नवी दिल्ली : बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एनडीएमध्ये जागा वाटपाची चर्चा वेग घेत आहे. मंगळवारी दिल्लीमध्ये लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) चे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री चिराग पासवान आणि बिहार निवडणूक प्रभारी धर्मेंद्र प्रधान यांच्यात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. सुमारे ४५ मिनिटे चाललेल्या या बैठकीत जागा वाटपावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या चर्चेदरम्यान बिहार भाजप प्रभारी विनोद तावडे आणि बिहारचे मंत्री मंगल पांडे देखील उपस्थित होते. सूत्रांच्या माहितीनुसार, एनडीएच्या मित्रपक्षांमध्ये जागावाटपावर सखोल मंथन करण्यात आले. दरम्यान, एनडीएतील मित्रपक्षांमध्ये जागावाटपाबाबत मतभेद कायम असल्याचे दिसत आहे. हिंदुस्तानी आवाम मोर्चाचे अध्यक्ष जीतनराम मांझी यांनी १५ जागांवर ठाम भूमिका घेतली असून, लोजपा (रामविलास) चे चिराग पासवान ३० जागांची मागणी करत आहेत. मांझी यांनी यापूर्वीच स्पष्ट केले होते की, जर १५ पेक्षा कमी जागा मिळाल्या तर त्यांची पार्टी स्वतंत्रपणे १०० जागांवर उमेदवार उभे करेल. त्यामुळे एनडीएसमोरील जागा वाटपाची समीकरणे अधिक गुंतागुंतीची बनली आहेत. भाजप आपल्या मित्रपक्षांना एकत्र ठेवण्यासाठी प्रयत्नशील असून, रविवारी धर्मेंद्र प्रधान आणि विनोद तावडे यांनी जेडीयू नेते ललन सिंह, जीतनराम मांझी आणि रालोसो प्रमुख उपेंद्र कुशवाहा यांच्याशीही चर्चा केली होती. या बैठकीतही जागावाटपाचा विषय केंद्रस्थानी होता. दरम्यान, मंगळवारी जेडीयूचे कार्यकारी राष्ट्रीय अध्यक्ष संजय कुमार झा यांनी मुख्यमंत्री नीतीश कुमार यांची भेट घेतली. सीएम निवासस्थानी झालेल्या या बैठकीत जेडीयूच्या कोट्यातील जागांवर उमेदवार निवडीसंदर्भात चर्चा झाली. बैठकीनंतर संजय झा यांनी सांगितले की, “एनडीए पूर्णपणे एकजुटीने उभी आहे आणि लवकरच जागावाटपाचा निर्णय जाहीर केला जाईल.”