Mithun Chakraborty : रस्त्यावर जेवण, जमिनीवर झोप; मोठ्या संघर्षातून उभा राहिला बॉलिवूडचा ‘डिस्को डान्सर’!
Mithun Chakraborty : मुंबईत आल्यानंतरचा पहिला दिवस अत्यंत गोंधळाचा होता, असे सांगताना मिथुन म्हणाले की, त्यांना शहराची फारशी माहिती नव्हती.

Mithun Chakraborty : हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांचा यशस्वी प्रवास जितका प्रेरणादायी आहे, तितकाच तो संघर्षमयही आहे. आज सुपरस्टार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मिथुन यांना मुंबईत आल्यानंतर सुरुवातीच्या काळात अनेक कठीण प्रसंगांचा सामना करावा लागला होता. या कठीण प्रसंगांना तोंड देत त्यांनी अडचणींवर यशस्वी मात केली.
16 जून 1950 रोजी कोलकाता येथे जन्मलेल्या मिथुन चक्रवर्ती यांचे मूळ नाव गौरांग चक्रवर्ती आहे. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी ते नक्षलवादी चळवळीशी जोडले गेले होते. मात्र, मोठ्या भावाच्या निधनानंतर त्यांनी हा मार्ग सोडून कुटुंबाकडे परतण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अभिनयाचे स्वप्न घेऊन त्यांनी मुंबई गाठली. (Mithun Chakraborty)
मुंबईत आल्यानंतरचा पहिला दिवस अत्यंत गोंधळाचा होता, असे सांगताना मिथुन म्हणाले की, त्यांना शहराची फारशी माहिती नव्हती. माटुंगा जिमखाना शोधण्यासाठी ते समुद्रकिनाऱ्यावरून तब्बल 45 मिनिटे चालत गेले, मात्र नंतर आपण चुकीच्या दिशेने चाललो असल्याचे त्यांच्या लक्षात आले.

Mithun Chakraborty : रस्त्यावर जेवण, जमिनीवर झोप; मोठ्या संघर्षातून उभा राहिला बॉलिवूडचा ‘डिस्को डान्सर’!
2022 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत मिथुन यांनी त्यांच्या संघर्षमय दिवसांच्या आठवणींना उजाळा दिला. “माझा प्रवास अजिबात सोपा नव्हता. अनेक आव्हाने आणि अडचणींचा सामना करत मी इथपर्यंत पोहोचलो. पण प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करत राहिलो,” असे त्यांनी सांगितले.
जमिनीवर झोपावे लागायचे
त्या काळात ते एका इमारतीत राहत होते, जिथे त्यांना जमिनीवर झोपावे लागायचे. जेवणासाठी रस्त्यावरील स्टॉल्सचा आधार घ्यावा लागायचा, तर आंघोळ करण्यासाठी ते माटुंगा जिमखान्यात जात असत. “तो काळ कठीण होता, पण मला त्याची कोणतीही खंत नाही. आज लोक मला सुपरस्टार म्हणतात, त्यापेक्षा अधिक काय हवे?” असेही त्यांनी नमूद केले.
चित्रपटांंची नोंद घ्यायला हवी
मिथुन चक्रवर्ती यांनी 1976 मध्ये ‘मृगया’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. विशेष म्हणजे, पहिल्याच चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. त्यानंतर ‘डिस्को डान्सर’, ‘जल्लाद’, ‘गुंडा’, ‘प्रेम प्रतिज्ञा’, ‘अग्निपथ’ यासारंख्या अनेक चित्रपटात काम करत आपल्या अभिनयाची छाप सोडली. त्यांचा स्वतः एक मोठा चाहतावर्ग आहे. अलिकडच्या काळात त्यांनी ‘गोलमाल 3’, ‘OMG’, आणि ‘द काश्मीर फाइल्स’ यांसारख्या अनेक गाजलेल्या चित्रपटांत काम करत प्रेक्षकांच्या पसंतीची पोचपावती मिळवली आहे.
मुलीने साखरपुड्याचे खास फोटो केले शेअर
मिथुन चक्रवर्ती यांची मुलगी दिशानी चक्रवर्ती हिचा नुकताच साखरपुडा झाला आहे. दिशानीच्या होणाऱ्या पतीचे नाव माईल्स मंटझारिस आहे. साखपुड्याच्या सुंदर क्षणाचे खास फोटो दिशानीने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
इंस्टाग्राम अकाउंटवर फोटो शेअर करत दिशानीने तिच्या लग्नाची तारीखही जाहीर केली आहे. दिशानी चक्रवर्ती आणि माईल्स मंटझारिस 6 डिसेंबर 2026 रोजी विवाह करणार आहेत. या आनंदाच्या बातमीने दिशानी आणि मिथुनचे चाहते खूप आनंदित झाले आहेत.
फोटोंमध्ये दिशानी पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. दुसरीकडे, माईल्सने काळ्या रंगाचा पोशाख परिधान केला आहे. फोटोंमध्ये दिशानी तिची साखरपुड्याची अंगठी दाखवताना दिसत आहे.
हेही वाचा : Ritu Tawde : मुंबईच्या महापौर रितु तावडेंच्या गाडीचा अपघात; तीन गाड्या एकमेकांवर आदळल्या





