Editorial : ब्रिटनमध्ये जन्माला आलेला क्रिकेट हा खेळ सभ्य गृहस्थांचा खेळ म्हणून ओळखला जातो. सभ्य समजल्या जाणार्या (Editorial) इंग्रजी साहेबाने या खेळासाठी विविध प्रकारचे नियम तयार केले आणि ह्या नियमांचे काटेकोरपणे पालन करूनच हा खेळ खेळला जावा, असे अधोरेखित केले. गेल्या 150 वर्षांच्या कालावधीमध्ये सभ्य गृहस्थांच्या (Editorial) या खेळामध्ये अनेक बदल झाले असले, तरी आधुनिक काळामध्ये या खेळामध्ये राजकारणसुद्धा आल्यामुळे सभ्य गृहस्थांचा हा खेळ राजकारणाचा आखाडाही बनू पाहात आहे. नुकत्याच झालेल्या टी-20 क्रिकेट स्पर्धेत भारताने विजेतेपद मिळवल्यानंतर आता क्रिकेट विश्वाला आयपीएलचे वेध लागले आहेत. तसेच विविध देशांमध्ये तेथे लोकप्रिय असलेले फ्रँचाइजी क्रिकेटही खेळले जात आहे. त्यातूनच हे वाद निर्माण होऊ लागले आहेत. ब्रिटनमध्ये खेळण्यात येणार्या 100 लीग क्रिकेटमध्ये भारतीय उद्योगपती काव्या मारन यांचा सनरायझर्स लीड्स हा संघ आहे. त्यांनी आपल्या या संघामध्ये पाकिस्तानचा अष्टपैलू अब्रार अहमद याला घेतल्यामुळे वाद निर्माण झाला आहे. टीम इंडियाच्या खेळाडूवर आयसीसीची कारवाई एकीकडे आयपीएलमध्ये कोणत्याही पाकिस्तानी खेळाडूला प्रवेश दिला जात नाही, एवढेच नाही तर भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये द्विपक्षीय क्रिकेटही होत नाही. नुकत्याच झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्येसुद्धा पाकिस्तानच्या सोयीसाठी श्रीलंकेमध्ये सामने घेण्यात आले होते. ही परिस्थिती असताना काव्या मारन यांनी अब्रारचा समावेश आपल्या संघात केल्यामुळे वाद निर्माण होणे साहजिकच आहे. सुनील गावस्कर यांच्यासह अनेक ज्येष्ठ खेळाडूंनीसुद्धा काव्या मारन यांच्या या निर्णयावर टीका केली आहे. दुसरीकडे पाकिस्तानमधील पीएसएल या फ्रँचाइजी लीग क्रिकेटमधून माघार घेऊन दोन परदेशी खेळाडूंनी आयपीएलमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतल्याने त्याबाबतही वाद सुरू झाला आहे. पीएसएलसाठी लिलावात बोली लागून निवड झाल्यावरसुद्धा आता या दोन खेळाडूंनी आयपीएलला प्राधान्य दिल्यामुळे पाकिस्तान क्रिकेटचा तीळपापड होणे साहजिकच आहे. पण त्यालासुद्धा आता राजकारणाची झालर दिली जात आहे. या सर्व घडामोडींवर मात करणारी आणखी एक धक्कादायक घटनाही घडू पाहत आहे. ती म्हणजे भारतात आयपीएलची मुहूर्तमेढ करणारे वादग्रस्त फरार उद्योगपती ललित मोदी पुन्हा एकदा आयपीएलच्या मैदानात येण्याची शक्यता आहे. राजस्थान रॉयल्स हा महत्त्वाचा संघ खरेदी करण्याचा ललित मोदी यांचा विचार असल्याच्या बातम्या येत आहेत. जगातील सर्वात मोठ्या आणि लोकप्रिय क्रिकेट लीगचा पाया घालणारे ललित मोदी हे देशाचे गुन्हेगार आहेत आणि फरार आहेत. तरीसुद्धा इतरांच्या माध्यमातून त्यांनी एखादा संघ खरेदी करून आयपीएलमध्ये पुन्हा हातपाय पसरायला सुरुवात केली तर तेसुद्धा चुकीचे ठरू शकते. या सर्व घडामोडीबाबत बीसीसीआय काय भूमिका घेते हेसुद्धा महत्त्वाचे आहे. काव्या मारन यांचा सनरायझर्स हा संघ आयपीएलमधला महत्त्वाचा संघ आहे. जर त्यांनी हंड्रेड लीगमधील आपल्या सनरायझर्स लीड्स या संघामध्ये अब्रार अहमदला कायम ठेवले तर त्याचा परिणाम त्यांच्या आयपीएलमधील कामगिरीवरही होऊ शकतो. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने तसेच संकेत दिले आहेत. नुकत्याच झालेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेमध्ये बांगलादेशच्या कारणावरून भारताविरुद्ध सामन्यात सहभागी न होण्याची भूमिका पाकिस्तानने घेतली होती. आयसीसीच्या दबावामुळे ऐनवेळी त्यांनी भारताबरोबर सामना खेळण्याची तयारी दर्शवली होती. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट संबंध अशा प्रकारचे तीव्र असतानाच एखाद्या भारतीय संघमालकाने पाकिस्तानी खेळाडूला आपल्या संघात स्थान देणे निश्चितच आक्षेपार्ह मानावे लागणार आहे. जरी इंग्लंडमध्ये होणार्या 100 क्रिकेट स्पर्धेवर बीसीसीआयचे कोणतेही वर्चस्व नसले आणि या स्पर्धेवर नियंत्रण ठेवण्याचा कोणताही अधिकार त्यांना नाही; पण काव्या मारन यांच्या ह्या एका निर्णयामुळे आयपीएललासुद्धा वादाचे गालबोट लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एकूणच सभ्य गृहस्थांच्या या खेळाला आता व्यावसायिक स्वरूप प्राप्त झाल्यामुळे मार्केटचे सर्व नियम आता क्रिकेटमध्येसुद्धा आले आहेत. काय विकलं जातं त्याला प्राधान्य दिले जात असल्यामुळे अशा प्रकारच्या वादग्रस्त घटना घडणे अपरिहार्य मानावे लागेल. नुकत्याच झालेल्या बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातील मालिकेमध्ये बांगलादेशाच्या खेळाडूने खिलाडूवृत्तीचे प्रदर्शन न केल्यामुळेसुद्धा वाद निर्माण झाला होता. पाकिस्तानमध्ये त्यावरून टीका झाली होती. पण याच पाकिस्तान क्रिकेटचे सर्वेसर्वा मोहसीन नक्वी यांनी अद्यापही भारताने जिंकलेली आशियाई ट्रॉफी भारताला परत केलेली नाही. पाकिस्तानच्या या असभ्यपणाचे दर्शन सार्या जगाला झाले आहे. आता अब्रारच्या समावेशावरून भारतामध्ये वाद निर्माण होत असताना पाकिस्तानने काव्या यांची बाजू घेतली आहे. म्हणजेच क्रिकेट खेळामध्येसुद्धा राजकारण आले आहे. या सभ्य गृहस्थांच्या खेळामध्ये प्रत्येक जण आपापल्या सोयीची भूमिका घेऊ पाहात आहे. सध्या सर्वत्र द्विपक्षीय मालिकांपेक्षाही (Editorial) लीग क्रिकेट हंगाम सुरू असल्याने आणि या क्रिकेटमध्ये मोठा पैसा असल्याने कोणताही वाद निर्माण झाला तरी मार्केटचा विचार करून हे वाद बाजूला ठेवून सभ्य गृहस्थांचा हा खेळ कायम चालू ठेवला जाईल, याबाबतही शंका घेण्याचे कारण नाही.