कोलकाता – पश्चिम बंगालमधील पंडितिया रोडवरील फोर्ट ओएसिस येथील अर्पिता मुखर्जीच्या निवासस्थानावर ईडीच्या पथकाने छापा टाकला. रवींद्र सरोवर पोलिस ठाण्यात गेल्याच्यानंतर ईडीचे पथक अर्पिता मुखर्जीच्या घरी गेले. यापूर्वी, ईडीने पार्थ चॅटर्जी आणि त्यांची जवळची सहकारी अर्पिता मुखर्जी यांच्यातील आर्थिक संबंधांबाबतचे पुरावे न्यायालयासमोर मांडले आहेत. एजन्सीने न्यायालयाला सांगितले की, अर्पिता मुखर्जीने तिच्या चौकशीदरम्यान “मेसर्स एपीए युटिलिटी सर्व्हिसेस”च्या बँक खात्याबद्दल सांगितले होते ज्यात दोघांची 50-50 टक्के भागीदारी होती आणि डीड 2012 मध्ये अंमलात आली होती.
बुधवारी ईडीने शांतिनिकेतन येथील फार्महाऊसवर छापा टाकला. ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले होते की, चॅटर्जी आणि मुखर्जी यांनी 2012 मध्ये संयुक्तपणे भूखंड खरेदी केला होता, तर 2020 मध्ये अर्पिता मुखर्जीच्या नावाने म्युटेशन करण्यात आले. मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेले पश्चिम बंगालचे माजी मंत्री पार्थ चॅटर्जी आणि त्यांची जवळची सहकारी अर्पिता मुखर्जी यांना 5 ऑगस्टपर्यंत अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) कोठडीत ठेवण्यात आले आहे. कोलकाता न्यायालयाने बुधवारी त्यांना ईडीच्या कोठडीत पाठवले होते.
काँग्रेस आक्रमक! देशातील ज्वलंत प्रश्नी मोदी सरकारविरोधात उद्या राज्यव्यापी आंदोलन
काय आहे प्रकरण…
पश्चिम बंगालमधील सरकारी शाळांमध्ये 2014 ते 2021 दरम्यान झालेल्या कोट्यवधी रुपयांच्या भरती घोटाळ्यात कथित सहभागाबद्दल चॅटर्जी आणि मुखर्जी यांना 23 जुलै रोजी अटक करण्यात आली होती. घोटाळ्याच्या वेळी पार्थ चॅटर्जी राज्याचे शिक्षणमंत्री होते. छाप्यात अर्पिता मुखर्जीच्या घरातून ईडीला ५० कोटींहून अधिक रोकड आणि सोने सापडले आहे.