अर्थकारण : सेवा क्षेत्राच्या निर्यातीची कमाल

भारतीय रिझर्व्ह बॅंकेने प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबर 2022 मध्ये भारताने 273 अब्ज डॉलर्स इतकी विविध सेवांची निर्यात केली. 2021 मधील कोणत्याही महिन्याच्या सरासरीपेक्षा ही निर्यात 17 टक्के अधिक आहे. समोर जागतिक मंदीचे ढग देशात असतानाही, भारताने केलेला हा पराक्रम कौतुकास्पदच म्हणावा लागेल.
11 वर्षांपूर्वी, म्हणजे 2012 मध्ये आपण 140 अब्ज डॉलर्स इतकी सेवांची निर्यात केली होती. याचा अर्थ, दरवर्षी सुमारे सात टक्क्यांची सरासरी वाढ त्यात दिसून येते. मुख्यतः माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार सेवा या उद्योगांचा विकास देशात जसा झालेला आहे, तशीच या क्षेत्रांची निर्यातही उल्लेखनीय स्वरूपाची झालेली आहे. 2026 पर्यंत भारताची आयटी आणि व्यावसायिक सेवांची बाजारपेठ एकत्रितपणे दरवर्षी आठ टक्क्यांपेक्षा जास्त गतीने वाढेल, असा अंदाज इंटरनॅशनल डेटा कॉर्पेरेशन या बाजार संशोधन संस्थेने व्यक्त केला आहे.
कुशल मनुष्यबळ, कमी उत्पादनखर्च आणि उदार धोरणांचा हा परिणाम आहे. भारतात इंग्रजीचा झालेला प्रसार, तरुणांची विश्लेषणात्मक कौशल्ये ही चीनच्या तुलनेत अधिक असून, त्यमुळे जागतिकीकरणाचा काळ सुरू झाल्यापासून आयटी व बीपीओ सेवांनी प्रगती केली.
भारतात होणारी सेवांची आयात गेल्या दहा वर्षांत 83 अब्ज डॉलर्सवरून 160 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढली. परंतु त्या तुलनेत आपली निर्यात अधिक झाल्यामुळे देशाला उत्तमपैकी डॉलर्सचे उत्पन्न मिळाले. 2022च्या पहिल्या 11 महिन्यांतच सेवांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारातून 112 अब्ज डॉलर्स शिलकीत आले. देशाच्या एकूण सेवांच्या निर्यातीत इतर व्यावसायिक सेवा तसेच दूरसंचार, संगणक व माहिती तंत्रज्ञान सेवा यांचा हिस्सा दोनतृतीयांश इतका आहे. उर्वरित उत्पन्न वाहतूक, पर्यटन, मनोरंजन, विमा, बांधकाम व बुद्धिसंपदा हक्कांच्या सेवांमधून मिळते.
गेल्या दशकात अन्य व्यावसायिक सेवांची निर्यात सर्वाधिक गतीने झाली. त्यामध्ये बीपीओ व आयटी कंपन्यांच्या कामगिरीचा वाटा आहेच. परंतु त्याचप्रमाणे व्यावसायिक आणि व्यवस्थापन सल्ला, संशोधन व विकास यांचा मुख्य समावेश आहे. या क्षेत्राची निर्यात गेल्या दहा वर्षांत सरासरी नऊ टक्क्यांनी झाली. बिगरआयटी व बिगरबीपीओ दूरसंचार क्षेत्र यांच्या निर्यातीत सरासरी पाच टक्क्यांची वाढ झाली.
कृषी आणि औद्योगिक क्षेत्राप्रमाणेच सेवा क्षेत्रही अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे असते. करोना महामारीमुळे आर्थिक वाढ घसरली. त्यामुळे 2020-21 साली सेवाक्षेत्राचे 8.4 टक्के इतके आकुंचन झाले. परंतु 2021-22 मध्ये मात्र त्यात 8.2 टक्के वृद्धी झाली.
वाहतूक, साठवणूक, दळणवळण, बॅंकिंग, व्यापार ही काही महत्त्वाच्या सेवांची उदाहरणे होत. डॉक्टर, शिक्षक, धोबी, नाभिक, चर्मकार, वकील यासारख्या वैयक्तिक सेवा असतात, तसेच प्रशासकीय व लेखासेवादेखील असतात. 21व्या शतकात इंटरनेट कॅफे, एटीएम, कॉल सेंटर्स, सॉफ्टवेअर सेवा यांचे क्षितिज विस्तारले आहे. कोणत्याही देशात इस्पितळे, शिक्षणसंस्था, वाहतूक, बॅंका, विमा, टपाल इत्यादी सेवांची आवश्यकता असते. जसजसा आर्थिक विकास होत जातो, तसतशी सेवांची गरज वाढत जाते.
करोनाचे निर्बंध सैल झाल्यानंतर, थेट संपर्कावर बेतलेले सेवा व्यवसाय एकदम पूर्वपदावर आले आणि त्यांच्या मागणीत निरंतर वाढ होत आहे. प्रतिकूल परिस्थितीतही सेवा निर्यात वाढवायची असेल, तर उत्पादनखर्च आटोक्यात आणावाच लागेल. विशेषतः गेल्या काही वर्षांत पर्यटन व आतिथ्य उद्योगाला जास्त भाव आहे. आगामी दहा वर्षांत पर्यटनाचा वार्षिक आठ टक्के दराने विकास व्हावा, असे लक्ष्य आहे. भारताच्या सकल उत्पादनात पर्यटनाचा साडेसहा टक्के वाटा असून, त्यात चार कोटी लोकांना काम मिळाले आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांत हॉटेल व्यवस्थापनशास्त्र आणि आतिथ्य उद्योगाचे प्रशिक्षण घेणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे.
जागतिक पर्यटन नकाशावर जसजसे भारताचे नाव ठळक होत जाईल, तसतशी देशात या क्षेत्राची भरभराट होत जाईल. करोना काळात जेव्हा देशव्यापी टाळेबंदी होती, तेव्हा ई कॉमर्स कंपन्यांवरही बंधने होती. परंतु टाळेबंदी सैल झाल्यावर या कंपन्यांनी कामकाज सुरू केले आणि त्यापैकी काही कंपन्यांनी पुन्हा एकदा किराणा वस्तूंची घरपोच सेवा सुरू केली. फ्लिपकार्ट, ऍमेझॉन, बिग बास्केट, ग्रोफर्स, झोमॅटो, स्विगी या कंपन्यांना सरकारने घरपोच सेवा देण्याकरिता मोकळीक दिली. किराणा सेवा क्षेत्रात लक्षणीय बदल होत आहेत. मुंबईतील “झेप्टो’ या क्विक कॉमर्स स्टार्टअपने दहा कोटी डॉलर्सची भांडवल उभारणी केली आहे. दहा मिनिटांत किराणा माल घरपोच देणाऱ्या या कंपनीचे मूल्यांकन 57 कोटी डॉलर्स असून, त्यामध्ये “वाय कोईमतूर्स’ या कंपनीने गुंतवणूक केली आहे.
फ्लिपकार्ट, उबेर, ड्रीम अकरा, फार्म इझी, पेपर फ्राय, ऍमेझॉन आदी कंपन्यांतील अधिकाऱ्यांनी मिळून झेप्टोचे नेतृत्व सांभाळले आहे. या बदलांमुळे नवनवीन लोकांना नोकरीच्या संधी उपलब्ध झाल्या आहेत. भारतातील ऑनलाइन ग्रोसरी बाजारपेठेचा आकार 2.9 अब्ज डॉलर्स इतका असून, त्यात दरवर्षी 37 टक्क्यांची वाढ अपेक्षित आहे. जोपर्यंत कोविडच्या नवीन व्हेरियंटपासून जग सुरक्षित आहे आणि नव्याने आयात-निर्यातीत कोणतेही अडथळे येत नाहीत, तोपर्यंत देशविदेशांतील सेवांच्या मागणीत वाढच होत जाणार आहे. काही प्रमाणात नरमाईचा फटका बसू शकतो, परंतु मध्यम ते दीर्घ काळात सेवा क्षेत्र प्रगतीच करत राहणार आहे.





