अग्रलेख : भारतापुढील कसरत
दोन वर्षांपूर्वी, 5 ऑगस्ट 2024 रोजी, बांगलादेशच्या रस्त्यांवर उसळलेल्या अभूतपूर्व जनक्षोभामुळे तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांना रातोरात देश सोडून भारतात आश्रय घ्यावा लागला होता.

Sheikh Hasina : दोन वर्षांपूर्वी, 5 ऑगस्ट 2024 रोजी, बांगलादेशच्या रस्त्यांवर उसळलेल्या अभूतपूर्व जनक्षोभामुळे तत्कालीन पंतप्रधान शेख हसीना (Sheikh Hasina) यांना रातोरात देश सोडून भारतात आश्रय घ्यावा लागला होता. नंतर बराच काळ त्या देशात जाळपोळ आणि हत्यासत्र सुरू होते. विशेषत: हसीना यांच्या पक्षाशी संबंधित लोकांना ठरवून लक्ष्य केले गेले.
बांगलादेशातील अराजकाचा त्या देशात राहणार्या अल्पसंख्याकांना म्हणजे हिंदूंनाही जबर फटका बसला. त्यांची घरे, दुकाने जाळली गेली, काहीच्या निर्घृण हत्या झाल्या. आता दोन वर्षांनंतर सगळे शांत झाले असे वाटत असतानाच हिंसाचाराची नवी मालिका सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत.
त्याचे कारण बुधवारी म्हणजे 5 ऑगस्ट 2026 रोजी, नवी दिल्लीतून घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत शेख हसीना (Sheikh Hasina) यांनी दिलेला इशारा. तो केवळ बांगलादेशच्याच नव्हे, तर संपूर्ण दक्षिण आशियाच्या राजकारणात नवे वादळ निर्माण करणारा ठरला आहे.
‘मला तुरुंगात टाकले जाण्याची किंवा मृत्युदंडाची भीती दाखवली तरी मी माझ्या लोकांसाठी मायदेशी परतणार आहे’, हे शेख हसीना यांचे वक्तव्य केवळ एका परागंदा नेत्याचे भावूक आवाहन नाही, तर ती एका राजकीय बदलाची आणि फेरजुळणीची आक्रमक नांदी आहे. हसीना यांच्या या पत्रकार परिषदेमुळे ढाक्यातील तारिक रहमान यांच्या नेतृत्वाखालील नवनिर्वाचित सरकार आणि दोन वर्षांपूर्वी हसीना यांना पदच्युत करणार्या क्रांतीचे नेतृत्व करणारे घटक प्रचंड संतप्त झाले आहेत.
वातावरणातील तणावाचा अंदाज येताच बांगलादेशच्या परराष्ट्र मंत्रालयाने लागलीच अधिकृत निवेदन जारी केले. तसे करताना त्यांनी थेट भारताच्या भूमिकेवर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. बांगलादेशात मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या फरार व्यक्तीला भारतीय भूमीवरून राजकीय विखारी भाषणे करण्याची परवानगी देणे, हा बांगलादेशच्या सार्वभौमत्वाचा आणि जुलै क्रांतीतील हुतात्म्यांचा अपमान आहे, असा गंभीर आरोप बांगलादेशने केला आहे.
या घटनेचे हिंसक पडसाद ढाक्यात तत्काळ उमटले. हसीना यांच्या सोबत पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले बांगलादेशचे माजी क्रिकेटपटू आणि अवामी लीगचे माजी खासदार शाकिब अल हसन यांच्या मागुरा येथील निवासस्थानावर तात्काळ पेट्रोल बॉम्बने हल्ला करण्यात आला. दुसरीकडे, अवामी लीगने या घटनेला ‘नव्या फॅसिझमचा उदय’ असे संबोधून बांगलादेशातील सत्ताधार्यांवर म्हणजे बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीवर प्रतिहल्ला चढवला आहे.
भारतासाठी ही परिस्थिती मुत्सद्देगिरीची किचकट परीक्षा पाहणारी आहे. भारताने अधिकृतपणे या पत्रकार परिषदेपासून अंतर राखले असले, तरी हसीना (Sheikh Hasina) यांना भारतीय भूमीवरून वक्तव्ये करू देणे हे बांगलादेशातील भारतविरोधी जनमताला खतपाणी घालणारे ठरू शकते. बांगलादेशात हसीना परागंदा झाल्यानंतर जे हंगामी सरकार स्थापन करण्यात आले होते ते भारतविरोधाच्या भावनेला फुंकर घालतच सत्तेवर होते व त्या कथित काळजीवाहू सरकारने भारताला डिवचण्याचा हरतर्हेने प्रयत्न केला होता.
तथापि, बांगलादेशच्या फेब्रुवारी 2026 च्या निवडणुकांनंतर लोकनियुक्त सरकार आल्यानंतर दोन्ही देशांनी संबंध सुधारण्याचे प्रयत्न सुरू केले होते. मात्र कालच्या हसीना यांच्या पत्रकार परिषदेने त्याला मोठा धक्का बसला आहे. मोदी सरकार शेख हसीना यांना भारत सोडण्यासाठी मनवण्याचा प्रयत्न करत असल्याची आणि बीएनपीसोबत तडजोड घडवून आणण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा काही काळापूर्वी होती. परंतु, ढाक्यातील जाणकारांच्या मते, भारत आणि बांगलादेशचे संबंध सध्या अशा स्थितीत नाहीत जिथे नवी दिल्ली कोणती मध्यस्थी करू शकेल.
बांगलादेशचे नवे पंतप्रधान तारिक रहमान यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्या देशाने आजवर पाळलेल्या परंपरेला छेद दिला आहे. बीएनपीसह बांगलादेशच्या सर्वच नेत्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पहिला परदेश दौरा नेहमी नवी दिल्लीचा केला होता; मात्र, रहमान यांनी पहिला दौरा मलेशिया आणि त्यानंतर चीनचा केला. यातूनच बांगलादेशचे नवे सत्ताधीश भारताला कितपत प्राधान्य देतात, हे स्पष्ट होते.
दुसरीकडे, शेख हसीना यांच्या या निर्णयात चीनचा काही हात आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात असला तरी त्यात तथ्य नाही. बीएनपी आणि अवामी लीग या बांगलादेशातील दोन्ही प्रमुख पक्षांशी चीनचे उत्तम संबंध आहेत. त्यामुळे भारत आणि ढाक्यामधील ताणलेले संबंध पूर्ववत करून भारताचा मार्ग मोकळा करण्यात चीनला कोणताही रस नाही.
या पत्रकार परिषदेत शेख हसीना यांचे पुत्र सजीब वाजेद यांनी बांगलादेश सध्या एका अपयशी राज्याच्या दिशेने जात असून, योग्य वेळी हस्तक्षेप न झाल्यास तो दुसरा पाकिस्तान बनेल, असा दिलेला इशारा केवळ बांगलादेशी जनतेसाठी नाही, तर मुख्यत्वे भारताच्या सुरक्षेच्या दृष्टीने दिलेला संदेश आहे. एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की बांगलादेशातील लोकशाहीच्या खच्चीकरणावर टीका करताना हसीना स्वतःच्या 15 वर्षांच्या सत्ताकाळातील एककल्ली कारभार, 1400 हून अधिक आंदोलकांच्या मृत्यूच्या आरोपांकडे मात्र सोयीस्करपणे दुर्लक्ष करतात.
आपल्या वडिलांचा वारसा पुसला जाऊ नये आणि बांगलादेशाला स्वातंत्र्य मिळवून देणारा पक्ष नष्ट होऊ नये, यासाठी हसीना यांनी मायदेशी परतण्याचा वैयक्तिक निर्णय घेतला असावा असे जाणकारांना वाटते. शेख हसीना (Sheikh Hasina) यांनी डिसेंबरमध्ये परतण्याचा घेतलेला निर्णय बांगलादेशला पुन्हा एकदा राजकीय आणि घटनात्मक संकटाच्या उंबरठ्यावर आणून ठेवणारा आहे, हे मात्र निश्चित.
भारतासाठी एका बाजूला हसीना यांना दिलेला मानवी आश्रय आणि दुसर्या बाजूला ढाक्यातील नव्या सरकारशी ठेवावे लागणारे राजनैतिक संबंध यांमधील समतोल साधणे ही अत्यंत कठीण तारेवरची कसरत ठरणार आहे.






