अग्रलेख : विजयच्या राज्यात
देशातील विविध राज्यांमध्ये विविध प्रकारचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक खेळ सुरू असताना तामिळनाडूचे मुख्यमंत्री (CM Vijay) म्हणून प्रथमच सत्तेवर आलेले नवोदित विजय यांच्या राज्यामध्ये मात्र बरेच काही चांगले सुरू आहे.

CM Vijay : देशातील विविध राज्यांमध्ये विविध प्रकारचे राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक खेळ सुरू असताना तामिळनाडूचे मुख्यमंत्री (CM Vijay) म्हणून प्रथमच सत्तेवर आलेले नवोदित विजय यांच्या राज्यामध्ये मात्र बरेच काही चांगले सुरू आहे. देशातील सर्वात प्रगत राज्य मानल्या गेलेल्या महाराष्ट्रामध्ये सत्तेचा घाणेरडा खेळ सुरू आहे. आमदार खासदारांची फोडाफोड सुरू आहे.
उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यामध्ये राम मंदिराच्या दानपेटी वरच डल्ला मारला जात आहे. पश्चिम बंगालमध्येही घाणेरडे सत्ताकारण सुरू आहे. कर्नाटकसारख्या राज्यामध्ये मुख्यमंत्री बदलण्याचा खेळ झाला. एकूणच सर्वत्र सत्तेचा बाजार (CM Vijay) मांडला असतानाच तामिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी मात्र गेल्या महिन्याभराच्या कालावधीमध्ये विविध प्रकारचे निर्णय घेऊन आपली भविष्यातील दिशा निश्चित केलेली दिसते.
अर्थात, कोणत्याही व्यक्तीला जेव्हा एखादे पद मिळते तेव्हा प्रारंभीचा उत्साह चांगला असतो, याच जाणिवेतून विजय यांनी कामाला सुरुवात केली आहे अशा प्रकारची कुत्सित टीका जरी त्यांच्यावर होत असली तरी ज्या प्रकारचे काम सध्या मुख्यमंत्री विजय (CM Vijay) करत आहेत ते निश्चितच आदर्श असे मानावे लागेल. अर्थात तामिळनाडूतील विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन वर्ष आधी स्थापन झालेल्या विजय यांच्या पक्षाने निवडणुकीच्या कालावधीमध्ये मतदारांना जी आश्वासने दिली होती ती प्राधान्याने पूर्ण करण्याकडे विजय यांचा कल आहे हे उघड आहे.
आपण मतदारांची फसवणूक करत आहोत असा संदेश कोठेही जाता कामा नये याच हेतूने विजय यांनी सत्तेवर आल्या आल्या प्रथम 200 युनिटपर्यंतची वीज मोफत केली. महिलांना बसप्रवास मोफत केला. जाहिरनाम्यातील दोन महत्त्वाची आश्वासने पूर्ण केल्यानंतर विजय यांनी शासन आणि प्रशासन याकडे लक्ष दिले. सध्या विजय ज्या प्रकारचा कारभार करत आहेत ते पाहता एखादी मोठी कमर्शियल कंपनी एखादा जनरल मॅनेजर किंवा सीईओ ज्या प्रकारे चालवतो त्याच प्रकारे व्यावसायिक दृष्टिकोनातून तामिळनाडूचा कारभार करण्याकडे विजय यांचा कल दिसत आहे.
दररोज 10 ते 6 या कालावधीमध्ये मंत्रालयात बसून विजय कारभार पाहत असतात. त्यांची वेशभूषा एखाद्या जनरल मॅनेजर सारखीच असते. कुठेही राजकीय नेत्याचा वास येत नाही. विजय आपला जेवणाचा डबासुद्धा घरून घेऊन येतात. लंच मीटिंग किंवा डिनर मीटिंग हे फॅड त्यांनी संपवून टाकले आहे आणि आपल्या सर्व अधिकार्यांनी आणि मंत्र्यांनी अशाच प्रकारे काम करावे अशीच अपेक्षा त्यांनी बाळगली आहे.
नुकतीच विजय यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांची बैठक घेऊन कायदा व सुव्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आदेश दिले आहेत. एफआयआर जलद गतीने नोंद करून तपास पूर्ण करावा आणि त्यामध्ये कोणीही कोणाचाही हस्तक्षेप मान्य करू नये असे स्पष्ट आदेश दिले आहेत. अंमली द्रव्यांचा व्यापार संपवण्याकडे त्यांनी लक्ष दिले आहे.
राज्यातील शिक्षण संस्था, धार्मिक स्थळे याच्या आसपास दारूची दुकाने असू नयेत हा निर्णय त्यांनी घेतला असून गेल्या महिनाभरात अशी 600 पेक्षा जास्त दुकाने काढून टाकली आहेत. मंदिरांच्या दानपेटीतील निधीचा वापर मंदिरांच्या विकासासाठीच करावा आणि इतर कोणत्याही कारणासाठी तो करू नये असा निर्णय घेतला आहे. मंदिराच्या दानपेटीत मिळणार्या पैशाच्या निमित्ताने कमर्शियल कॉम्प्लेक्स किंवा इतर व्यापारी उद्योग उभे करण्याच्या मनोवृत्तीला त्यामुळे लगाम बसला आहे.
तामिळनाडू राज्यासाठी या सर्व गोष्टी करत असतानाच केंद्रातील सरकार बरोबर सहकार्य करणेही महत्त्वाचे आहे हे त्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे केंद्र सरकारने बोलावलेल्या कोणत्याही बैठकीला ते स्वतः किंवा त्यांचा प्रतिनिधी हजर असतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांनी तामिळनाडूतील (CM Vijay) काही महत्त्वाचे विषयही त्यांच्यासमोर मांडले आहेत. श्रीलंकेच्या तुरुंगात असलेल्या तामिळ कैद्यांची सुटका करण्याचा विषय असो किंवा मासेमारीचा विषय असो हे विषय पंतप्रधानांच्या समोर मांडून त्यांनी केंद्र सरकारसोबतही सहकार्याची भावना ठेवली आहे.
ज्या राज्यामध्ये विरोधी पक्षाचे सरकार असते त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या योजनांना फारसे महत्त्व दिले जात नाही. पण जल जीवन मिशनसारख्या केंद्र सरकारच्या योजनासुद्धा प्राधान्याने राबवण्याची सूचना विजय यांनी दिली आहेत. सुमारे 20 वर्षांपेक्षा अधिक काळ मोठा पडदा गाजवणारे विजय हे सर्वसामान्यांच्या मनातील एक महानायक होतेच. पण आता सत्तेची खुर्ची मिळाल्यानंतरसुद्धा खरा महानायक कसा असावा हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न सातत्याने दिसून येत आहे.
तामिळनाडूतील माध्यमे आणि सर्वसामान्य जनता यांच्या मनात विजय यांची एक आशादायक प्रतिमा तयार झाली असली तरी त्यांना आगामी कालावधीमध्ये काळजीपूर्वक काम करावेच लागणार आहे. कारण यापूर्वीसुद्धा देशात अरविंद केजरीवाल यांच्या निमित्ताने लोकांना आदर्शवादी नेता मिळाला होता. पण नंतर त्यांच्याबाबतही भ्रमनिरास झाला होता. तसे आपल्याबाबत होणार नाही याची काळजी विजय यांना घ्यावीच लागेल.






