अग्रलेख : ऑरेशन सिंदूर

काश्मीरमध्ये पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या अत्यंत निर्घृण अशा दहशतवादी हल्ल्यानंतर पंधरा दिवसांनी भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ या मोहिमेअंतर्गत चोख प्रत्युत्तर देण्याचे काम केले आहे. भारतीय संरक्षण दलाच्या तीनही शाखांनी म्हणजे लष्कर, नौदल आणि हवाई दल यांनी 1972 नंतर प्रथमच संयुक्तपणे कारवाई करून पाकव्याप्त काश्मीरमधील आणि पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ले करून ते उद्ध्वस्त करून टाकले. पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर देशभरात अत्यंत संतापाची लाट उसळली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीसुद्धा दहशतवादाला कायमचा गाडण्यासाठी लवकरच कारवाई करण्यात येईल अशी घोषणा केली होती.
आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच नामकरण केलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’ या मोहिमेअंतर्गत पाकिस्तानमध्ये शंभर किलोमीटर आत जाऊन लष्करी दहशतवादी तळांवर हल्ले करून दहशतवादाला गाडण्याचा प्रयत्न झाला आहे, ही निश्चितच अभिनंदनाची बाब आहे. भारत कोणत्या प्रकारची कारवाई करतो याकडे केवळ भारतातील नागरिकांचेच नव्हे तर जगभरातील देशांचेही लक्ष होते. ही कारवाई करत असताना भारताने फक्त दहशतवादी तळांनाच लक्ष केले आहे. पाकिस्तानची लष्करी ठाणी किंवा सर्वसामान्य नागरिक यांना कोणती हानी पोहोचणार नाही याची दक्षता घेतली आहे. गेल्या अनेक वर्षांच्या कालावधीमध्ये भारतातील दहशतवादी कारवायांना जबाबदार असणारे लष्कर-ए-तोयबा किंवा जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनांची मुख्यालये आणि प्रशिक्षण केंद्रे ज्या ठिकाणी होती त्याच ठिकाणी हा हल्ला करून दहशतवाद्यांना जोरदार धडा शिकवण्यात आला आहे.
सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या कारवाईनंतर लगेचच भारतीय संरक्षण दलांतर्फे दोन महिला अधिकार्यांनी या कारवाईची माहिती देऊन काही पुरावेही सादर केले. कारण, यापूर्वी जेव्हा दोनदा भारताने सर्जिकल स्ट्राइक आणि एअर स्ट्राइक केले होते तेव्हा भारतातीलच काही राजकीय पक्षांनीच या कारवाईबाबत शंका उत्पन्न केली होती. यावेळी मात्र भारत सरकारने संपूर्णपणे तयारी करून दहशतवादाला चोख प्रत्युत्तर दिले आहे. 22 एप्रिलच्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेमध्ये जी बैठक झाली होती त्या बैठकीमध्ये या हल्ल्याला जबाबदार असणार्यांना शिक्षा व्हायला हवी अशा प्रकारचा ठराव मंजूर झाला होता. त्या ठरावाचाच आधार घेऊन या हल्ल्याला जबाबदार असणार्यांना शिक्षा देण्याचे काम ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून भारताने केले आहे आणि लष्कराच्या पत्रकार परिषदेमध्ये हीच गोष्ट अधोरेखित करण्यात आली.
या कारवाईनंतर समस्त भारतामध्ये आनंदाचे वातावरण असले तरी आता पाकिस्तान या सर्व कारवाईला कशा प्रकारचे प्रत्युत्तर देतो यावरच भविष्य काळातील घडामोडी अवलंबून राहणार आहेत. अर्थात, गेल्या काही दिवसांच्या कालावधीमध्ये पाकिस्तान सातत्याने प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गोळीबार करत आहे. भारताच्या या हल्ल्यानंतरही पाकिस्तानतर्फे नियंत्रण रेषेवर मोठ्या प्रमाणात गोळीबार केला जात आहे. त्यात तीन निष्पाप नागरिकांचाही मृत्यू झाला आहे. जरी भारताने कारवाई करताना पाकिस्तानमधील निष्पाप नागरिकांचा बळी जाणार नाही याची काळजी घेतली असली तरी तशा प्रकारची काळजी घेण्याचे भान पाकिस्तानला नाही आणि भविष्यातही असणार नाही हे या निमित्ताने गृहीतच धरावे लागणार आहे. भारताने जर आक्रमक भूमिका घेतली तर आम्ही योग्य उत्तर देण्यास तयार आहोत अशा प्रकारचे धोरणही पाकिस्तानने स्वीकारले होते.
अर्थात भारताच्या या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यापूर्वी सर्वप्रथम पाकिस्तानला या दहशतवादी संघटना आणि त्यांचे तळ आपल्या भूमीवर कार्यरत होते याबाबत कबुली द्यावी लागणार आहे. काही वर्षांपूर्वी अमेरिकेने पाकिस्तानात जाऊन ओसामा बिन लादेनचा खात्मा केला होता. तेव्हापासूनच आणि त्यापूर्वीही पाकिस्तान हे दहशतवाद्यांचे आश्रयस्थान आहे हे जगाला माहीत झाले आहे. साहजिकच भारताने केलेल्या या कारवाईमध्ये सर्वसामान्य नागरिक ठार झाल्याचा कांगावा जर पाकिस्तानने सुरू केला असला तरी जैश-ए मोहम्मद किंवा लष्कर-ए-तोयबा या संघटनेची बांधिलकी मानणारे हाफिज सईद आणि अझहर मसूदसारखे दहशतवादी सर्वसामान्य नागरिक होते हे पाकिस्तानला प्रथम सिद्ध करावे लागणार आहे.
मुंबईवर 26 नोव्हेंबर रोजी झालेला हल्ला असो किंवा त्यापूर्वी झालेले दहशतवादी हल्ले असोत किंवा त्यानंतर झालेले किरकोळ हल्ले असोत किंवा पहलगामचा दहशतवादी हल्ला असो या सर्व हल्ल्यांचे नियोजन पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानमधील या दहशतवादी ठिकाणांवर झाले होते. अजमल कसाब आणि डेव्हिड हेडली यासारख्या दहशतवाद्यांचे प्रशिक्षणसुद्धा या दहशतवादी प्रशिक्षण केंद्रांमध्ये झाले होते अशी माहिती भारतीय संरक्षण दलांनी उपलब्ध करून दिली असल्याने पाकिस्तानला त्याचा विचार करूनच भारताला प्रत्युत्तर द्यावे लागणार आहे.
अर्थात, पाकिस्तान हा देश उथळ राजकारण्यांच्या हातात आहे आणि या उथळ राजकारणाचे नियंत्रण लष्कराकडे असल्यामुळे कोणतेही चुकीचे साहस त्यांच्याकडून होऊ शकते हे लक्षात घेऊनच आता भारताला सावधगिरी बाळगावी लागणार आहे. केवळ प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर गोळीबार करून निष्पाप नागरिकांना लक्ष करत असतानाच आणखी एखादे दुःसाहस पाकिस्तानकडून केले जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. अर्थात, त्यानंतर पुन्हा एकदा भारत जोरदार प्रत्युत्तर देईल आणि तेव्हा भारताचे लक्ष्य पाकिस्तान आणि पाकिस्तानचे लष्कर हेच असेल हेसुद्धा विसरून चालणार नाही. आता भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंमलात आणले असल्याने पाकिस्तानची प्रतिक्रिया अपेक्षितच आहे. पाकिस्तानच्या या प्रतिक्रियेतून प्रत्यक्ष युद्धाला तोंड फुटते की नाही हे लवकरच समजेल.





