अग्रलेख : कॅप्टन इंडिया!
भारतीय वंशाचे कॅप्टन स्मित मछार (Captain Smit Machchhar) यांनी दाखवलेले धाडस संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी ठरले.

Captain Smit Machchhar : आकाशात 34 हजार फुटांवर असताना जेव्हा अचानक मृत्यू समोर उभा ठाकतो, तेव्हा माणूस हतबल होतो, जगण्याची उमेद सोडून देतो; पण काही मोजकी माणसे आपल्या अद्भुत धैर्याने त्या मृत्यूलाही पराभूत करतात, त्याच्यावर विजय मिळवतात. केवळ स्वत:लाच नाही तर आपल्यासोबत असणार्या इतरांनाही मृत्यूच्या दाढेतून सुखरूप बाहेर काढून आणतात.
30 सप्टेंबर रोजी दुबईहून तेल अवीवच्या दिशेने जाणार्या विमानातील घटना ही केवळ एका विमान अपहरणाचा प्रयत्न किंवा तांत्रिक दुर्घटना नव्हती, तर ती मानवी शौर्य, संयम आणि अफाट आत्मविश्वासाची एक थरारक कथा होती. या भीषण संकटात भारतीय वंशाचे कॅप्टन स्मित मछार (Captain Smit Machchhar) यांनी दाखवलेले धाडस संपूर्ण जगासाठी प्रेरणादायी ठरले.
गंभीर जखमी होऊनही त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत दिलेला लढा केवळ 174 प्रवाशांचे प्राण वाचवणारा ठरला नाही, तर एका मोठ्या संकटाला लीलया परतावून लावणारा ठरला. तथापि, या घटनेने विमान वाहतूक क्षेत्राच्या सुरक्षेवर आणि मानवी मानसिकतेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विमानाचे कॉकपिट हे अत्यंत सुरक्षित मानले जाणारे ठिकाण असते; परंतु जेव्हा तेथेच फ्लाइट डेकच्या आतून म्हणजेच सहकार्याकडूनच (को-पायलट) धोका निर्माण होतो, तेव्हा सगळेच रामभरोसे असते.
सहपायलट असलेल्या ओमानी नागरिकाने आपल्याच कॅप्टनवर निर्दयीपणे चाकूने वार करून विमान पाडण्याचा जो घातक प्रयत्न केला, तो मानवी विश्वासाला तिलांजली देणारा होता. असे असूनही, कॅप्टन स्मित (Captain Smit Machchhar) यांनी दाखवलेला संयम आणि जिद्द वाखाणण्याजोगी आहे. रक्ताने माखलेले असताना, ऑक्सिजन मास्क घालून त्यांनी विमानाचा ताबा सोडला नाही. इतकेच नव्हे तर, अत्यंत बेशुद्धीच्या स्थितीतही कॉकपिटचा दरवाजा उघडून प्रवासी आणि क्रू मेंबर्सना आत प्रवेश करण्याची संधी उपलब्ध करून दिली.
जर स्मित यांनी तो अंतिम लढा दिला नसता, तर हा अनर्थ 9/11 च्या भीषण आठवणी जागवणारा ठरला असता. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू असोत किंवा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, प्रत्येकाने कॅप्टन मछार यांच्या या अतुलनीय शौर्याचा सत्कार करत त्यांना खरा हिरो म्हटले आहे, जे अत्यंत उचित आहे. ‘कॅप्टन स्मित यांनी अद्भुत धैर्य, सुसंस्कृतपणा आणि साहसाचे प्रदर्शन केले. स्मित यांच्या या कामगिरीचा आम्हाला अभिमान आहे.
आज मी त्यांचे वडील भूपेंद्र, त्यांची आई गीता आणि त्यांची पत्नी सोनल यांच्याशीही बोललो. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आज संपूर्ण जगाला त्यांच्यावर अभिमान आहे. मी देशवासीयांना आवाहन करतो की त्यांनी स्मित यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि उत्तम आरोग्यासाठी प्रार्थना करावी आणि भारताचा मान वाढवणार्या स्मित यांना सलाम करावा’, अशा शब्दांत मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. हे शब्द जरी पंतप्रधान मोदी यांचे असले तरी सर्वच भारतीयांच्या भावना आज यापेक्षा वेगळ्या असूच शकत नाही.
एका भारतीयाने अत्युच्च धाडसाचे प्रदर्शन घडवत जगात भारताचा गौरव वाढवला आहे. कॅप्टन स्मित ज्या स्थितीत होते तशा परिस्थितीत इतरांचे प्राण वाचवण्यासाठी जबरदस्त हिंमत, अतूट संकल्प आणि प्रचंड आत्मबळ लागते. या संपूर्ण प्रकरणाने आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक सुरक्षेच्या दाव्यांची पोलखोल केली आहे. जगातील सर्वात कडक सुरक्षा प्रोटोकॉल मानणार्या विमानतळांवरून उड्डाण करताना विमानात धारदार शस्त्र कसे पोहोचले, हा प्रश्न आज प्रत्येक विमान प्रवाशाच्या मनात निर्माण झाला असणार.
संबंधित को-पायलटने ती वस्तू स्वतःच्या शरीरात लपवली होती की ती आधीपासूनच विमानात उपलब्ध होती, याचा सखोल तपास होणे गरजेचे आहे. दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे, इस्रायल आणि ओमानमधील राजनैतिक संबंधांचा पेच. फ्लायदुबईच्या करारानुसार, विमानाचे पायलट हे अशा देशांतील असावेत ज्यांचे इस्रायलसोबत सलोख्याचे संबंध आहेत. अशा वेळी ओमानी नागरिक कॉकपिटमध्ये कसा पोहोचला? हा केवळ सुरक्षेचा भंग नसून, प्रशासकीय आणि नियमांच्या अंमलबजावणीतील मोठा निष्काळजीपणा आहे.
इस्रायलच्या हवाई वाहतूक मंत्र्यांनी यावर ताशेरे ओढले असून, या कराराच्या उल्लंघनाची उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली आहे, जी काळाची गरज आहे. या घटनेचा तपास करताना हा केवळ एकट्या व्यक्तीचा माथेफिरूपणा आहे की यामागे कोणती मोठी दहशतवादी संघटना किंवा शत्रू देशांचा हात आहे, हे शोधून काढणे आंतरराष्ट्रीय सुरक्षा यंत्रणांसाठी एक मोठे आव्हान असणार आहे.
सौदी अरेबियामध्ये सुरू असलेली या संशयिताची चौकशी आणि संयुक्त अरब अमिरातीची भूमिका यात महत्त्वाची ठरणार आहे; परंतु या संपूर्ण संकटात एक अत्यंत सकारात्मक बाजू देखील दिसून आली. ती म्हणजे, भारतीय पायलट, इस्रायली प्रवासी आणि अमिराती क्रू मेंबर्स यांनी दाखवलेली एकता. राष्ट्रीयत्व, धर्म आणि सीमा यांच्या पलीकडे जाऊन, माणसाने माणसाचा जीव वाचवण्यासाठी दिलेला हा लढा दाखवून देतो की, जगात अद्यापही मानवता जिंवत आहे.
कॅप्टन स्मित मछार (Captain Smit Machchhar) आज रुग्णालयात उपचार घेत आहेत; पण त्यांनी जी जिद्द आणि कर्तव्यतत्परता दाखवली आहे, ती येणार्या पिढ्यांसाठी कायम स्मरणात राहील. इस्रायलच्या संसदेत त्यांच्या नावावर लाउंज सुरू करण्याचा प्रस्ताव असो किंवा जागतिक स्तरावर त्यांचे झालेले कौतुक असो, हे सर्व त्यांच्या धाडसाची आणि जिवाची पर्वा न करता दिलेल्या लढ्याची पावती आहे. संकटाचे कितीही काळे ढग दाटले तरी मानवी धैर्याचा प्रकाश त्या अंधाराला नक्कीच चिरून काढू शकतो हाच धडा यातून मिळतो.






