Maharashtra ATS | दहशतवादी कृत्याशी संबंधित आर्थिक व्यवहारप्रकरणी ईडी आणि एटीएसच्या पथकाने मध्यरात्री ठाणे पडघा येथील बोरिवली गावात छापेमारी केली आहे. बोरीवली गावातील अनेक घरांमध्ये तपास पथके दाखल झाली असून रात्रभर झडती घेतली जात आहे. या गावात तरुणांना दहशतवादी प्रशिक्षण दिले जात असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. ईडी आणि एटीएसच्या या धाडीत अनेक महत्त्वाची कागदपत्रे आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आल्याची माहिती देखील समोर आली आहे. या प्रकारानंतर गावात तणावग्रस्त वातावरण झाले असून पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. साकीब नाचन याच्या अटकेनंतर एटीएसने पडघा गावाला लागून असलेल्या बोरीवली गावावर मोठी कारवाई केली होती. साकीब हा बोरीवली गावचा रहिवाशी होता. साकीब हा स्लिपर सेल बनवण्यात आणि तरुणांची माथी भडकवण्यात पटाईत असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बोरिवलीत काही स्लीपर सेल कारवाया करत असल्याची गोपनीय माहिती एटीएसला मिळाली होती. बोरिवली गाव प्रकाशझोतात २००३ मध्ये मुलुंड, घाटकोपर रेल्वे स्थानकात झालेल्या बॉम्बस्फोटामुळे पहिल्यांदा हे गाव प्रकाशझोतात आले. या बॉम्बस्फोटाचा मास्टरमाइंड म्हणून साकिब नाचण आणि त्याच्या साथीदारांना अटक केली होती. भिवंडी जवळच्या पडघामधील बोरीवली गावाने स्वतंत्र मंत्रीमंडळ, स्वतंत्र देश आणि स्वतंत्र राज्य घटना तयार केली होती. साकीबने बोरीवली गाव हा वेगळा देश म्हणून घोषितकेले होते. त्याने या गावाला ’अल शाम’ असं नाव दिले होते. स्वतःची राज्यघटना, स्वतःचे मंत्रीमंडळ साकीबने तयार केले होते. हेही वाचा: महायुतीचा 7 महापालिकांसाठी फॅार्म्युला ठरला? लवकरच मोठी घोषणा होण्याची शक्यता