Pratibha Chakankar : EDचा ससेमिरा! चाकणकरांच्या बहीण प्रतिभा चाकणकरांना ईडीकडून समन्स; आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू
Pratibha Chakankar : भोंदू अशोक खरात प्रकरणात आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. आर्थिक व्यवहारासंबधी रुपाली चाकणकरांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांना ईडीकडून समन्स जारी करण्यात आले आहे.

Pratibha Chakankar : नाशिकमधील भोंदूबाबा प्रकरणात नवे वळण आले असून अशोक खरात याच्याशी संबंधित आर्थिक व्यवहारांच्या चौकशीत रूपाली चाकणकर यांच्या भगिनी प्रतिभा चाकणकर यांना अंमलबजावणी संचालनालय (ED) कडून समन्स बजावण्यात आले आहे. पुढील आठवड्यात त्यांची चौकशी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी असलेली जवळीक आणि त्याच्या मंदिर ट्रस्टमध्ये रूपाली चाकणकर यांचा सहभाग. यामुळे आधीच वाद निर्माण झाला होता. महिला अत्याचारासारख्या गंभीर आरोपांतील या प्रकरणात राज्यभरातून त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. त्यानंतर त्यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देत वाद शांत करण्याचा प्रयत्न केला होता. Pratibha Chakankar
दरम्यान, या प्रकरणात आर्थिक व्यवहारांसंबधी तपासात प्रतिभा चाकणकर (Pratibha Chakankar )यांची शिर्डी पोलिसांकडून चौकशी करण्यात आली होती. अशोक खरातसोबत त्यांचेही फोन कॅाल झाल्याचे दावा करण्यात येत आहे. दोघांमध्ये 250 हून अधिक कॉल झाल्याचा दावा करण्यात येत असून, त्यामुळे चाकणकर कुटुंबाच्या चौकशीची मागणी अधिक तीव्र झाली आहे.
तपासात असेही उघड झाले आहे की, अशोक खरातने अनेकांच्या आधार आणि पॅन कार्डचा वापर करून अनेक आर्थिक व्यवहार केले. ‘जगदंबा’ आणि ‘समता’ या पतसंस्थांमध्ये अनेक खात्यांचा नॉमिनी तो होता. विशेष म्हणजे, प्रतिभा चाकणकर यांच्या नावानेही खाते उघडण्यात आल्याचे समोर आले आहे. समता पतसंस्थेतील सुमारे तीन कोटी रुपयांच्या व्यवहारांप्रकरणी आता चौकशी होणार आहे. Pratibha Chakankar
रूपाली चाकणकर यांनी यापूर्वी अशोक खरातसोबत कोणतेही आर्थिक व्यवहार नसल्याचे स्पष्ट केले होते. मात्र तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, ज्या पतसंस्थांमधून कोट्यवधींचे व्यवहार झाले, त्याच ठिकाणी त्यांच्या भगिनीचे खाते असल्याचे उघड झाले आहे. पोलिस तपासात प्रतिभा गणेश चाकणकर यांच्या खात्यातून 40 ते 50 कोटी रुपयांची उलाढाल झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. त्यामुळे प्रतिभा चाकणकर यांच्या अडचणी वाढणार असल्याचे बोलले जात आहे.






