माण करण्याचा हेतू साध्य तर करायचाच, मात्र त्याचवेळी भविष्यात अडचणीत आल्यावर ती पोस्ट आमची नव्हती असा पवित्राही घेता येऊ शकतो. दुर्दैव असे की चित्रपटांपेक्षाही या गुन्हेगारांना, त्यांच्या रिल्सना आणि त्यांच्या संदर्भातील व्हिडिओंना प्रचंड पसंती सोशल मीडियावर मिळते आहे. त्यांना अगदी नायक बनवले गेले असल्याचे प्रकारही समोर येत आहेत.
प्रत्यक्ष गोळीबार (Tiger Shroff) करणारे केवळ प्यादे असतात. त्यांना तुरूंगात अथवा परदेशात असणार्या त्यांच्या गँगस्टर म्होरक्याचे आकर्षण म्हणा किंवा फुटकळ पैशांसाठी हे शूटर आपल्या स्वत:च्याच आयुष्याशी खेळत ते बरबाद करून घेतात. टायगरच्या आणि त्याच्या अगोदर रोहित शेट्टी प्रकरणाच्या तपासातही हेच समोर आले होते. अशा गँगस्टर भक्त शूटर्सची संख्या काही हजारांच्या घरात आहे व त्यांचा कोणताही रेकॉर्ड पोलीस दप्तरी नाही असे म्हटले जाते. हे अत्यंत गंभीर आहे.
गुन्हेगार किंवा गुन्हेगारी जगतात प्रवेश करू पाहणारे हे तरूण पूर्णत: भरकटलेले आणि दिशाहिन झाले आहेत, मात्र त्यांना हुडकून काढणेच सगळ्यांत कठीण आहे. हे तरुण इन्स्टाग्रामवर थेट मेसेज करून या टोळ्यांशी जोडले जातात आणि भाडोत्री मारेकरी बनतात. याचा अर्थ स्पष्ट आहे की सोशल मीडिया ही केवळ धमकी देण्याची जागा उरलेली नाही, तर ती तरुण मुलांना गुन्हेगारीच्या विळख्यात ओढणारी खुली बाजारपेठ बनली आहे.
पोलीस यंत्रणा पळून जाणार्या संशयितांच्या मुसक्या आवळत आपले काम करत आहे. परंतु, केवळ शूटर पकडून हा प्रश्न सुटणार नाही. जोपर्यंत या गुन्हेगारीच्या मुळाशी असणारे सोशल मीडियाचे समर्थन आणि दहशतीचा बाजार नष्ट केला जात नाही, तोपर्यंत मुंबईत असे थरारनाट्य घडतच राहतील.






