अग्रलेख : मस्क उवाच
एलॉन मस्क (Elon Musk) नावाचा एक अमेरिकन उद्योगपती सध्या खूप चर्चेत आहे. तो रोज काहीतरी एक नवीन ट्विटर संदेश टाकतो आणि त्यातून भारतात नाहक एक वाद निर्माण होतो.

Elon Musk : एलॉन मस्क (Elon Musk) नावाचा एक अमेरिकन उद्योगपती सध्या खूप चर्चेत आहे. तो रोज काहीतरी एक नवीन ट्विटर संदेश टाकतो आणि त्यातून भारतात नाहक एक वाद निर्माण होतो. परवाच त्यांनी एक ट्विटर संदेश टाकताना अंबानींचा उल्लेख ‘पंतप्रधान अंबानी’ असा केला होता, त्यावर देशभर खूप उलटसुलट प्रतिक्रिया उमटल्या.
हा कोण मस्क आमच्या देशाच्या अंतर्गत व्यवहारात नाक खुपसतो आणि टीकाटिप्पणी करतो, अशी प्रतिक्रिया काहींनी दिली; तर भारताच्या स्थितीचे नेमके वर्णन करून मस्क (Elon Musk) याने जगात भारताची अब्रू चव्हाट्यावर मांडली, अशी प्रतिक्रिया दुसर्या बाजूने दिली गेली. मुख्य वादाचा मुद्दा मात्र या सगळ्या चर्चेत दुर्लक्षित राहिला आहे तो आपण भारतीयांच्या दृष्टीने जरा महत्त्वाचा आहे.
एलॉन मस्क (Elon Musk) याची स्टारलिंक नावाची एक दूरसंचार कंपनी आहे. ती थेट उपग्रहाद्वारे जगातल्या कोणत्याही दुर्गम भूप्रदेशात इंटरनेट आणि दूरसंचार सेवा देऊ शकते. अगदी तुम्ही खोल समुद्रात असलात तरीही तिथे तुम्हाला डार्लिंग स्टारलिंकच्या सेवेमार्फत वेगवान इंटरनेट कनेक्शन उपलब्ध होऊ शकते. भारतात आज 5जी सेवा सुरू झाली असली, तरी आपल्या इंटरनेट कनेक्शनची स्थिती अशी आहे की तुम्ही बोलत बोलत लिफ्टमध्ये गेलात तरी तुमचा फोन बंद पडतो किंवा तुम्ही ‘आउट ऑफ रेंज’ होता किंवा अगदी घरातून जिन्यात चालत असला तरीही तुमच्या नेटवर्क कनेक्शनला प्रॉब्लेम येऊ शकतो.
सांगायचा मुद्दा एवढाच की आज आपण कितीही ‘डिजिटल इंडिया’चा नारा देत असलो तरीही इंटरनेट कनेक्शनच्या बाबतीत आपण अजूनही तितके सक्षम नाही आहोत. प्रवास करतानाही आपल्याला हा अनुभव येतो. थोडं शहराच्या बाहेर पडलं की आपली रेंज जाते किंवा इंटरनेट कनेक्शन डिस्टर्ब होते.
हायवेच्या थोडं आतल्या बाजूला गेलं की आपल्याला हाच विस्कळीत इंटरनेट कनेक्शनचा अनुभव येतो. या पार्श्वभूमीवर जर मस्क याने भारतात उपग्रह आधारित इंटरनेट सेवा आपल्याला परवडणार्या किमतीत देऊ केली तर ती आपण का नाकारतो आहोत, हा प्रश्न कोणीही विचारू शकेल.
याचे सगळ्यात मुख्य कारण भारतात जर मस्क याची स्टारलिंक कंपनी आली तर अंबानी यांची जिओ कंपनी व्यावसायिकदृष्ट्या अडचणीत येऊ शकेल. त्यामुळे अर्थातच अंबानी यांचा व्यक्तिगत स्वार्थासाठी स्टारलिंकला विरोध असणे अगदी स्वाभाविक आहे. म्हणून केवळ अंबानींच्या हिताला प्राधान्य देऊन जगातले एक उत्तम तंत्रज्ञान आपण का नाकारायचे, हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे.
आज जगातल्या 162 देशांमध्ये स्टारलिंक सेवा देत आहे. या कंपनीने भारताकडेही परवाना मागितला आहे, पण गेली दोन वर्षे भारत सरकारने त्यांना अनुमती दिलेली नाही किंवा त्यासाठी अजून त्यांना झुंजत ठेवले आहे.
त्यामुळे याची अवस्था शेपटीवर पाय पडलेल्या सापासारखी झाली आहे. म्हणूनच तो असे विषारी फुत्कार बाहेरून मारत असावा. याचे आणखीन एक उत्पादन असलेली विजेवर चालणारी टेस्ला कार जगभर सध्या जोरात सुरू आहे. त्या टेस्ला कारला मात्र आपण भारतात अनुमती दिलेली आहे.
मुंबईत काही दिवसांपूर्वी या टेस्ला कंपनीच्या विक्रीला समारंभपूर्वक प्रारंभ झाला आणि महाराष्ट्रातल्या एका मंत्र्याने त्यांची पहिली कार अभिमानाने विकत घेतली. या पार्श्वभूमीवर सामान्य माणसाचा प्रश्न एवढाच आहे की, जर तुम्हाला मस्क यांची कार चालते मग त्यांच्या स्टारलिंकची इंटरनेट सेवा का चालत नाही.
या प्रश्नाचे समर्पक उत्तर सरकारकडे किंवा त्यांच्या समर्थकांकडे नाही. असा इंटरनेट किंवा दूरसंचार विषयाचा मुद्दा जेव्हा उपस्थित होतो त्यावेळी पहिले कारण राष्ट्रीय सुरक्षा असे दिले जाते. स्टारलिंकला अनुमती दिल्याने भारतातील राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येत आहे किंवा धोक्यात येण्याची शक्यता आहे असे एक सरधोपट कारण देऊन त्यांना बंदी घालता येईल काय याचाही विचार आपण करायला हवा.
आज देशातल्या अनेक दुर्गम भागात अजूनही इंटरनेट कनेक्शन उपलब्ध होत नाही. देशातल्या सर्व ठिकाणी विनासायास आणि किफायतशीर दरात जनतेला त्याचा लाभच होणार आहे.
अमेरिकेकडून घातले जाणारे सगळे निर्बंध मोदी सरकार निमूटपणे सहन करत असताना ही सेवा मात्र ते कटाक्षाने नाकारत आहेत. यामागे केवळ आपल्या उद्योगपती मित्राच्या व्यवसायाचे हित जपणे एवढा एकमेव इरादा आहे, असा आरोप आता विरोधकांकडून होऊ लागला आहे. त्यातच मस्क याने अंबानी यांचा ‘पंतप्रधान अंबानी’ असा उल्लेख करण्याने आगीत तेलच ओतले गेले आहे. हे सगळे संवेदनशील विषय इतक्या थिल्लर पातळीवर जाण्याने देशाची ही अप्रतिष्ठाच होत असते हा मुद्दाही आपल्याला लक्षात घ्यावा लागतो.
अंबानीला भारताचा पंतप्रधान म्हणण्याची हिंमत मस्क (Elon Musk) करतोच कसा, त्याच्यात एवढे धाडस कशाच्या आधारावर आले याचीही पार्श्वभूमी आपल्याला तपासावी लागते. देशातील भाजप सरकार पुढे आज देशांतर्गत विरोधाचे मोठे आव्हान उभे असतानाच आंतरराष्ट्रीय पातळीवरूनसुद्धा भारत सरकारला कोंडीत पकडण्याचा हा जो प्रयत्न होतो आहे त्याचेही आपसात काही कनेक्शन आहे का, अशी शंकाही काही जण उपस्थित करत आहेत. त्यामुळे हा सगळा गदारोळ पाहता मोदी सरकारच्या पुढे खर्या अर्थाने आव्हानात्मक स्थिती निर्माण झाली आहे, असा निष्कर्ष मात्र आपल्याला काढता येतो.






