व्यक्तिविशेष : स्वराज्यजननी

हिंदवी स्वराज्याचे स्वप्न उराशी बाळगून ते सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या राजमाता जिजाऊ यांना जयंती निमित्त त्रिवार वंदन.
स्वतंत्र विचारसरणी असलेल्या राजमाता जिजाऊंनी शिवबांना संस्कारांची शिदोरी देत स्वराज्याचे स्वप्न साकार केले. जिजाबाई त्यांच्या सद्गुण, शौर्य आणि दूरदृष्टीसाठी ओळखल्या जातात. शहाजीराजांनी पुण्याची जहांगिरी जिजाबाईंच्या हाती सुपूर्त केली होती. जहांगिरीचा कारभार पाहताना त्यांनी पुनर्विकास आणि शेतीचा विकास करून स्थानिक लोकांना अभय दिले.
शिवरायांना राजनीतीचे धडे दिले. त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली. जिजाऊंनी दिलेल्या संस्कारामुळेच शिवाजीराजे घडले. जिजाऊंनी शिवरायांना समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणाऱ्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले. शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वतः बारकाईने लक्ष ठेवले. एक योद्धा म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांना घडवताना त्यांनी ज्येष्ठांचा आदर आणि स्त्रियांचा सन्मान हे देखील शिकवले. परस्त्री ही मातेसमान असावी असे कायम त्यांनी त्यांच्या मनावर बिंबवले.
इतकेच नाही तर पशुपक्षी, जनावरं या मुक्या प्राण्यांनाही मान देण्याचे शिकवले. जनतेचे रक्षण व राजद्रोहींना शिक्षा हे सगळे धडे देऊन रयतेचा उत्तम राजा घडविण्याचे कार्य जिजाऊंनी केले. ही संस्कारांची शिदोरी शिवाजी राजांना महान बनवण्यासाठी मोलाची ठरली. स्वराज्य निर्माण करून राजमाता जिजाऊंनी नवीन युगाची सुरुवात केली. तोच वारसा पुढे चालवत पिढ्यान्पिढ्या, अंधकारात, रूढी परंपरेच्या साखळदंडात बांधल्या गेलेल्या स्त्रियांना ज्ञानप्रकाशाकडे नेण्याचे कार्य अनेक महान स्त्रियांनी केले.
युवाशक्ती योग्य दिशेने प्रवाहित ठेवता आल्यास त्या देशाचा, राज्याचा विकास साधला जाऊ शकतो. याच विचार सूत्रांचा मध्य साधत जिजाऊंनी आपल्या शिवबाला स्वराज्य निर्मितीच्या ध्येयाप्रती प्रेरित केले असावे. या भूमीत सोन्याचा नांगर फिरवून या राष्ट्रांस सुजलाम् सुफलाम् घडवणाऱ्या राष्ट्रमातेस मनाचा मुजरा. स्वराज्याचा अभिमान नि स्वाभिमान तुम्हीच आहात जिजाऊ आमची शान. स्वराज्याचा ध्यास घेऊनी केला दुष्टांचा संहार. डौलाने फडकतो भगवा सदैव गात तुमचे गुणगान.
जिजाऊंनी स्वराज्याचे स्वप्न देखियले
वीर पुत्राने बघा देखणे स्वराज्य निर्मियले





