अग्रलेख : सोशल उद्रेक

नेपाळ सरकारने देशातील विविध सोशल मीडिया साइट्सवर घातलेल्या बंदीनंतर तेथील तरुणाईने जो उद्रेक केला. त्यामुळे नेपाळ सरकारला ही बंदी उठवावी लागली. सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात नेपाळमधील तरुणांनी जो गोंधळ घातला त्यामध्ये 20 पेक्षा जास्त तरुणांचा मृत्यू झाला आणि 300 पेक्षा जास्त जण जखमी झाले. आंदोलनाची तीव्रता वाढण्याची शक्यता लक्षात घेऊनच नेपाळ सरकारने सोशल मीडिया साइट्सवरील बंदी उठवली. नेपाळमध्ये सोशल मीडियाच्या निमित्ताने हा जो उद्रेक झाला आहे त्याची दखल फक्त नेपाळलाच घ्यावी लागणार आहे, असे नाही तर जगातील सर्वच देशांना हा उद्रेक गांभीर्याने घ्याव्या लागणार आहे.
नेपाळ सरकारने दिलेल्या माहितीप्रमाणे देशामध्ये कार्यरत असलेल्या विविध सोशल मीडिया साइट्सनी नेपाळमध्ये कोणत्या प्रकारचे रजिस्ट्रेशन न करता आपला कारभार सुरू केला असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई म्हणून या सर्व साइट्स बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. प्रशासकीय कारवाई म्हणून ही गोष्ट जरी बरोबर असली, तरी ज्या प्रकारे तरुणाईला सध्या सोशल मीडियाचे व्यसन लागले आहे ते पाहता या साइट नोंदणीकृत आहेत की नाहीत याची काळजी करण्याचे कारण या तरुणाईला नव्हते. दुसरीकडे तरुण आंदोलकांच्या मते मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून नेपाळ सरकारचा भ्रष्टाचार सातत्याने समोर आणला जात असल्याने दडपशाही करण्यासाठीच नेपाळ सरकारने सर्व सोशल मीडिया साइटवर बंदी घातली.
गेल्या काही कालावधीमध्ये सातत्याने जनरेशन झेड म्हणजे जेनझी या नावाने ओळखली जाणारी तरुणाई सातत्याने नेपाळमधील भ्रष्टाचारावर आपली मते मांडत होती आणि त्यासाठी सोशल मीडियाच्या विविध साइटचा वापर केला जात होता. नेपाळ सरकारविरोधात सातत्याने जनमत तयार होण्याचा धोका लक्षात घेऊनच सरकारने नोंदणी न केल्याचे कारण देऊन या सर्व साइट्स बंद केल्या. अर्थात, देशातील तरुणाईचा एवढ्या मोठ्या प्रमाणात उद्रेक होईल याची कल्पना नेपाळ सरकारला नसावी. त्यामुळे सरकारला आपला निर्णय मागे घ्यावा लागला. नेपाळमधील ही घटना एक प्रातिनिधिक उदाहरण आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवांचे पीक पेरून दंगली घडवण्याची कारस्थाने एकीकडे केली जात असतानाच या सोशल मीडियावर बंदी आली तरीसुद्धा दंगली होतात हाच मुद्दा या निमित्ताने समोर आला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये भारतासह जगात सर्वत्रच इंटरनेटचा प्रसार वाढल्यानंतर सोशल मीडियाचाही प्रभाव आणि प्रसार वाढत गेला. प्रत्येकाच्या दैनंदिन कामकाजाचा एक भाग म्हणूनच सोशल मीडियाकडे पाहिले जाऊ लागले. विविध प्रकारच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर व्यक्त होणे किंवा प्रतिक्रिया देणे हे प्रत्येकासाठी दैनंदिन कर्मकांड ठरू लागले आहे. यानिमित्ताने तरुणांची मानसिकता तयार करण्याचे किंवा मानसिकता बदलण्याचे कारस्थानही केले जात असल्याचे नेहमी बोलले जाते.
सोशल मीडिया साइट्सने त्या त्या देशांमध्ये रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांचा कारभार नेहमीच सुरू होतो त्यानंतर त्याच्यावर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण नसते. भारतासारख्या देशांमध्ये जेव्हा दंगलीसारखी परिस्थिती निर्माण होते तेव्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून अफवांचे पीक पसरून ही परिस्थिती अधिक गंभीर होण्याचा धोका लक्षात घेऊन अनेक वेळा तीन किंवा चार दिवस सोशल मीडिया साइट्स किंवा इंटरनेटच बंद ठेवले जाते. त्यानंतर परिस्थिती आटोक्यात येते हेसुद्धा वास्तव आहे. कोणत्याही आधुनिक तंत्रज्ञानाप्रमाणे सोशल मीडिया सकारात्मक पद्धतीने वापरणार का त्याचा नकारात्मक वापर करणार हेसुद्धा महत्त्वाचे ठरते. सोशल मीडियावर कार्यरत असलेले सर्व प्लॅटफॉर्म्स युजर्सना एकमेकांशी जोडण्याचे काम करतात.
या निमित्ताने समविचारी लोक एकत्र येत असतात, विविध प्रकारचे मुद्दे मांडून त्यावर उलटसुलट चर्चाही होत असते. अनेक वेळा खोट्या आणि बनावट गोष्टीसुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून जाणीवपूर्वक समोर आणल्या जातात. सोशल मीडियावर जे उपलब्ध होते ते ज्ञान नसते तर माहिती असते आणि माहिती तपासून घ्यावी लागते याचीच कल्पना अनेकांना नसल्यामुळे एका दैनंदिन कर्मकांडाचा भाग म्हणून सोशल मीडियाचा वापर करण्याकडेच अनेकांचा कल वाढत आहे. त्याची एवढी सवय आता लोकांना झाली आहे की सोशल मीडियावर बंदी आली, तर लोकांचे जगणे मुश्किल होईल. किमान नेपाळमधील घटनेनंतर तरी अशा प्रकारचे संकेत समोर येऊ लागले आहेत.
गेल्या वर्षी बांगलादेशमध्ये जी क्रांती झाली त्याला सुद्धा काही प्रमाणात सोशल मीडिया कारणीभूत होता. जगात अनेक ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध विषय समोर आणले जात आहेत आणि सत्ताधारी पक्षांसाठी असे विषय अडचणीचे ठरत असल्यानेच सोशल मीडियावर बंधने घालण्याचा विषय अधूनमधून समोर येत असतो. नेपाळ हे त्याचे ताजे उदाहरण मानावे लागते. आधुनिक पिढीला व्यक्त होण्यासाठी अन्य कोणताही प्लॅटफॉर्म उपलब्ध नसल्याने सोशल मीडियासारख्या सहज उपलब्ध होणार्या प्लॅटफॉर्मचा वापर ही पिढी मनापासून आणि मनसोक्तपणे करत आहे. त्यामुळे अनेकांच्या अडचणी वाढत असल्या तरी आधुनिक काळामध्ये टाळता येणार नाही. सोशल मीडियावर बंदी आणण्याचा विषय झाला, तर नेपाळची पुनरावृत्ती इतरत्रही होऊ शकतो हा संदेश देण्याचे काम निश्चितच या सोशल उद्रेकाने केले आहे.





