अग्रलेख : सारं काही शांत?

भारतीय संस्कृतीत त्यातही मराठी संस्कृतीमध्ये प्रचंड उत्साहाने साजरा केल्या जाणार्या गणेशोत्सवाची सांगता नेहमीच्या उत्साहाच्या वातावरणात झाली आणि दहा दिवस चाललेल्या या महत्त्वाच्या उत्सवाला पूर्णविराम मिळाला. सर्वसाधारणपणे पोलीस प्रशासन आणि सर्वसामान्य प्रशासन यांच्यासाठी आव्हान ठरणारा गणेशोत्सव यावर्षी अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात संपन्न झाला त्याबद्दल या उत्सवाची निगडित असलेल्या सर्वच घटकांचे अभिनंदन करावे लागणार आहे. गणेशोत्सवानंतर इतर उत्सवांना सुरुवात होते. आता पंधरा दिवसांनी शारदोत्सवाला प्रारंभ होईल. त्यानंतर काही दिवसांनी दीपोत्सव येईल.
उत्सवांच्या या सर्व कालावधीमध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत असल्याने सर्वसामान्य नागरिक, छोटे व्यापारी ते मोठे उद्योगपती या सर्वांसाठीच हा काळ महत्त्वाचा असला, तरी यावेळी जो एक महत्त्वाचा विषय समोर आला होता त्यालाही प्राधान्य द्यावे लागणार आहे. तो म्हणजे ध्वनी प्रदूषण. यावर्षी महाराष्ट्रात सर्वत्र डीजे डॉल्बी आणि लेझर प्रणाली यांना विरोध करण्यात आला होता. याबाबतीत न्यायालयाच्या निर्णयानंतरही केवळ राजकीय नेत्यांच्या आशीर्वादामुळे अनेक ठिकाणी कानठळ्या बसवणारी ध्वनियंत्रणा आणि डोळे दीपवून टाकणारी प्रकाश योजना वापरण्यात आली होती.
गणेशाचे आगमन असो किंवा गणेशाला निरोप देणे असो या दोन्हीही कालावधीमध्ये अनेक ठिकाणी कानाला आणि डोळ्यांना त्रास देणारी यंत्रणा वापरण्यात आली होती. बहुतांश मंडळांनी जरी न्यायालयाच्या निर्णयाचे पालन केले असले, तरी अशी अनेक मंडळे होती ज्यांनी न्यायालयाच्या निर्णयाकडे सपशेल दुर्लक्ष करून ध्वनी प्रदूषण करणारी यंत्रणा आपल्या उत्सवामध्ये वापरली. राज्यात अनेक ठिकाणी ज्येष्ठ नागरिक संघटना किंवा काही सामाजिक संघटनांनी डीजे विरोधात आंदोलन केले. तेव्हा काही जणांना धमकी देण्याचे प्रकारही झाले होते.
नागरिकांनी किंवा इतर संघटनांनी संबंधित सरकारी अधिकार्यांना निवेदन देऊनही अनेक ठिकाणी प्रदूषणाची मर्यादा ओलांडण्यात आली होती. दुसरीकडे घरगुती गणेशोत्सवामध्ये सर्वसामान्य नागरिक प्रदूषणाचा खूपच काळजीने आणि गंभीरपणे विचार करतो असे दिसते. गेल्या काही वर्षांमध्ये नद्यांमध्ये किंवा पाण्याच्या स्रोतांमध्ये गणेश विसर्जन करण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर कमी झाले आहे. अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांनी उपलब्ध करून दिलेल्या पाण्याच्या कुंडांमध्येच गणेश विसर्जन केले जाते किंवा अनेक जण आता आपल्या घराच्या दारातच बादलीमध्ये किंवा मोठ्या भांड्यामध्ये गणेशाचे विसर्जन करू लागले आहेत. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्ती घेण्याचे प्रमाणही कमी झाले असून मातीच्या मूर्त्यांची संख्या यावर्षी वाढलेली दिसली.
एकीकडे सर्वसामान्य नागरिक प्रदूषणविषयक सर्व नियमांचे पालन करत असताना सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणार्या बहुतांश मंडळांना मात्र कोणत्याही नियमांचे पालन करायचे नव्हते असेच दिसते. जरी स्थानिक पातळीवर प्रशासकीय अधिकार्यांनी आणि पोलिसांनी अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांवर गुन्हे दाखल केले असले तरी त्याचा कोणताही परिणाम झालेला दिसला नाही. अनेक ठिकाणी स्थानिक राजकीय नेत्यांचा या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आशीर्वाद असल्याने प्रदूषणाच्या नियमांचा सर्रास भंग झालेला दिसला. गेल्या वर्षाच्या तुलनेने हे प्रमाण जरी कमी असले तरी ते संपूर्णपणे बंद झालेले नाही. दरवर्षी उत्सवाच्या ऐन पार्श्वभूमीवरच विविध सामाजिक संघटना न्यायालयात जाऊन याबाबत दाद मागताना दिसतात. खरे तर उत्सवाच्या खूप आधी याबाबत जर न्यायालयात विषय गेला, तर न्यायालयाला एखादा महत्त्वाचा आदेश देणे शक्य होते.
पुढील उत्सवाबाबत आतापासूनच पावले उचलावी लागतील. गणेशोत्सव जरी आता संपला असला तरी नजीकच्या कालावधीमध्ये सर्वच धर्मांचे काही प्रमुख सण साजरे केले जाणार आहेत आणि प्रत्येक वेळी ध्वनीप्रदूषण, जलप्रदूषण, हवा प्रदूषण यांच्यासाठी आव्हान निर्माण करणारी परिस्थिती तयार होणार आहे.दीपोत्सवातील फटाक्यांची आतषबाजी अशीच त्रासदायक ठरते.
ध्वनी प्रदूषण आणि हवा प्रदूषणाची गंभीर परिस्थिती त्या कालावधीमध्ये निर्माण होते. खरे तर आवाज करणार्या फटाक्यांबाबत सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट निर्देश असूनही अद्यापही या फटाक्यांबाबत अंमलबजावणी होऊ शकत नाही हे वास्तव आहे. ज्याप्रकारे वैयक्तिक पातळीवर मोठ्या प्रमाणावर प्रबोधनात्मक चळवळ यशस्वी होताना दिसत आहे, त्याच प्रकारे सार्वजनिक पातळीवर उत्सव साजरे करत असतानाही ते शांततेने आणि प्रदूषणाला हानी पोहोचणार नाही अशा मार्गाने साजरे केले जावेत अशी मानसिकता तयार करणे हेच मोठे आव्हान ठरणार आहे. देशातील कोणत्याही धर्माचे उत्सव साजरे केले जात असताना तेथे अनेक वेळा पोलिसांना आणि प्रशासनाला लवचिक भूमिका घ्यावी लागते.
कारण कधी कोणाची अस्मिता दुखावली जाईल आणि भावना दुखावल्या जातील हे सांगता येत नाही. साहजिकच आता गणेशोत्सवाच्या सांगतेनंतर सारं काही शांत शांत झाले असले तरी आगामी कालावधीमध्ये पुन्हा एकदा आव्हानात्मक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. अर्थात सर्वसामान्य नागरिकांनी वैयक्तिक पातळीवर हा विषय आपल्या हातात घेतला तर सर्वच उत्सव शांततेने पार पडतीलच शिवाय पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी मोठा हातभार लागेल.





