ED raids : मुंबईसह दिल्लीत 14 ठिकाणी ईडीचे छापे ; 4,957 कोटींचा कर्ज घोटाळा प्रकरण

ED raids in Delhi : 4 हजार 957 कोटींच्या बँक फसवणूक प्रकरणात सक्त वसुली संचलनालयाने (ED) मोठी कारवाई केली आहे. ईडीने मुंबईसह दिल्लीतील १४ ठिकाणावर छापेमारी करत धडक कारवाई केली आहे. ईडीने टाकलेल्या धाडीत एकूण ५ कोटी ४० लाख रुपयांची मालमत्ता गोठवण्यात आली आहे. या प्रकरणात प्रतिभा इंडस्ट्रीज लिमिटेड आणि त्यांच्या संचालकांवर फसवणूकीचा ठपका ठेवण्यात आला आहे. त्या आधारे ईडीने कारवाई करीत प्रतिभा इंडस्ट्रीज लिमिटेड, अजित कुलकर्णी आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार ईडीने एक विशेष मोहिम राबविली होती.
या प्रकरणात ईडीने मुंबईत आणि दिल्लीत १४ ठिकाणी छापे टाकले आहेत. यासंदर्भात बँक अॅाफ बडोदाने तक्रार दाखल केली होती. त्यानुसार कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. या कारवाईत बँक ठेवी, म्यच्युअल फंड अशी ५ कोटी 40 लाख रुपयांची मालमत्ता गोठवण्यात आली आहे.
काय आहेत आरोप ?
प्रतिभा इंडस्ट्री लिमिटेड आणि त्यांच्या संचालकांवर आर्थिक फसणुकीचा ठपका ठेवण्यात आला आहे. संचालकांनी कट रचून बँकांचे आर्थिक नुकसान केले. गैरव्यवहाराची रक्कम बनावट व्यवहारांमार्फत इतर ठिकाणी वळवली, असा आरोप करण्यात आला आहे. त्याआधारे केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) प्रतिभा इंडस्ट्रीज लिमिटेड, अजित कुलकर्णी आणि इतरांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सुरुवातीला सीबाआयने या प्रकरणात लक्ष घातल्यानंतर आता ईडीनेही ही धडक कारवाई केली आहे. ईडीकडून या मालमत्तांच्या खरेदीबाबत कागदपत्रांची तपासणी करण्यात आली.
शोध मोहीम सुरूच
२०२७ मध्ये प्रतिभा उद्योग समूहाचे खाने NPA म्हणून घोषित करण्यात आले. या समूहावर फसवणुकीचा आरोप बँकांनी केला होता. बँक अॅाफ बडोदाने या प्रकरणी सीबीआयकडे दाद मागत संबंधितांवर कारवाईची मागणी केली होती. आता या आर्थिक फसवणूक प्रकरणात सीबीआय बरोबरच ईडीनेही लक्ष घातले आहे. अजूनही शोध मोहीम सुरूच असल्याचे सांगण्यात येत आहे.





