AAP : गेल्या काही वर्षांच्या कालावधीमध्ये झपाट्याने लोकप्रिय झालेल्या आम आदमी पार्टी (AAP) या सुशिक्षित लोकांच्या पक्षालासुद्धा फुटीचा फटका बसला. या पक्षातील सात सुशिक्षित खासदारांनी भारतीय जनता पक्षाच्या वॉशिंग मशीनमध्ये जाऊन स्वतःला स्वच्छ करून घेतले. एखाद्या पक्षात फूट पडून त्या पक्षातील काही आमदार किंवा खासदार इतर कोणत्या पक्षामध्ये सामील होण्याची घटना भारतीय लोकशाहीसाठी नवी नसली तरी भारतीय लोकशाही राजकारणाच्या पटलावर त्यामानाने नव्याने स्थापन झालेल्या आम आदमी पक्षाबाबत (AAP) अशा प्रकारची घटना घडते तेव्हा मात्र त्याची चर्चा झाल्याशिवाय राहात नाही. गेल्या काही महिन्यांच्या किंवा वर्षांच्या कालावधीमध्ये एखादा प्रमुख पक्ष फोडून तो आपल्या नावावर करून घेण्याची घटना आता काही नवी राहिलेली नाही. महाराष्ट्रासारख्या सर्वात प्रगत राज्यामध्ये अल्प कालावधीमध्येच दोन मोठ्या पक्षांमध्ये फूट पाडून फुटीर गटाने मूळ पक्षावर दावा केला आणि हे फुटीर गट सत्ताधारी भाजपबरोबर सत्तेमध्ये सामील झाले. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना असो किंवा शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असो या दोन्ही पक्षांना गेल्या काही वर्षांमध्ये अशा प्रकारे फुटीचा अनुभव घ्यावा लागला. आता दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा अरविंद केजरीवाल यांनासुद्धा तोच अनुभव येत आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि आम आदमी पक्ष यांच्यामध्ये मूलभूत फरक असल्याने या फुटीचा वेगळा अर्थ लक्षात घ्यावा लागणार आहे. AAP शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस किंवा इतर काही पक्ष परंपरागत पद्धतीने चालत आले आहेत. कौटुंबिक पातळीवर ह्या पक्षांचे कामकाज चालत आले आहे असे लक्षात येते. पण आम आदमी पक्ष हा असा एक पक्ष होता जो देशातील सुशिक्षित आणि सुजाण नागरिकांनी एकत्र येऊन स्थापन केलेला होता. अण्णा हजारे यांच्या भ्रष्टाचार विरोधी आंदोलनानंतर राजधानी नवी दिल्लीमध्ये जी वातावरण निर्मिती झाली होती त्याचा परिपाक म्हणून आम आदमी पक्षाची स्थापना करण्यात आली होती आणि अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखाली या पक्षाने गेल्या काही निवडणुकांमध्ये चमकदार कामगिरीही केली होती. दिल्लीमध्ये या पक्षाने सत्ता मिळवली होती. पंजाबमध्ये सुद्धा सत्ता मिळवली आणि लोकसभा निवडणुकीमध्ये सुद्धा चमकदार कामगिरी केली होती. देशाच्या इतर काही राज्यांमध्येसुद्धा या पक्षाचे अस्तित्व ठळकपणे उठून दिसू लागले होते. केजरीवाल स्वतः भारतीय शासकीय सेवेतील माजी अधिकारी होते. तर त्यांच्याबरोबर या पक्षात सामील झालेले मनीष सिसोदिया किंवा इतर अनेक जण सुशिक्षित, सुजाण आणि लोकशाहीची जाण असणारे नेते होते. आता आम आदमी पक्षातून बाहेर पडणारे जे सात जण आहेत, त्यामध्ये राघव चढ्ढा असोत, संदीप पाठक असोत, हरभजन सिंग असो किंवा स्वाती मालीवाल हे सर्वजण सुशिक्षित आहेत आणि त्यांना फॉलो करणारे लाखो लोक आहेत. राघव चढ्ढा यांनी आम आदमी पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर एका दिवसात त्यांच्या सोशल मीडियावरील फॉलोअर्समध्ये 13 लाख घट झाली. हा अर्थ समजून घ्यायला हवा. भारतासारख्या मोठ्या लोकशाहीमध्ये पारंपरिक पद्धतीने राजकारण सुरू असताना आम आदमी पक्षासारखा प्रयोग सार्वत्रिक पातळीवर राष्ट्रीय पद्धतीने यशस्वी होणे गरजेचे होते. काही प्रमाणात या पक्षाने भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही पारंपरिक पक्षांना पर्याय उभा केला होता. पण दिल्लीतील तथाकथित मद्य घोटाळ्यामध्ये अरविंद केजरीवाल आणि मनीष सिसोदिया यांसारखे नेते अडकल्याने या पक्षाच्या प्रतिमेला तडा गेला आणि हळूहळू या पक्षाबाबतही आपलेपणाची भावना कमी होऊ लागली. त्यातच राघव चढ्ढा आणि त्यांच्या विचारसरणीचे जे तरुण नेते होते त्यांना आपले राजकीय भवितव्य जर घडवायचे असेल तर देशात प्रभावशाली राजकारण करणार्या भारतीय जनता पक्षाची कास धरण्याशिवाय पर्याय नाही असे वाटू लागले होते. त्यातूनच ही आम आदमी पक्षातील फूट समोर आली आहे. भारतीय जनता पक्षाला साथ देणारे हे सात खासदार राज्यसभेचे सदस्य असले, तरी त्याचा परिणाम एकूण राजकारणावर होणे अपरिहार्य आहे. आगामी कालावधीमध्ये पंजाबमध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम आदमी पक्षाने पंजाबमध्ये सत्ता मिळवली होती आणि अकाली दल व भाजप, काँग्रेस यांना सत्तेपासून दूर ठेवले होते. पण आता 2027 मध्ये होणार्या विधानसभा निवडणुकीची चुरसही या फुटींमुळे वाढणार आहे. नेहमीच निवडणुकीच्या राजकारणाच्या मोडमध्ये असणारा भाजप आपला प्रमुख राजकीय शत्रू कोण आहे यावर लक्ष ठेवून असतो. या राजकीय शत्रूचा कोणत्या ना कोणत्या प्रकारे बिमोड करण्यासाठी सर्व शस्त्रांचा वापर करण्याकडे भाजपाचा कल असतो. त्याची पहिली पायरी म्हणून आता या आम आदमी पक्षातील या फुटीकडे पहावे लागेल. भाजपाच्या या वॉशिंग मशीन पॉलिसीवर जरी मोठ्या प्रमाणावर टीका होत असली तरी, देशातील अनेक छोट्या मोठ्या पक्षांना या वॉशिंग मशीनचे आकर्षण वाटू लागले आहे हे वास्तवही नाकारता येणार नाही. आम आदमी पक्षाला आता आगामी कालावधीमध्ये या धक्क्यातून सावरून पुन्हा उभारी घेण्याचे काम करावे लागणार आहे. केजरीवाल आणि सिसोदिया मद्य घोटाळ्यातून निर्दोष बाहेर आले आहेत आणि आता पुन्हा एकदा आपला (AAP) पक्ष मजबूतपणे लोकांसमोर नेण्याचे आव्हान त्यांना आगामी कालावधीमध्ये पेलावे लागणार आहे.