अग्रलेख : शांततेचे नोबेल?

अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल पुरस्कार दिला जावा, अशी शिफारस पाकिस्तानने केल्यामुळे जागतिक स्तरावर पुन्हा एकदा नोबेल पुरस्काराची चर्चा सुरू झाली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लष्करी संघर्ष थांबवण्यात मोठी भूमिका बजावून शांतता प्रस्थापित केल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार दिला जावा, अशी शिफारस पाकिस्तानकडून करण्यात आली आहे. त्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘मला कधीच शांततेचे नोबेल मिळणार नाही’ असे म्हटले आहे.
अर्थात, डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्याला नोबेल पुरस्कार मिळावा अशी अपेक्षा लपवून ठेवलेली नाही. अध्यक्षपदाच्या पहिल्या कारकिर्दीतही त्यांनी अनेक वेळा मी शांततेच्या नोबल पुरस्काराचा हक्कदार आहे असे जाहीर व्यासपीठावर सांगितले होते आणि यावेळी दुसरा टर्ममध्येसुद्धा त्यांनी आपली ही महत्त्वाकांक्षा लपवून ठेवलेली नाही. पण पाकिस्तानने केलेल्या शिफारसीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना आपल्याला नोबेल पुरस्कार मिळणार नाही याची जी कारणे त्यांनी दिली आहे त्यामध्येच त्यांची महत्त्वाकांक्षासुद्धा दिसून येते. गेल्या काही वर्षांच्या कालावधीमध्ये आपण जगात शांतता प्रस्थापित करण्यासाठी काय काय केले याची जंत्री या निमित्ताने त्यांनी वाचून दाखवली आहे.
गेली तीन वर्षे सुरू असलेले रशिया-युक्रेन युद्ध थांबण्यासाठी आपण खूप प्रयत्न केले असे त्यांचे म्हणणे आहे, तर भारत-पाकिस्तान संघर्ष तीव्र होऊ नये म्हणून तो थांबवण्यासाठी आपण प्रयत्न केले, असाही त्यांचा दावा आहे. हा दावा भारताने नेहमीच खोडून काढला आहे. इस्रायल आणि इराण यांच्यातील लष्करी संघर्षामध्येसुद्धा अमेरिकेची शांततेची भूमिका असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला असला, तरी अमेरिकेनेच इराणच्या काही तळांवर हल्ले केल्याच्या गोष्टी समोर येत आहेत. या सर्व कारणांची जंत्री देत असतानाच ट्रम्प यांना शांततेचे नोबेल हवे आहे हे लपवायचेही नाही. कारण यापूर्वी अमेरिकेच्या ज्या अध्यक्षांना या पुरस्काराने गौरवण्यात आले होते त्या बराक ओबामा यांना मिळालेल्या शांततेच्या नोबेलवर ट्रम्प यांनी जोरदार टीका केली होती.
अध्यक्षपदावर विराजमान झाल्यावर नऊ महिन्यांतच बराक ओबामा यांना शांततेचा नोबेल देण्यात आला होता. कोणतेही कारण नसताना ओबामा यांना शांततेचे नोबेल मिळते तर मी एवढ्या सगळ्या गोष्टी केल्यानंतर मला ते का मिळू नये, असा दावा ट्रम्प यांनी केला आहे. या काही वर्षांमध्ये दरवर्षी कोणता तरी देश, देशांचा समूह ट्रम्प यांना आता नोबेल मिळावे म्हणून शिफारस करत असतात. पण आतापर्यंत नोबेल पुरस्कार देणार्या समितीने या शिफारशीला मान्यता दिलेली नाही. आताही पाकिस्तानने केलेल्या शिफारसीकडेही लक्ष दिले जाईल असे नाही.
आजपर्यंतचा नोबेल शांतता पुरस्काराचा इतिहास पाहिला तर रूझवेल्ट किंवा ओबामा यांच्यासारखे काही अपवाद वगळता देशाच्या प्रमुखांना खूप कमी प्रमाणात नोबल देण्यात आले आहे. शांतता प्रस्थापित करणार्या लोकांसाठीच हा नोबेल पुरस्कार आरक्षित असतो. मदर तेरेसा किंवा मलाला युसूफझाई यासारख्या लोकांनी ज्या पुरस्कारावर मोहर उमटवली आहे त्या पुरस्कारांचा सन्मान डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारख्या संघर्षवादी नेत्यांना दिला जाईल अशी कोणतीही शक्यता दिसत नाही. जगाच्या कानाकोपर्यात अनेक ठिकाणी लष्करी संघर्ष सुरू असताना तो संघर्ष मिटवण्याचे काम करण्याऐवजी त्यात तेल ओतण्याचे काम अमेरिकेकडून अनेक वेळा होत असते.
विशेषतः ट्रम्प यांच्या अध्यक्ष कारकिर्दीमध्ये अमेरिकेत संघर्षाची परिस्थिती वाढत चालली आहे. अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये अस्वस्थता वाढत चालली आहे. अजूनही काही शहरांमध्ये हिंसाचार सुरू आहेत. सर्व गोष्टी समोर दिसत असतानासुद्धा पाकिस्तानने केवळ अमेरिकेची मैत्री असावी या एकाच हेतूने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार दिला जावा अशी शिफारस केली आहे. पाकिस्तान यांच्यातील संघर्ष कोणाच्याही मध्यस्थीमुळे संपला नाही, हा जो भारताचा दावा आहे तो हाणून पाडण्यासाठीच पाकिस्तानकडून या रणनीतीचा वापर केला जात आहे हे उघड आहे.
आता भारतालासुद्धा या रणनीतीला उत्तर द्यावे लागणार आहे. जगात अनेक ठिकाणी सध्या अशांत परिस्थिती असताना आणि लष्करी संघर्ष वाढत असताना जगातील कोणतीही व्यक्ती किंवा संस्था सध्या शांततेचा नोबल पुरस्कार देण्याच्या पात्रतेची नाही असाच निष्कर्ष या निमित्ताने काढावा लागणार आहे. या निमित्ताने आपल्या पात्रतेचे ढोल बडवून घेण्याचे कारण डोनाल्ड ट्रम्प यांना मिळाले आहे. पाकिस्तानसारखे देश राजकीय लाभाचा विचार करूनच या विषयाकडे पहात आहेत. हाच या संपूर्ण प्रकरणाचा निष्कर्ष आहे. पाकिस्तान सरकारने केलेल्या शिफारशीचा परिणाम होऊन डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचे नोबेल पुरस्कार मिळण्याची कोणतीही शक्यता नाही हेही समजून घ्यायला हवे.





