धर्मस्थळ (कर्नाटक) क्षेत्राचे विद्यमान धर्माधिकारी डॉ. वीरेंद्र हेगडे यांचे नाव राष्ट्रपती कोट्यातून राज्यसभेचे खासदार म्हणून घोषित झाले आहे. त्यांच्या कार्याबाबत…
प्रसादगुणयुक्त, सुदर्शन व्यक्तित्वाबरोबरच समता, आस्था, उदारता, वात्सल्य आणि विनय अशा सद्गुणांनी तसेच देश-धर्म-समाज सेवेच्या निःस्पृह कार्याने ज्यांचे जीवन दीपस्तंभाच्या स्वरूपात भारतीयांच्या समोर आहे असे डॉ. वीरेंद्र हेगडे यांना धर्मसत्ता, अर्थसत्ता, न्याय सत्तेबरोबरच राज्यसत्तेचा मुकुट लाभला आहे. विशेष म्हणजे खासदारकीच्या रूपात एवढी समृद्धता एवं संपन्नता असूनही निराभिमानता, निरिच्छता, साधेपणा आणि अनाग्रह या त्यांच्या स्थायी स्वभावगुणांकडे यत्किंचितही दुर्लक्ष झाले नाही.
धर्म, संस्कृती, कला, साहित्य, समाजसेवा, शिक्षण अशा अनेक क्षेत्रांत वीरेंद्र हेगडे यांच्या अनुपम सेवांना मान्यता देत हा खासदारकीचा बहुमान त्यांना देण्यात येत आहे. चालताबोलता मंजुनाथ या उपाधीने ज्यांचे जीवन वंदनीय झाले आहे अशा हेगडेंना “राजर्षी’ या नावानेही संबोधले जाते. 17 एप्रिल 1993 रोजी भारताचे तत्कालिन राष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांनी धर्मस्थळ येथे येऊन डॉ. हेगडे यांना सन्मानित केले होते. कर्नाटकातील धर्मस्थळचे धर्माधिकारी डॉ. विरेंद्र हेगडे यांचे व्यक्तित्व पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण, धर्मभूषण, परोपकार धुरंधर, समाजरत्न, धर्मयोगी, वैष्णव मार्तंड, अभिनव चामुंडराय, रान-शिरोमणी, राजर्षी अशा अनेक मानसन्मान-पदांच्या बिरूदावलीने अलंकृत आहे.
धर्मस्थळ येथील मंजुनाथ स्वामींच्या दशनार्थीमध्ये वैष्णव, शैव, वीरशैव, लिंगायत, जैन, शिख, ईसाई आणि अयप्पा अशा सर्व धर्म आणि संप्रदायाचे भक्त असतात. या सर्वांना आवास व भोजन व्यवस्थांची सुविधा दिली जाते. समस्त धर्माच्या अध्ययन व चिंतनानंतर त्यातील मैत्री परोपकार आणि सहिष्णुता यासारख्या तत्त्वांचा प्रचार करण्यासाठी त्यांना “धर्मभूषण’ ही उपाधी देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आहे. लोककल्याण आणि पीडित मानवाची सेवा यासाठी निरंतर प्रयत्नशील असणारे हेगडे यांना “परोपकार धुरंधर’ म्हणून अलंकृत करण्यात आले आहे.
समस्त मानवजातीच्या उत्थानाची चिंता वाहणारे म्हणून “समाज रत्न’, प्रत्येक धर्माचा आदर करीत स्वधर्माप्रती आदर-आस्था ठेवून त्यांचे आचरण करणारे म्हणून “धर्मयोगी’, वैष्णव पद्धतीने मंदिराची व्यवस्था-पूजा, अर्चना, परंपरा जपणारे म्हणून “वैष्णव मार्तंड’, धर्मस्थळ येथे भगवान बाहुबलीची विशालकाय मूर्तीचे निर्माते म्हणून “अभिनय चामुंडराय’, वैद्यकीय, आयुर्वेद, दंत निसर्गोपचार महाविद्यालये, शिक्षण व आरोग्य सेवेस दिलेल्या मदतीमुळे “दानवीर’ अशा पदव्यांनी हेगडे यांचे व्यक्तिमत्त्व समृद्ध आहे. ही सारी धर्मकार्ये करण्यासाठी मन अंतरंगातून निःस्पृह आणि निर्लेप असण्याची गरज असते आणि त्यादृष्टीने हेगडे हे योगीच आहेत आणि म्हणून “धर्मयोगी’ ही त्यांना दिलेली उपाधी सार्थक आहे.
धर्मस्थळ – निसर्गाचे वरदान
कर्नाटकाची भूमी पुण्यभूमी. इथे अनेक जैन आचार्यांनी, क्षत्रिय पुत्रांनी इतिहास घडविला. कर्नाटकाच्या भूमीवर जिथे जाल तिथे याची साक्ष मिळते. अशा ऐतिहासिक कर्नाटक राज्याच्या दक्षिण कर्नाटक जिल्ह्यातील धर्मस्थळ हे एक प्राचीन धर्मक्षेत्र. या गावाला सृष्टीने आपले सारे सौंदर्य हातचे काही एक न राखता बहाल केले आहे. हिरव्यागार डोंगर-दऱ्यांनी वेढलेले धर्मस्थळ हे गाव आपल्या नावाप्रमाणे खरोखरच धर्मस्थळ. याची प्रचीती या भूमीला स्पर्श केल्याशिवाय येत नाही. जवळून वाहणारी निळसर नेत्रावती या धर्मस्थळाच्या सौंदर्य-सुवर्णात सुगंधाची भर घालते. प्राचीन मंदिरे व शांतता यामुळे तिथे जाणारी व्यक्तीही प्राकृतिकरित्या शांत व प्रसन्न होते.
धर्मस्थळ हे आपल्या राष्ट्रीय एकतेचे व सर्वधर्म समभावनेचे एक आदर्श केंद्र आहे. येथील शिवमंदिर संपूर्ण भारतवर्षात सुप्रसिद्ध आहे. अत्यंत प्राचीन, अतिभव्य व आकर्षक अशा या मंदिराला शिवमंदिर म्हणून व मंदिरातील शिवाला मंजूनाथ म्हणून ओळखतात. या मंदिरात सुंदर शिल्पामध्ये शिवलिंगाची स्थापना केली आहे. या शिवाचे भक्तगण वैष्णव पंथीय आहेत. येथे येणारे भाविक कोण्या एका विशिष्ट जाती-जमातीचे नाहीत. सर्व धर्माचे भक्त या पुण्य क्षेत्रावर येतात. बेलतंगडी तालुक्यातील हे धर्मस्थळ गाव असे नावाप्रमाणेच धर्मस्थळ असून सर्व धर्माचे लोक इथे गुण्यागोविंदाने नांदतात.
“अन्नपूर्णा’ या नावाने विख्यात धर्मस्थळ येथील भोजनशाला सुनियोजित अन्नदानाचे एक अनोखे असे आदर्श उदाहरण आहे. पवित्रता आणि स्वच्छतेबरोबरच सकस, ताजे आणि सुरूचीपूर्ण भोजन दिले जाते. संपूर्ण संगमरवरी विशाल हॉलमध्ये एका वेळी साधारण तीन ते पाच हजार लोक आरामात बसून प्रसाद ग्रहण करतात. सन्मानपूर्वक-निशुल्क अन्नदानाचे कार्य सातशे वर्षांपासून अखंडितपणे सुरू आहे.
धर्मस्थळ संस्थानचे वैशिष्ट्ये
धर्मस्थळ संस्थानात कोणत्याही प्रकारचे दान, सहाय्यता, मदत कार्यास सहकार्य मागण्याची प्रथा नाही. येथे स्वतःहून भक्त आर्थिक स्वरूपात धन-धान्य स्वरूपात, स्वच्छेने प्रदान करीत असतात. धर्माधिकारी विरेंद्र हेगडे यांचे दर्शन घेण्याचाही सर्वांना समान अधिकार आहे. नित्य दर्शन देत दुःखितांच्या व्यथा ऐकून धर्माधिकारी तत्काळ सहाय्यता देतात.
शिक्षण, सामाजिक कार्याचे प्रेरणा केंद्र
धर्म कार्याबरोबरच धर्मस्थळ संस्थानाच्या वतीने प्राथमिक शाळा, हायस्कूल, महाविद्यालये, आयटीआय, आयुर्वेद कॉलेज, विधी महाविद्यालय, मॅनेजमेंट कॉलेज, वैद्यकीय महाविद्यालय, निसर्गोपचार महाविद्यालय, दंत महाविद्यालय आणि इंजिनियरिंग कॉलेजही चालवून आपल्या ज्ञानदान कार्याचा आदर्श स्थापित केला आहे. याशिवाय धारवाड येथील जनता शिक्षण संस्था संचालित सर्व संस्थांचे मार्गदर्शक व आश्रयदाते म्हणून डॉ. हेगडे यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.
स्वयंउद्योग प्रशिक्षण केंद्रे, आरोग्य दान सेवा, अभयदान, न्यायदान, अभिवृद्धी योजना, सामूहिक विवाह, विविध शहरांत कल्याण मंडपांची (मल्टीपर्पज हॉल) निर्मिती धर्मोत्थान ट्रस्ट, शांतिवन ट्रस्ट, मंजूषा म्युझियम, प्राचीन मंदिरांचा जीर्णोद्धार, सर्वधर्म साहित्य संमेलन अशा विविध कार्यातून डॉ. हेगडे यांनी धर्मस्थळ क्षेत्रामध्ये स्वर्णयुगाचेच प्रवर्तन केले आहे.