अग्रलेख : जागावाटपाचा वादविवाद

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीला अद्याप साधारण वर्षभराचा कालावधी असला आणि महाराष्ट्र विधानसभेला साधारण दीड वर्षापेक्षा जास्त कालावधी बाकी आहे. तरी महाराष्ट्राच्या विद्यमान राजकारणामध्ये या दोन्ही निवडणुकांच्या निमित्ताने विविध राजकीय पक्षांच्या आघाड्यांच्या जागा वाटपावरून वादविवाद सुरू झाले आहेत.
राज्याच्या बदलत्या राजकीय पटलावर सध्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजप एकीकडे आणि दुसरीकडे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची महाविकास आघाडी यांच्यामध्येच निवडणुकीचा संघर्ष पाहायला मिळणार आहे, हे उघड आहे. पण या दोन्ही आघाड्यांमध्ये आतापासूनच काही प्रमाणात जागा वाटपावरून वाद सुरू झाला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भाजपा कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये बोलत असताना भाजप आगामी विधानसभा निवडणुकीत 240 जागा लढवणार असल्याची घोषणा केली होती. याचाच अर्थ एकनाथ शिंदे यांच्या गटाला साधारण 48 जागा दिल्या जातील असे त्यांनी सूचित केले होते. याच सुमारास महाविकास आघाडीची जी बैठक झाली त्यामध्ये आगामी निवडणुका एकत्रपणे लढवण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर लोकसभेसाठी जागावाटपाबाबत ज्या बातम्या प्रसिद्ध झाल्या त्यामध्ये लोकसभेच्या 48 जागांपैकी 21 जागा उद्धव ठाकरे यांचा गट, 19 जागा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष आणि 8 जागा कॉंग्रेस पक्ष लढवणार असे सांगण्यात आले होते. पण आता या दोन्ही आघाड्यांतर्फे या जागावाटपाबाबत खुलासे करण्यात आले आहेत.
कोणतेही जागावाटप अद्याप अंतिम झाले नसल्याचे सांगण्यात येत आहे. मेळाव्याला उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने मी 240 हा आकडा उच्चारला होता, असा खुलासा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. पण त्यापूर्वी एकनाथ शिंदे यांच्या गटातील अनेक आमदारांनी आणि काही महत्त्वाच्या नेत्यांनी बावनकुळे यांच्या या विधानाबाबत नाराजी व्यक्त केली होती, हेसुद्धा लक्षात घ्यावे लागेल. दुसरीकडे महाविकास आघाडीने लोकसभा निवडणुकीमध्ये कॉंग्रेस पक्षाला फक्त आठ जागा देऊ केल्याची बातमी प्रसिद्ध झाल्याने कॉंग्रेस पक्षातर्फेसुद्धा खुलासा करण्यात आला आहे. महाविकास आघाडीच्या कोणत्याच नेत्यातर्फे अशा प्रकारचे जागावाटप झाल्याची माहिती देण्यात आली नव्हती. या बातम्या फक्त माध्यमांमध्येच प्रसिद्ध झाल्या होत्या. साहजिकच कॉंग्रेससारखा मोठा राष्ट्रीय पक्ष महाराष्ट्रासारख्या मोठ्या आणि महत्त्वाच्या राज्यांमध्ये लोकसभेच्या फक्त आठ जागा लढवेल अशी कोणतीही शक्यता नाही. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचा गटही आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपशी जागावाटप समझोता करत असताना 50 टक्के भागीदारीचाच हट्ट धरणार हेसुद्धा उघड आहे.
गेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील जागावाटपावर नजर टाकली तर या दोन्ही निवडणुका एकीकडे भाजप आणि शिवसेना युतीने एकत्रपणे लढवल्या होत्या तर दुसरीकडे कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची आघाडी होती. भाजप-शिवसेना युती असो किंवा कॉंग्रेस आघाडी असो त्यांनी साधारणपणे 50 टक्के भागीदारीमध्ये जागावाटप केले होते; पण सध्याच्या बदलत्या चित्रानंतर जागावाटपासाठी भागीदारीचे हेच सूत्र कायम राहणार का, याबाबत आतापासूनच शंका घेण्यासारखी परिस्थिती आहे. सध्या एकनाथ शिंदे यांच्या गटामध्ये साधारण 40 पेक्षा जास्त आमदार आणि 12 खासदार आहेत. या आमदार आणि खासदारांना उमेदवारी मिळणार हे तर गृहीतच आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला प्रत्येक निवडणुकीनंतर आपली आमदारांची संख्या वाढवायची असती. त्यासाठीच जास्तीत जास्त जागांवर निवडणूक लढवण्याची राजकीय खेळी खेळली जाते. म्हणूनच एकनाथ शिंदे यांचा गट आगामी लोकसभा किंवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपबरोबर जागावाटप चर्चा करताना आणखी काही जागांची मागणी करेल, हे उघड आहे.
दुसरीकडे भाजपलाही या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर स्वबळ वाढवण्याची चांगली संधी दिसत आहे. पूर्वीच्या शिवसेनेबरोबर भाजपची युती असताना विधानसभा आणि लोकसभेसाठी साधारणपणे निम्म्या निम्म्या जागा प्रत्येकी लढवल्या जात असत. पण एकनाथ शिंदे यांच्या गटाबाबत मात्र जागावाटप तडजोडीमध्ये भाजपाच्या वाट्याला जास्त जागा येणार हे उघड आहे. या निमित्ताने जास्तीत जास्त जागा जिंकून स्वबळावर 144 पेक्षा जास्त जिंकण्याची रणनीती आखली जाईल, हे उघड आहे. म्हणजे जरी आगामी निवडणुकीसाठी भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या गटाची युती असली तरी भाजपच्या वाट्याला ज्या जागा येणार आहेत त्यापैकी जास्तीत जास्त जागा जिंकून भाजपच्या आमदारांची संख्या 144 पेक्षा जास्त असेल, यासाठीच भाजपातर्फे प्रयत्न केले जातील हेही उघड आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलताना जे विधान केले त्याला याच प्रकारचा संदर्भ आहे. यानिमित्ताने भाजपने एकनाथ शिंदे यांच्या गटाची कशा प्रकारची प्रतिक्रिया असेल याची चाचणीही करून घेतली आहे. ज्या मर्यादित प्रमाणामध्ये एकनाथ शिंदे यांच्या गटाने नाराजी व्यक्त केली आहे ते पाहता आगामी निवडणुकीसाठी भाजपची जागा वाटपातील बार्गेनिंग पॉवर जास्त असेल, हेही आता उघड दिसत आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना अशा प्रकारची चर्चा घडवून आणणे हा एक रणनीतीचा भाग असू शकतो. यानिमित्ताने स्वपक्षातील लोकांचे आणि विरोधी पक्षातील नेत्यांचे काय मत असू शकते याचा एक अंदाज येऊ शकतो. या आठवड्यात किंवा पुढील आठवड्यात जेव्हा सर्वोच्च न्यायालयामध्ये महाराष्ट्रातील सत्ता संघर्षावर निकालाची घोषणा केली जाईल त्यानंतरच महाराष्ट्रातील निवडणूक राजकारणाला खऱ्या अर्थाने वेग येणार आहे. साहजिकच सध्या जागावाटपाची चर्चा सुरू असली तरी सर्वच राजकीय पक्षांच्या नजरा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाकडे आहेत, हेही वास्तव स्वीकारावे लागेल.





