अग्रलेख : भारत-श्रीलंका मैत्री

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सातत्याने होणार्या परदेश दौर्यावर जरी नेहमीच टीका केली जात असली, तरी या दौर्यांच्या निमित्ताने नरेंद्र मोदी काही मैत्रीसंबंध निर्माण करत असतात. नुकताच नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेचा दौरा केला. या दौर्याच्या निमित्ताने उभय देशांनी अनेक महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करून करार केले. या निमित्ताने भारत आणि श्रीलंका या दोन देशातील मैत्रीचा नवा अध्याय सुरू झाला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये काही ना काही कारणाने भारत आणि श्रीलंका यांच्यातील संबंध तणावपूर्ण आणि विस्कळीत होत असल्याच्या पार्श्वभूमीवर श्रीलंकेत नव्याने सत्तेवर आलेल्या अध्यक्ष दिसनायके यांनी ज्या प्रकारे भारताकडे मैत्रीचा हात पुढे केला आहे आणि भारतानेसुद्धा तो हात स्वीकारला आहे ते निश्चितच अभिनंदनीय आहे.
तीन ते चार वर्षांपूर्वी श्रीलंकेमध्ये राजकीय अराजकता माजली होती. देशातील आंदोलकांनी श्रीलंकेतील सरकार उलथवून टाकले होते. श्रीलंकेची आर्थिक परिस्थिती डबघाईला आली होती.त्यावेळी भारताने श्रीलंकेला मदत केली होती. जेव्हा जेव्हा श्रीलंकेला मदतीची गरज असते तेव्हा तेव्हा भारताने मदत केल्याचे दिसून येते. गेल्यावर्षी श्रीलंकेत दीर्घकाळानंतर जेव्हा अध्यक्ष निवडणूक झाली तेव्हा दिसनायके यांच्या नेतृत्वाखाली सरकार सत्तेवर आले. खरे तर दिसनायके यांचा राजकीय पक्ष हा मार्क्सवादी विचारांचा आणि डाव्या धोरणांकडे झुकलेला आहे. साहजिकच दिसनायके यांच्या नेतृत्वाखालील हे सरकार चीनच्या अधिपत्याखाली जाईल आणि चीनलाच आपला मित्र समजेल असे वाटत असतानाच आता भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये जे दहा महत्त्वाचे करार झाले ते पाहता श्रीलंकेने चीनपेक्षाही भारताला मित्र म्हणून प्राधान्य दिले आहे असेच दिसून येते.
श्रीलंकेच्या भूमीवरून भारताच्या सुरक्षेला धोका पोहोचेल अशा कोणत्याही कारवायांना परवानगी दिली जाणार नाही ही श्रीलंका सरकारने दिलेली ग्वाही भारतासाठी महत्त्वाची आहे. बाकी सर्व विषयांमध्ये श्रीलंकेच्या हिताला झुकते माप देऊन भारताने श्रीलंकेची मैत्री आपल्याकडे वळवून घेण्यास प्राधान्य दिले आहे. 40 वर्षांपूर्वी राजीव गांधी पंतप्रधान असण्याच्या कालावधीमध्ये श्रीलंकेत लिबरेशन टायगर्स ऑफ तामिळ इलम आणि इतर तमिळ संघटनांच्या कारवाया सुरू होत्या तेव्हा श्रीलंकेच्या मदतीसाठी भारताने श्रीलंकेत शांतिसेना पाठवली होती. आता भारताने पुन्हा एकदा श्रीलंकेच्या संरक्षणाच्या विषयांमध्ये लक्ष घातले आहे आणि उभय देशांमध्ये संयुक्त लष्करी कवायती, तंत्रज्ञानाची देवाणघेवाण आणि प्रशिक्षण अशा प्रकारचा संवाद होणार आहे.
श्रीलंका हा भारताचा प्रमुख शेजारी असला तरी त्याची जमिनीची सीमा भारताला लागून नाही. पण समुद्री सीमा मात्र लागून असल्यामुळे संरक्षणदृष्ट्या श्रीलंका हे एक महत्त्वाचे ठाणे मानले जाते. भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये सांस्कृतिक साम्यही आहे. साहजिकच चीनच्या साम्राज्यवादी धोरणाच्या नादी लागण्यापेक्षाही भारताच्या लोकशाहीवादाचा मार्ग श्रीलंकेच्या नव्या सत्ताधार्यांनी स्वीकारला ही खरंच महत्त्वाची गोष्ट आहे. भारताचे शेजारी असलेले पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्याशी भारताचे संबंध सध्या बिघडलेले आहेत. त्याला ते दोन देशच जबाबदार आहेत. दुसरीकडे नुकताच म्यानमारमध्ये झालेल्या भूकंपाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने तेथील पुनर्वसनामध्ये महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
बांगलादेशसारख्या देशाच्या मैत्रीची आम्हाला गरज नाही, आम्हाला इतरही शेजारी मित्र आहेत हेच दाखवण्याचा प्रयत्न या निमित्ताने भारताने केला आहे. भारत आणि श्रीलंका यांच्यातील नव्या मैत्रीच्या निमित्ताने तोच मुद्दा अधोरेखित करण्याचा भारताचा प्रयत्न आहे. श्रीलंकेसारख्या देशामध्ये तामिळी आणि सिंहली दोन्ही समाजांचा प्रभाव असल्यामुळे आणि अजूनही तेथे अंतर्गत पातळीवर स्वतंत्र तामिळ राष्ट्राची चर्चा केली जात असल्याने भारतासारखा देश जेव्हा श्रीलंकेबरोबर एखादा करार करतो तेव्हा त्यामध्ये तामिळ लोकांची अस्मिता हा विषयसुद्धा समोर येतो. हे लक्षात आल्यानेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंकेच्या अध्यक्षांंबरोबर चर्चा करतानाच श्रीलंकेतील तामिळी समुदायाबरोबरही चर्चा करून त्यांच्या अस्मितेचे रक्षण केले जाईल अशी ग्वाही दिली आहे.
तामिळनाडूतील सध्याचे सत्ताधारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विविध प्रकारे विरोध करत असल्याच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी श्रीलंकेत जाऊन साधलेला हा समतोल महत्त्वाचा आहे. श्रीलंकेचे अध्यक्ष दिसनायके यांनासुद्धा दोनही समुदायांना खूश करणे भाग आहे. ज्याप्रकारे दिसनायके यांच्यावर श्रीलंकेतील मतदारांनी विश्वास ठेवून त्यांच्या हातात सत्ता दिली आहे त्याचा विचार करता त्यांना आगामी कालावधीमध्ये भारतासारख्या देशाशी मैत्री करूनच पुढे जावे लागणार आहे. श्रीलंकेतील महापूर असो, भूकंप असो किंवा डबघाईला आलेली आर्थिक स्थिती असो प्रत्येक वेळी भारताने मदतीचा हात पुढे केला आहे याचा विसर श्रीलंकेला पडलेला नाही.
म्हणूनच यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौर्यामध्ये कोणत्याही परदेशी नेत्याला जो सन्मान दिला जात नाही तो मोदी यांना देण्याचा निर्णय श्रीलंकेच्या सत्ताधार्यांनी घेतला. श्रीलंकेच्या अंतर्गत बाबींमध्ये लक्ष घालण्यासाठी उत्सुक असलेल्या चीनलाही या निमित्ताने बाजूला ठेवण्याचे काम उभय देशांनी केले आहे, जे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे. नरेंद्र मोदी यांच्या या दौर्याच्या निमित्ताने उभय देशांमध्ये जे मैत्रीचे नवीन पर्व सुरू झाले आहे ते आगामी कालावधीमध्ये अशाच प्रकारे वृद्धिंगत होत राहील अशीच अशा या निमित्ताने करावी लागेल.





