अग्रलेख : पुतीन यांचे नेमके काय झाले?

रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन यांचे निधन झाले असून ही बातमी सध्याच्या रशिया-युक्रेन युद्धामुळे अत्यंत गुप्त ठेवण्यात आल्याची शंका ब्रिटनच्या एमआय 6 या गुप्तचर संघटनेने व्यक्त केली आहे. रशिया घडामोडींशी संबंधित असलेल्या अनेकांनी या शक्यतेला दुजोराही दिला आहे. गेली अनेक दिवस पुतीन रक्ताच्या कर्करोगाने आजारी आहेत. त्यातूनच त्यांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली गेली आहे. त्यांच्या निधनाच्या वृत्ताने रशियात मोठा लष्करी उठाव होण्याची शक्यता असल्याने त्यांच्या मृत्यूची बातमी रोखून धरली गेली असावी, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
काहींचे तर म्हणणे असे आहे की, सध्या पुतीन यांच्या जागी चक्क एक बनावट पुतीन उभा केला गेला असून त्याच्याकरवीच सध्या रशियाचा कारभार हाकला जात आहे. पुतीन यांचे जुने व्हिडिओ जारी करून ते तंदुरुस्त असल्याचे भासवले जात आहे. रशियातील “व्हिक्टरी डे’च्या दिवशी पुतीन यांचे राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणाचे व्हिडिओ रेकॉर्डिंग जारी केले गेले होते. पण तेही आधीच रेकॉर्ड करून ठेवले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. रशियातील कम्युनिस्ट कार्यपद्धतीत सगळेच महत्त्वाचे विषय अत्यंत गुप्त ठेवले जातात आणि त्यावर कोणालाही काहीही भाष्य करण्याची अनुमती नसते. त्यामुळे ब्रिटनच्या या गुप्तचर संघटनेची ही माहिती जाहीर झाल्यानंतर त्यावर रशियात फार काही खळबळ माजलेली दिसली नाही किंवा त्यावर कोणीही काही भाष्यही केलेले नाही.
पुतीन हयात आहेत हे तातडीने जगापुढे दाखवण्याची लगबगही रशियाकडून झालेली नाही. पुतीन हे गंभीर आजारी आहेत आणि त्यांच्यावर तातडीची शस्त्रक्रिया केली जाणार आहे, ही बातमी मध्यंतरी अधिकृतपणे प्रसारित झाली होती. पण त्या आजारातून ते बरे झाले किंवा कसे याची माहिती नंतर जगापुढे आलेली नाही. सध्या रशियाचे युक्रेनबरोबर सुरू असलेले युद्ध निर्णायक वळणावर आले आहे. त्यात रशियन सैन्याची मोठी मनुष्यहानी झाली असून रशियाने युक्रेनमधून माघार घ्यावी, असा सूर रशियातूनच उमटू लागला आहे. पुतीन यांचा मृत्यू झाल्याची घोषणा या क्षणाला केली गेली, तर रशियन लष्कराचे प्रमुख अधिकारी तातडीने युक्रेन युद्धातून माघार घेतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे पुतीन यांनी आपल्या विश्वासातले जे चार प्रमुख लोक आपल्या सोबत ठेवले आहेत त्या चौकडीनेच पुतीन यांच्या हयातीच्या संबंधातील माहिती गुप्त ठेवली असण्याची शक्यता अधिक आहे.
एकुणातच पुतीन हे प्रकरण मोठे रंजक आहे. रशियाचे सर्वेसर्वा बनलेले पुतीन यांची राजकीय जडणघडण आणि त्यांनी राष्ट्राध्यक्षपदापर्यंत केलेली वाटचालही वेधक आहे. सुरुवातीला रशियाच्या केजीबी या गुप्तचर संघटनेत त्यांनी 16 वर्षे काम केले आहे. विदेश वार्ता विभागात पुतीन यांची विशेष कामगिरी होती. चेहऱ्यावर कोणतेही भाव न दाखवता अत्यंत थंड डोक्याने काम करण्याचे कसब त्यांनी केजीबीमध्ये असतानाच कमावले आहे. त्या आधारावर लेफ्टनंट कर्नल या पदावरून वर चढत चढत ते रशियाच्या अध्यक्षपदापर्यंत पोहोचले आहेत. सन 2000 ते 2008 आणि सन 2012 पासून आतापर्यंत ते या पदावर आहेत. 1991 मध्ये त्यांनी केजीबीतील सेवेचा राजीनामा दिला आणि थेट राजकारणात प्रवेश केला. 1996 पासून त्यांनी बोरीस येल्त्सीन यांच्या प्रशासनात कामाला सुरुवात केली. अल्पावधीतच म्हणजे सन 1999 मध्ये ते देशाचे पंतप्रधान झाले. बोरीस येल्त्सीन यांच्या निधनानंतर ते थेट अध्यक्षपदावर आरूढ झाले.
रशियाच्या राज्यघटनेत सलग दोनवेळा अध्यक्ष झाल्यानंतर तिसऱ्यांदा अध्यक्ष होता येत नाही, त्यामुळे ते मधल्या काळात म्हणजे सन 2008 ते 2012 या अवधीत पुन्हा देशाचे पंतप्रधान झाले. मात्र, त्यानंतर ते पुन्हा अध्यक्ष बनले आहेत. सारा रशिया आज त्यांच्या पोलादी पंजात आला आहे. त्यांना आता तेथे कोणी प्रबळ प्रतिस्पर्धीच उरला नाही. रशियात एकहाती वर्चस्व प्रस्थापित केल्यानंतर त्यांनी क्रिमिया बळकावला. पहिल्यांदा पूर्व युक्रेनमध्ये आपले लष्कर घुसवून तेथे गडबड सुरू केली आणि सिरीयातील जिहादींच्या विरोधातही लष्करी कारवाई केली. जगातले सगळेच हुकूमशहा करतात त्याप्रमाणे त्यांनी रशियात आपल्या विरोधात उठणारे आवाज दाबून टाकले. प्रसारमाध्यमांवर बंदी आणली आणि विरोधकांचे खच्चीकरण करणे, त्यांना धमकावणे असे सारे उद्योग करून आपले एकतर्फी वर्चस्व तेथे प्रस्थापित केले आहे. जगाच्या राजकारणातही स्वत:चे महत्त्व वाढवण्याचा प्रयत्न पुतीन यांनी केला. अगदी थेट अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीतही त्यांनी आपल्या यंत्रणेद्वारे हस्तक्षेप केल्याची बाब पुराव्यानिशी समोर आली आहे. आपल्या शेजारी असलेल्या राष्ट्रांवरही त्यांनी दादागिरी सुरू केली आहे. सध्या त्यांनी युक्रेनवर युद्ध लादले आहे. या युद्धासाठी त्यांनी दिलेली कारणे अत्यंत तकलादू आहेत.
युक्रेन “नाटो’ संघटनेशी सलगी करीत आहे, युक्रेनमधील रशियन भाषिक अल्पसंख्याकांचा छळ केला जात आहे वगैरे कारणे पुढे करून त्यांनी युक्रेनला नेस्तानबूत करायचे ठरवले आहे. पण त्यांना अनपेक्षितरित्या तेथे मोठाच प्रतिकार सहन करावा लागत आहे. जमिनीवरील कारवाईत तर युक्रेनच त्यांच्यावर भारी पडल्याचे अनेक वृत्तांमधून स्पष्ट झाले आहे. साऱ्या जगातून पुतीन यांचा युक्रेन प्रकरणावरून निषेध केला गेला. रशियावर जागतिक निर्बंध लागू करण्यात आले. सारा आंतरराष्ट्रीय समुदाय त्यांच्या विरोधात एकवटला. त्यामुळे युक्रेनवरील कारवाई हा पुतीन यांच्या शेवटाची सुरुवात मानली गेली. त्यातच त्यांचा आजार बळावल्याने आणि युक्रेनमध्ये अपेक्षित यश येत नसल्याने पुतीन चांगलेच कात्रीत सापडले आहेत. यातून रशियावरील आपली पकड ढिली होत जाणार ही भीतीही त्यांना निश्चित सतावत असणार.
सध्याची एकूणच परिस्थिती लक्षात घेतली, तर पुतीन नावाचा अध्याय हा लवकरच संपणार, असे भाकीत अनेकांनी वर्तवले होते. अध्याय संपणार याचा अर्थ रशियातील पुतीनपर्व राजकीयदृष्ट्या संपणार असे भाकित असले, तरी आता तर पुतीन शारीरिकदृष्ट्याच संपले असल्याच्या बातम्या आल्या आहेत. एखादी व्यक्ती इहलोकातून जाणे ही खचितच चांगली बाब मानली जात नसली, तरी पुतीन यांच्या आक्रमकपणातून जगापुढे उभे राहिलेले संकट नाहीसे व्हावे आणि रशियाची वाटचाल मुक्त व लोकशाही मार्गाने व्हावी ही मात्र संपूर्ण जगाची इच्छा आहे.





