अग्रलेख : थोरातांचा राजीनामा!

विधान परिषदेच्या नुकत्याच झालेल्या शिक्षक-पदवीधर निवडणुकीत महाविकास आघाडीने जोरदार यश मिळवले आहे, त्या यशाबद्दल महाविकास आघाडीकडून विशेषत: कॉंग्रेसच्या गोटातून उत्साही प्रतिक्रिया येण्याऐवजी कॉंग्रेसच्या गोटातून सध्या थोरात, पटोले यांच्या वादाच्याच बातम्या अधिक येऊ लागल्या आहेत. कॉंग्रेसजनांचे दुर्दैव असे की, त्यांना विजयाचा आनंदही नीट साजरा करता येत नाही.
पाचपैकी तीन जागा महाविकास आघाडीने जिंकल्या. त्यात कॉंग्रेसला मिळालेल्याही जागेचा समावेश आहे. या निवडणुकीत नाशिकची जागा पूर्वाश्रमीचे कॉंग्रेस नेते सत्यजीत तांबे यांनी जिंकली. पण त्यांच्या उमेदवारीच्या वादातून कॉंग्रेसमध्ये रणकंदन माजले आहे. याच वादाच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळ कॉंग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी अजून कॉंग्रेस सोडलेली नाही, फक्त पदाचा राजीनामा दिला आहे. हा सगळा वाद काय आहे याची सर्व माहिती मराठी दूरचित्रवाणी वाहिन्यांनी अगदी सुरुवातीपासून लोकांपुढे सादर केली आहे. त्यामुळे हा मूळ विषय बहुतेकांना चांगलाच माहिती आहे. सत्यजीत तांबे यांचे वडील सुधीर तांबे हे नाशिक पदवीधर मतदारसंघातील तीन वेळा निवडून आलेले आमदार आहेत. त्यांनाच कॉंग्रेसने यावेळी पुन्हा उमेदवारी जाहीर केली, पण त्यांनी अर्ज न भरता त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांनी येथून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली व ते जिंकून आले. बाळासाहेब थोरात हे सत्यजीत तांबे यांचे मामा आहेत. त्यामुळे नाशिकचा वाद हा बाळासाहेब थोरात यांच्या घरातील वाद होता. तो वाद त्यांनीच सोडवायला हवा होता. पण त्यांनी नेहमीच्या शैलीत या वादाच्या पार्श्वभूमीवर मौन बाळगले आणि सरतेशेवटी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन कॉंग्रेसची अडचण आणखीनच वाढवून ठेवली.
वास्तविक बाळासाहेब थोरात हे मितभाषी आणि सौम्य प्रकृतीचे राजकारणी असले तरी ते राजकारणात मुरब्बी आहेत. त्यांना पक्षाने अनेक महत्त्वाची पदे सातत्याने देऊन त्यांच्यावर सतत मोठीच मर्जी दाखवली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडून ही राजीनाम्याची कृती अपेक्षित नव्हती. त्यांना पटोले यांनी अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला, एबी फॉर्मचा घोळ त्यांनाच अडचणीत आणण्यासाठी केला गेला, असा आरोप सत्यजीत तांबे यांनी एका पत्रकार परिषदेत त्यांचे नाव न घेता केला आहे. त्यामुळे हा वाद चिघळत गेला आणि त्याची परिणती थोरातांच्या राजीनाम्यात झाली. तथापि, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी या प्रकरणात सांगितलेली माहिती खरी असेल तर ही चूक कोणाची हे बऱ्यापैकी स्पष्ट होऊ शकते. पटोले यांनी म्हटले आहे की, “नाशिकच्या निवडणुकीत सुधीर तांबे यांना उमेदवारी द्यावी अशी सूचना खुद्द बाळासाहेब थोरात यांचीच होती. त्यांच्याच संमतीने हे नाव निश्चित केले गेले होते. पण जर सुधीर तांबे यांना आपल्याऐवजी आपल्या मुलाला यावेळी उमेदवारी द्यावी असे सुचवायचे असेल, तर त्या विषयी त्यांच्याशी चर्चा करून हा वादच होणार नाही, याची दक्षता बाळासाहेब थोरात यांनीच घ्यायला हवी होती.’ पण थोरात यांनी हा वाद सुरू असताना मौन बाळगणेच पसंत केले. त्यांनी त्याचवेळी माध्यमांपुढे येऊन वस्तुस्थिती स्पष्ट करायला हवी होती, ती त्यांनी केली नाही.
पक्षाच्या पातळीवर त्यांनी नेमके काय सांगितले होते हेही कळायला मार्ग नाही. पण त्यांच्या मौनामुळे वाद चिघळत राहिला ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. वास्तविक हा सगळा प्रकार सत्यजीत तांबे यांच्या निवडीनंतर संपुष्टात यायला हवा होता. अपक्ष म्हणून निवडून आलेले सत्यजीत तांबे हे कॉंग्रेसमध्ये परत कसे येतील याचा प्रयत्न बाळासाहेब थोरातांनी करायला हवा होता. पण ते न करता त्यांनी थेट पक्ष नेतेपदाचाच राजीनामा देऊन कॉंग्रेसमधील नाराजीनाट्य आणखीन वाढवले आहे. सध्याच्या पक्षाच्या अडचणीच्या काळात त्यांच्याकडून झालेली ही कृती पक्षालाच कमीपणा आणणारी ठरली आहे, हे नाकारता येत नाही. राज्यात आता विधानसभेच्या पोटनिवडणुका होत आहेत. त्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी समर्थपणे सामोरी जाऊन त्यांना आणखी यश पदरात पाडून घेणे शक्य असताना प्रसार माध्यमांमध्ये कॉंग्रेसच्या अंतर्गत दुफळीच्या बातम्या सातत्याने प्रसारित होणे हे महाविकास आघाडीला विशेषत: कॉंग्रेससाठी नामुष्कीजनक ठरणार आहे. या दुफळीच्या बातम्या कॉंग्रेसच्याच उमेदवाराचे वातावरण खराब करणाऱ्या ठरत आहेत.
बाळासाहेब थोरात हेही आता भाजपच्या मार्गावर असल्याच्याही बातम्या येत आहेत. अर्थात त्याला भाजप नेत्यांकडूनच खतपाणी घातले जात आहे. थोरात भाजपमध्ये आले तर त्यांचा योग्य तो सन्मान ठेवला जाईल, असे विधान भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडून करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर थोरातांनी या अफवांचे जाहीर निराकरण करणे अपेक्षित असताना ते या प्रकरणीही पुन्हा मौन बाळगून बसले आहेत. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाच्या अफवांनाही बळ मिळत आहे. परिणामी त्याचा कॉंग्रेसच्या वातावरणावर विपरीत परिणाम होताना दिसत आहे. राज्याच्या विविध भागांत सध्या कॉंग्रेस क्षीण होताना दिसत आहे. पक्षात नवे इन्कमिंग फारसे होताना दिसत नाही. आहे तेच नेते पक्षात राहतील की नाही याचीच धाकधूक अधिक आहे. हे वातावरण सावरण्याची जबाबदारी ज्या नेत्यांवर आहे ते नेतेही आपसातील संदोपसुंदीत व्यस्त आहेत, त्यांना परिस्थितीचे गांभीर्य नीट लक्षात येईनासे झाले आहे. याचा एकत्रित परिणाम पक्षावरच होताना दिसत आहे.
कॉंग्रेस मजबूत करण्याची जबाबदारी अधिक प्रगल्भतेने कोणी पार पाडताना दिसत नाही ही कॉंग्रेसची शोकांतिका आहे. हा पक्ष मजबुतीने लोकांपुढे गेला तर त्याला बऱ्यापैकी यश लाभू शकते, पण या यशाची त्यांनाच चिंता आहे की नाही, हेच लक्षात येईनासे झाले आहे. गांधी घराण्यातील व्यक्तींचा करिष्मा कामी येईल आणि त्यातून पक्षाला यश मिळेल यावर अवलंबून राहण्याचे दिवस राहिलेले नाहीत. त्यामुळे अशा अस्थिर वातावरणात थोरात यांनी पक्षाच्या नेतेपदाचा राजीनामा देणे हे पक्षालाच अधिक अडचणीचे आणणारे ठरले आहे, हे मात्र निश्चित.




